Sunday, December 18, 2022

ख्वाजा मेरे ख्वाजा...

(ख्वाजा मेरे ख्वाजा हे जोधा अकबर मधलं गाणं फार आवडतं. शब्दही, दृष्यही. सुफि संप्रदायाबद्दल एक गूढ आकर्षणही आहे. आज पुन्हा हे गाणं ऐकताना पहाताना हे सुचलं...)

सगळीकडे भरून तू

बाहेर तू, आत तू

तुझ्यात तू, माझ्यात तू.

फिरतो मी माझ्याच भोवती

की फिरतो तुझ्या भोवती

की तूच फिरवते आहेस मला

की तुझ्यातल्या मला फिरवतो आहेस?


एक हात वर, एक बाजुला

वरून तुला घेतो सामावून

अन बाजुने देऊन टाकतो

तुझे तुलाच माझे मीपण!

तूच माझा मालिक

तूच माझा कर्ता धर्ता

तुझ्यातच मी, माझ्यातच तू.


संसार भवंडरात फिरणारा

मला गुंतवणाराही तू 

अन सोडवणाराही तूच

हे माझ्या परमात्म्या

तुलाच सारे सादर!

Monday, October 31, 2022

भान वास्तवाचे

तशी मऊ गोधडी असतेच

उबदार, आधार देणारी,
अनेक पिढ्यांचे वात्सल्य पांघरून
त्या कोझीपणात वाटतच छान
ती सहानुभूती, सहसंवेदना, आपुलकी,...
अगदी सारं सारं, खरच वाटतं
आश्वासक, सुरक्षितता देणारं...

पण एक लक्षात ठेवावच लागतं,
ती गोधडी ओढून घेणारे आपले हात
वा,
आपल्यावर आच्छादणारे हात
ते मात्र कळिकाळाशी झगडणारेच.
समोर येणारं प्रत्येक वास्तव
हाताळून, घट्टे सहन करणारे;
ते हात आहेत म्हणून गोधडीची उब.
ते हात आहेत म्हणून
ती ओढून घेण्याचं सुख!

अन हेही लक्षात घ्यायलाच हवं
की हे हात तावून सुलाखून
कणखर झाले असतील तरच
तरच पेलु शकतात गोधडी!

तेव्हा गोधडी तर हवीच;
किंबहुना ती असतेच कुठे न कुठे,
वा शोधू, सापडवू शकतो.
पण ती पेलणारे हात मात्र
आपले आपल्यालाच
घडवावे लागतात!

जितक्या लवकर हे कळेल,
जितक्या लवकर हे जमेल,
तितकं गोधडीच काय,
आयुष्यही पेलणंही
सहन होऊ शकतं;
इतकच नाही तर
ते सुंदरही करता येतं!
----

Sunday, October 16, 2022

ती अन तो


ती:

कसे रे, सगळे हात 

पसरून उभा रहातोस

माझा एक एक अश्रु

अन एक एक इच्छा

हलकेच झेलायला!


तो:

कशी ग फुलत असतेस

सुखात, अगदी दुखातही.

माझ्या साऱ्या पानांना

सुगंधीच नाही तर;

केशरीही करून टाकतेस

हळुवार बरसण्याने!

Wednesday, September 7, 2022

बस इतना समझ़ सका मैं

कितना छोडू, कितना पकडू

रफ्तार न समझ सका मैं |


कितना ले लु, कितना दे दु

ब्यापार न समझ सका मैं|


कितना देखु, कितना दिखाऊ

दिखावा न दिखा सका मै|


कितना खाऊ, कितना खिलाऊ

होटल न खुलवा सका मै|


कितना सिखु, कितना सिखाऊ

पाठशाला न चला सका मैं|


कितना जिऊ, या जिना बस करू

ये भी न समझ़ सका मैं|


जो है हाथोंमे, उसे गले लगाऊ

बस इतना समझ़ सका मैं|

Friday, August 19, 2022

ना बोले आज कन्हाई

https://youtu.be/BQKNeO-ZQWg

मध्यंतरी हे एका गृपवर आलं. फार सुंदर, मनाचा ताबा घेणारी रचना. पण अर्थ नीट कळत नव्हता. मग गुगलबाबा आणि एका मित्राचा मित्र यांच्याकडून इंग्रजीत थोडं समजलं.  पण तरी मनात घोळतच राहिलं. शेवटी आज ते असं बाहेर पडलं  :  


ना बोले आज कन्हाई

ना आये घर हमारे

गलियोंसे चले जायें

रुठके गलिसे मोडे

लुटे मारी चैन सारी

ना बोले आज कन्हाई


सोने नहीं देता अनारी

जीया मोरा होये भारी

रुपेरी मधुर मोहनी

मोसे बोलत नाही 

लुटे मारी चैन सारी

ना बोले आज कन्हाई

---

Wednesday, August 17, 2022

रसरशीत पान्हा



लोथलच्या त्या जोडप्याचा सांगाडा पाहून

नाभीत खोलवर जाणवलेली संवेदना

अन सरसरून आलेली ममत्वाची भावना

हेच माझे पूर्वज, मीच त्यांची वंशज!

तिच्या अस्थिपंजर स्तनातून पाझरला पान्हा 

थेट पोहोचलेला माझ्यापर्यंत, रसरशीत उष्ण....


तेव्हा ना मनात आले, की 

कोणता होता धर्म त्यांचा

कोणती जात, कोणतं रुप, कोणता दर्जा

ना काळाचा बंध आडवा आला

ना भूप्रदेशाचा, ना भाषेचा, ना लिपीचा

कोणत्याही संवादाशिवाय थेट जोडले गेलो

ते अन मी, त्या सशक्त पान्ह्याने!


कधीतरी एकदा पोहोचलेले थेट दक्षिणेला

कन्याकुमारी तेव्हा झोपलेली, तिची झोपेची वेळ

पण मग फिरून देऊळ पहाताना पुन्हा भिजले

त्या अनेक काळ-योजने दूर असलेल्या शिल्पकाराच्या

कोरिव, ठाशीव कलेच्या पान्हात, चिंब भिजले

एक एक मूर्ती जोडत गेली त्याच्याशी मला

हाच तर तो माझ्या जीवनाचा कर्ताकरविता!


पण पुन्हा इथेही नव्हताच माहित त्याचा धर्म

लिपी, भाषा, संस्कृती. सगळच मला अगम्य

पण तरी काहीच आडवं आलं नाही आमच्यात;

थेट पोहोचलाच दिडदा दिडदा नाद

त्याच्या दगडी सुरेल खांबांमधून निघालेला

अन जुळलाच की अगदी माझ्या हृदयस्पंदनांशी


अन मग कधीतरी शिरले टागोरांच्या निोकेतनात

तिथला शांत, गंभीर, आश्वासक भवताल

सभोवतालचा हिरवा निसर्ग, त्यातला गारवा;

कृष्णवडाच्या पानापानांतून वाहणारे नवनीत...

हजारो पारंब्यातून माझ्यापर्यंत थेट पोहोचलच.

त्या प्रचंड पसाऱ्यात मीही एक, समावून जात!


तेव्हाही लक्षात आलं, यांचा धर्म, लिपी, भाषा

काही काही आडवं आलच नाही एकदाही.

आत्म्याशी आत्म्याचा संवाद थेट, विना शब्दभाषा

प्रत्येक पारंबी नवनीताच्या स्निग्धतेने सहज

पोसत गेली प्रत्येक पिढीला, थेट माझ्यापर्यंत.


अन मग कधीतरी पोहोचले अनंतनागच्या 

त्या अतिप्राचीन ढासळलेल्या सुरेख मंदीरात

मंदीर नव्हतच उभं आता, पण तरीही नाद होता.

बाजुच्या भिंती माझ्याशी बोलायला आसुसलेल्या

ढासळलेली प्रत्येक मूर्ती बोलत होती माझ्याशी

तिचा नव्हता आक्रोश, पाडल्याचा, नष्ट केल्याचा.

नव्हता द्वेष वा आक्रमक आरोप वा विष:ण्णता

जे झालं ते स्विकारलेलं तिनं, दु:खाने पण शांतपणे!


अन मला सांगत होती, काळाचा महिमा आहे हा

जुनं संपतंच कधी न कधी, शत्रू नसतं कोणी.

असते तो काळाचा महिमा, काळाची गरज.

पण तू त्यापलिकडे ये, इथे माझ्याजवळ पोहोच

राग, द्वेष, संघर्ष, पतन सगळं सोसून ती सांगत होती.

हे सगळं सोड, नवीन उभं कर, जे जोडेल

तुला माझ्यापर्यंत, धर्माशिवाय, जातीशिवाय,

भाषेशिवाय, लिपीशिवाय,...थेट संवाद- स्नेह संवाद!

म्हणाली माझ्या, त्या लोथलच्या बाईच्या,

त्या कन्याकुमारीच्या, बंगप्रदेशातल्या कृष्णाच्या माईच्या

अगदी सगळ्यांच्या पान्हाची शपथ आहे तुला

काळालाही जिंकलय आम्ही, पोहोचलाय आमचा पान्हा

अगदी थेट, थेट तुझ्यापर्यंत, आता तुझी पाळी

आमचा काळ नको, तुझा काळ तू जग

तुझा कान्हा तू प्रसव, तुझा पान्हा तुझा तुला फुटो.

तो पान्हा सकस बनव, रसरशीत बनव

नवीन नवनीत घडव, धर्म, जात, भाषा, लिपी,...

कशाचेच बंधन नको, तरच पान्हा होईल सकस

हे भान ठेव फक्त, लक्षात ठेव, तूही एक माध्यम.

आपल्या सगळ्या पिढ्यांचे पुढच्या पिढीशी साधायचे

संवादाचे माध्यम फक्त! 

एक निरंतर, अविनाशी रसरशीत पान्हा!

---


 *लोथलचा सांगाडा*- सिंधु संस्कृतीतील एका जोडप्याचा सांगाडा लोथल येथील संग्रहालयात जतन केला आहे.

*दगडी सुरेल खांब*- कन्याकुमारी मंदीराबाहेर हे खांब आहेत त्यावर आघात केला की संगीतातील सगले सूर निनादतात.

*कृष्णवडातील नवनीत*- कलकत्यात वडाच्या झाडाचा हा एक प्रकार. याची पानं कोनासारखी वळलेली असतात, ज्यातून कृष्ण लोणी खातो असे मानले जाते.

Saturday, August 13, 2022

तारेवरचे पक्षी आपण



लांब लटकलेली तार
अन त्यावर बसणारे पक्षी.
काही उगा क्षणभर टेकलेले,
काही मोठा प्रवास करणारे.
काही स्थिर बसलेले,
तर काही झोके घेणारे.

काहींना आवडतं कसरत करत
तारेवर तोलत रहायला;
काही निसर्गाला मान तुकवून
उलट सुटल लटकलेले;
काही ठामपणे स्थिरावलेले
तर काही बावचळत रहाणारे.

कधी दुक्कल तर कधी एकांडे
कधी कळप तर कधी झुंड.
कधी कळपामधले एकटे,
कधी एकएकटे कळप.
कधी झुंडीने भांडणारे,
कधी एकोप्याने बसणारे.

काही तारेच्या लवचिकतेचा
मनसोक्त आनंद घेणारे;
तर काही त्या तारेच्या
अस्थिरतेवर चिडचिडणारे;
तर काही दोलायमानतेवर
आपले स्थितप्रज्ञत्व जोखणारे.

तसे सगळेच गरजेचे
तसे सगळेच आकर्षक.
तसे सगळेच जिवंत,
अन रसरशीत.
आपापल्या दृष्टिनुरूप
सुंदर आकर्षक.

तार आहेच, राहिलच;
जशी आहे तशीच.
शेवटी ठरवायचं
आपलं आपणच.
तर कोण व्हायचं,
अन कसं व्हायचं!
---

Friday, July 29, 2022

गोष्ट - तुमची आमची

आजी

पहाटे उठायची चूल पेटवायची
दुधाची चरवी ठेवून
केरवारे आवरायची
आन्हिकं उरकायची
सडासंमार्जन, रांगोळी, पुजा
मग सगळ्यांचा नाश्तापाणी
भाजी, भाकरी, भात आमटी...
दुपारची वामकुक्षी
संध्याकाळचा केरवारा
सांजवात, शुभंकरोती, रामरक्षा
तुळशीपुढचा दिवा लावणं
रात्रीचा स्वयंपाक, चूल सारवणं...
सगळं सगळं रोज तेच

आई
सकाळी उठायची गॅस पेटवायची
दुध, चहा ठेवून
केरवारे आवरायची
आन्हिकं उरकायची
उंबऱ्याबाहेरची रांगोळी, पुजा
मग सगळ्यांचा नाश्तापाणी
भाजी, पोळी, भात आमटी...
दुपारची वामकुक्षी
संध्याकाळचा केरवारा
सांजवात, शुभंकरोती, रामरक्षा
देवघरातला दिवा लावणं
रात्रीचा स्वयंपाक, ओटा सारवणं...
सगळं रोज तेच तेच

मी
सकाळी उठते
दूध फ्रिजमधून बाहेर काढते
सोबत लॅपटॉप स्टार्ट करते
गॅसवर दुध, चहा ठेवून
इमेल, नवीन मेसेज चेक करते
चहा पिता पिता
त्यांना उत्तरं देते
ब्रेकफास्ट, स्वयंपाक
मुलांची दप्तरं, डबे
त्यांची अर्धवट प्रोजेक्ट्स, रडारड
बस रिक्षाची वेळ
सगळं मार्गी लावून मग
आंघोळ पांघोळ आवरणं
डबा, पर्स घेऊन
स्कूटरला किक मारून
ऑफिस गाठणं
दिवसभरचं ऑफिस ऑफिस
मग प्रचंड दमवणारा ट्रॅफिक
मुलांचा अभ्यास
सटरफटर खाणं
धाकदपटशाचं शुभंकरोती
शक्तिपात झाल्यासारखं मग
वनटाईम मिल किंवा मग स्विगी
टिव्ही, फेसबुक, इन्स्टा
चकचकीत स्टोऱ्या पहात जेवण
जरा व्हॉटसअपवर चटरपटर
मुलांच्या कुरबुरी, अभ्यास
नवऱ्याचा रोमान्स अन
आपला निरुत्साह
उद्याची तयारी अन
एक दिवस पार पडला
म्हणून केलेलं हुश्य...
सगळं रोज तेच तेच

तर ही बाईची कथा
पुरुषाचीही अशीच
जरा तपशील इकडे तिकडे...

गोष्ट जन्म जन्मांतरीची
कि झेरॉक्सची
पण तुमची, आमची सर्वांची!
---

Wednesday, July 20, 2022

पिसारा

 


पिसारे असेच असतात न?

डौलदार, वळणदार, झोकदार

म्हटलं तर अलवार, हलके, तरल

एखादा वाऱ्याचा झोत

अन कसं सगळं 

सुरेख होऊन जातं.

अन मग त्यावर 

आपली एक पुसटशीच

पण ठाशीव स्वाक्षरी!


आयुष्य असच असतं नै?

---

Wednesday, July 6, 2022

आरस्पानी तळं

गोठलेलं तळं एक

आरस्मानी, हलकं निळं

तळ दिसेल इतकं स्वच्छ


पण जरा वाकून शोधाल

तळाशी काय बरं

तर अडकलात तुम्ही


ज्या क्षणी वाकाल

तुमचच प्रतिबंब येईल मधे

गढुळेल, आरस्पानी तळ


बर्फा खालचा खोल तळ

त्यावर आजचं प्रतिबिंब

सगळी सरमिसळ गुंतागुंत


खरा तळ शोधायचा तर

व्हायला हवं तुम्हीही

आरपार आरस्पानी!

---

Wednesday, June 29, 2022

कठोर वास्तव

नजरेच्या टप्यातलं सगळं क्षितीज
हळूहळू भरत जातं नभांनी
आधी पांढरे मग निळे, सावळे, काळे...
अन आपण गाडीत बसून जाताना
झाडांना कसं वाटत असेल
अगदी तसं जाणवून देत
हलके हलते डावीकडे सरकत जातात
आपलं छप्पर मात्र तसच कोरडं ठक्क
सृजनाच्या सगळ्या शक्यता समोर असून
आपली झोळी रिकामी ती रिकामीच....

Tuesday, June 21, 2022

वणवा



आज समोरचा डोंगर म्हणाला, 

"पोरी, काल पेटलेला वणवा.

कितीही वाचवावं म्हटलं तरी

उन्हानी रापलेले सारे तण

भराभर पेटत गेले,

त्यांची मुळं नव्हतीच खोलवर

वर वर वाढलेलं तण नुसतं.

मोठी झाडं मात्र तगली

खोलवरच्या मुळांनी पेलून धरली

झळांनी खोडं, पानं होरपळलीच

पण आतला ओलावा पुरून उरला

वणव्यातूनही जिवंत रहायला

उपयोगी पडला तो ओलावा!"


नात्यांचही असच असतं नं?

काही वरवरची, बेगडी नाती

अडचणींच्या वणव्यात

उभी पेटतात अन 

राख होऊन जातात

पण खरी नाती,

मनाच्या पोटातून 

ओलावा धरून असणारी

जगतात, तरतात, 

अजून घट्ट होतात

वणवा, आपलं-परकं

असं टळटळीतपणे 

शिकवून गेला...

---

Monday, June 20, 2022

जलद







 

कोण कुठले आप्त

भरभरून यायला लागलेत

आधी एखादाच तुरळक

पण मग एकाचा शेव पकडून 

दुसरा, तिसरा, भरगच्च गर्दी

कधी फेर धरत कधी झुंडीत

कधी भरगच्च कधी चुटपुट

कधी सुसाट कधी झुंबड


कुठल्या कुठल्या नदीचं

कुठल्या समुद्राचं

अन कुठल्या डोळ्यांतलं

जलद घेऊन चाललेत...

अडवणाऱ्या प्रत्येक डोंगराला

त्याचं त्याचं माप घालत

जलद चाललेत, मोठ्या प्रवासाला

वर्षभर साठवलेलं काय बाय

आळुमाळु उराशी लावत

भरत भरत राहिले

अन आता निघाले जलद

ज्याचं त्याचं देणं देत


एकदा सगळं भरभरून दिलं

मोकळा केला सगळा पसारा

सगळा उरक, सगळी देणीघेणी

की मग कसं मोकळंमोकळं

निरभ्र होऊन पुन्हा नवं जोडत

जगता येईल निळंनव्हाळं


आठवणींचही असच आहे न?

एकदा सगळा निचरा 

व्हायला हवाच अधूनमधून

मग नवीन आठवणींना 

भिडता येतं निळंनव्हाळं बनून

---



Monday, June 6, 2022

मुक्त???

टप टप टप टप

गळतच होते तिचे डोळे


केलेल्या कितीतरी तडजोडींची
हातभर जाळी तयार झालेली

अन नकोशी प्रत्येक गोष्ट
कपाळावर आठ्यांनी भरून गेलेली

दाबलेला प्रत्येक हुंदका
ओठांवरच्या दंत खुणांनी भरलेला

तिला आता खरच, खरच
सगळं नको नको झालेलं

अन मग घेतला मोठा श्वास
अन घेऊन टाकला एक निर्णय

आता ना ती कोणाची, कोणाचीच
आता फक्त तिची ती, मुक्त...

खरच असतात का अशा कोणी मुक्त
की कवितेतची एक वर्दळ नुसती...
---

Tuesday, May 31, 2022

टुमदार गाव

माणसाचं आयुष्य म्हणजे

एक वसलेलं टुमदार गाव!


बालपणी डुबकी मारायला

पायथ्याशी असणारा शांत किनारा

ये, पुढे ये म्हणत 

वाकुल्या दाखवणारी छोटी बोट

किनाऱ्यावरच्या छत्राखाली

मनसोक्त हुंदडणं.

अन तारुण्याच्या उभारीतलं

ते नावेतून स्वत:ला

झोकून देणं, 

स्वत:च्याच परिसीमा जोखणं.

मग कधी तरी किनाऱ्याशीच जरा दूर

आपली बोट नांगरणं

तिथून आपली उंची, आपलं प्रतिबिंब

सिद्ध करत रहाणं.

अन मग कधीतरी

उंचावरच्या पर्वतावर

बसून केलेली साधना,

मन:शांतीसाठी केलेले ध्यान.


या सगळ्यात आकाशीचा 

पांढरा शुभ्र, दिशा दर्शक

अभ्र बघायचा राहिलाच की...

अन राहिली सागरी 

दूर वर टाकायची नजर.


पण असो,

आभाळीचे निळे अन

समुद्राचे निळे

दोन्ही पोहोचलेच की थोडे थोडे.

अन हाती आलेले सगळं

टुमदार सजलं, सजवलं.

अजून काय पाहिजे?

शिवाय पर्वतराशीवरून का होईना,

शुभ्र अभ्र अन त्याचं तेज 

पोहोचलं थोडं थोडं.

म्हणतात ना, माणसाचं आयुष्य;

एक टुमदार गाव, वसलेलं! 

---

Saturday, May 28, 2022

सोनसळी

 


जशी निळ्याच्या ओठी 

साजिरी बासुरी

तशी जलाशयी सोनेरी 

उभी मध्यात मुरली


घन:श्यामाच्या बासुरीचे 

सूर आसमंती

सोनसळी मुरलीची 

आभा आसमंती


सुखदु:खाच्या भाऱ्यात 

शांत करी शाम

निसर्गाच्या कुशीतून देई 

आशेचा संदेश!

---

Tuesday, May 17, 2022

अळवावरचा थेंब

अळवावरच्या थेंबा सारखे, जमेल का मज जगणे?

कशातच मिळून न जाणे, असेल का ते जगणे?


भाव भावना, गुंत्यात त्या साऱ्या, हरवून जाणे

की साऱ्यातून निर्लेप राहणे, हे असेल जगणे?


पुस्तकांतील अनुभव, ज्ञान, विचार वाचित जाणे

की ध्यान धारणा, अध्यात्म साधणे, हे असेल जगणे?


समाजातील प्रत्येकाशी स्व:चे, नाते जोडत जाणे

की तुटूनी त्यागुनी, ध्यास तयाचा, हे असेल जगणे?


प्रत्येकाचा मार्ग असा, भिन्न विभिन्न असे

या सगळ्यांचे, सगळ्यातून जगणे, हेच असेल जगणे?

---

Friday, May 13, 2022

कृष्ण मंजिरी


दिवसभर केलेल्या तडजोडी, व्यवहार

सगळ्याची पुटं

चढत रहातात त्याच्यावर.

लोकांची पापं स्वत:वर घेत

त्यांना आशिर्वाद देत

तो सगळा राप स्वत:वर चढू देतो

भक्ताला आश्वस्त करत

सगळे शाप आपल्यावर

लेवत जातो.

अन मग दुसऱ्या दिवशी 

सचैल स्नानाने शुचिर्भूत होऊन

पुन्हा उभा रहातो कृष्ण, 

....... दर्शनासाठी!


स्नानाचे निर्माल्य आपसूक 

वाहिले जाते तुळशीला.

सगळी पापं येऊन पडतात 

तिच्या पायाशी.

अन तीही निमुटपणे, 

सगळ्यांचे सगळे अपराध पोटाशी घेते.

सगळा कळिकाळाचा काळा राप

लेवून घेते पानापानांवर, अंगभर

केलेलं सगळं कृष्णार्पण

शेवटी तिच्या नशीबी येतं.

कृष्णा, तू दिलेला काळेपणा 

उतरत गेलाय बघ वर्षानुवर्ष तिच्यात

अन गोरी , निर्वाज्य 

राधा बनलीय आता

..... कृष्ण मंजिरी!

---

Friday, April 22, 2022

कुणास ठावे

 


कशास आलो जगी मी या, कुणास ठावे

जगण्याची धुंदी तरी कशी मज, कुणास ठावे


भाजी भाकरी, खळगे भरणं करीतच आलो

जगण्याचा परि या उपेग काही, कुणास ठावे


प्रेम, आपुलकी, आदर यांचा प्रयत्न करीत आलो

यातूनी साधले का काही, कुणास ठावे


शिकणे आणि शिकवणे हे ही, करीत आलो

परि सगळ्याचा उपेग काही, कुणास ठावे


दया, कणव अन मदत सगळ्यांना करीत आलो

याने भले कुणाचे झाले काही,  कुणास ठावे


भाव इतरांचे जपणे - समजणे करीतची आलो

दु:ख किती कुणाचे हलके झाले, कुणास ठावे


कसा जगलो आयुष्य सारे कळतची नाही

जगलो का की बस, जीवंत होतो, कुणास ठावे

---

Monday, April 18, 2022

करु नको


प्रेमामधे पुरा न भिजला

प्रेम तयाला करु नको

मैत्र ज्याला पुरे न कळले

मित्र त्याला करु नको


अकुशल भावनेसोबत

कारागिरी करु नको

अर्धे मुर्धे जगणे अन

मरणेही अर्धे करू नको


धरलीस कास अव्यक्ताची तर 

घाई बोलाण्या करु नको

बोलण्याचा घेतलास वसा तर

मधेच थांबणे करु नको


मान्य गोष्ट एखादी तर

न मांडणे तू करु नको

अमान्य तुला असे काही

अस्पष्ट बोलणे करु नको


दिले कुणी अर्धे उत्तर 

स्विकार त्याचा करु नको

अर्धसत्य भवती वावरती

विश्वास त्यावर करु नको


पाहशील जी स्वप्ने तू

अपुरी पाहणे करु नको

अन आशेचे पाखरु तयाचे

पंख कापणे करु नको


अर्धा भरला पाण्याचा प्याला

तहान भागवणे करू नको

चतकोर तुकडा भाकरी साठी

जीव टाकणे करु नको


अर्धा रस्ता कोठलाच अन

ध्येय तुझे करु नको

अर्धवट विचारांनी मनाला

घेरुन घेणे करु नको


अर्धांग तुझे प्रेमाचे श्रेय

त्यास असे तू करु नको

आयुष्याचा वळणावरती

तुलाच विसरणे करु नको


अव्यक्त असा बोल एक

मनात ठेवणे करु नको

अन स्मित जरासे करणे

यास विसरणे करु नको


आप्तांच्याजवळ नसणे

हे कधीही करु नको

आप्त असुनि लांब असती

जवळ त्यांना करु नको


मित्र कोण अन मैत्र काय

भान सोडणे करु नको

तुझ्यातले मर्म तुझे

विसरणे करु नको

(खल़िल़ जिब्रानच्या एका गज़लवरून)

Sunday, April 17, 2022

माझ्याविना

मध्यंतरी पर्शियन गज़लकार रुमी ची एक गज़ल वाचलेली. मनात राहिलेली.

अन मग आज ही उतरली.


*माझ्याविना*


भटकंतीत त्या होतो मी, माझ्याविना

त्याच जागी सापडेन मी, माझ्याविना


मुखचंद्रमा जो मला पाहुनि लपे सदा,  

मत मांडुनि आपुलेची गेला, माझ्याविना


वाटले ज्या दु:खात मी संपलो होतो

तेच ते दु:ख जन्मे पुन्हा, माझ्याविना


कैफात फिरलो नेहमी मदीरेशिवाय

सुखातच मी होतो नेहमी, माझ्या विना


तू नकोस आठवू  मज कदापि हा असा

आठव ठेवेन मीच माझा,  माझ्याविना


माझ्या शिवाय खुष मी, सांगतो आहे

की रहा आपुल्यातच गुंग, माझ्याविना


रस्ते सगळे बंद होते मज समोरी

एक वाट परी खुली जाहली, माझ्याविना


लवलवत्या ज्योतीसमान ताजातवाना

जगण्याचा कैफ परि राहत नाही, माझ्याविना

---

Tuesday, April 12, 2022

तू बाई आहेस न म्हणून !



बाईनं कसं सोज्वळच असायला हवं
कितीही शिकली सवरली तरी
आत्मविश्वासाचा ताठा नको हो
बसताना शालिनतेनंच बसावं
चालताना ताठ, आत्मविश्वास नकोच
उभं रहाताना लवून नाजूक दिसावं
उंचनिंच, ताठ, खांदे सरळ, थेट नजर
छे, छे असं कसं चालेल बरं 
नाजूक, बारीक, कमनियच असायला हवं
अगदी सोळा पासून सत्तरी पर्यंतही हो.
तू बाई आहेस न म्हणून हो!

आवाजाचा पोत कसा हलका हवा
बोलावं किती याचं भान हवं
तुझा नाजुकपणा कसा टिकायला हवा
कोणते विषय बोलायचे, कोणते 
टाळायचे याचं सतत भान हवं
मोठ्यानं हसणं, टाळ्या देणं
हे सगळं टाळायला हवं
तू बाई आहेस न म्हणून हो!

काळ बदलला, तर शिक हो भरपूर
नोकरीही कर, गाड्याही चालव
पण मुलांची ने आण तूच कर
त्यांना वळण लावणं हे तुझच काम
स्वयंपाक पाणी, आला गेला
घर आवरणं, सुबक, सुंदर ठेवणं
हे सगळं तुझंच बरं का
त्यात हयगय नको
तू बाई आहेस न म्हणून हो!

कितीही शिकलीस, पदं मिळवलीस
तरी घर तुलाच नीट ठेवायचय
नाती गोती पै पाहुणा तूच बघायचायस
वाणसामान भाजीबिजी तुझीच कामं
ऑफिसच्या जबाबदाऱ्या, कामाच्या वेळा
ते तुझं तू बघ पण घरही तूच बघ हं
तू बाई आहेस म्हणून हो!

एकटीनं मजा करणं, आनंद मिळवणं
तसं ठिके म्हणा, म्हणजे कर तू.
पण कुटुंबाला धरून रहायला हवंस
दुसऱ्याने कितीही कटू बोललेलं,
तू ते सकारात्मकच घ्यायला हवं
इतरांनी तुझे दोष दाखवले, तर
तुझ्यात बदल करायला हवेसच
तुझं तुझं म्हणून काही का मत असेेना
कुटुंबा,समाजासाठी मुरड घालायला हवीस
तू बाई आहेस न म्हणून हो!

आणि हो, या अपेक्षा, ही दृष्टी
सगळ्याच समाजाची बरं का
बाई असो वा पुरुष तुला जोखताना
फरक नाही दृष्टीत अजिबात
तुझं बाईपण सगळे हिरीरीने तपासणार
आरशात स्वत:चं नाजूकपण सांभाळत
अन जगात दणकट जबाबदारी पेलूनही
तुला पहाताना, दुसरी बाईही असंच बघणार
तू बाई आहेस न म्हणून हो!
---

Sunday, April 10, 2022

नस्तलिख

(नुकतीच पर्शियन भाषा शिकले, तर त्यातील अक्षरांवर सुचलेली ही कविता. दुसऱ्या ओळीत ती अक्षर अन त्या आधी त्यांचे पर्शियनमधील नाव गुंफलय. खरं तर उलचं लिहिलं तर प्रेयसीवर कविता होईल पण मला लिपीवरच सुचली.)


शरमाके गर्दन घुमाई जो तुने देखके मुझको

गर्दन नहीं 'लाम' ل ही दिखा मुझको 


और झुका चेहरा तेरा चुनरींमें

चेहरा नहीं 'अएन' عـ ही दिखा मुझको 


दम घुटनेसे जो होठोंसे साँस ली तुमने

होठ नहीं 'हेय' ه ही दिखा मुझको 


पैरोंतले पायल तेरे छम्म से बाजे

घुंगरू नही 'चे' چا के ऩुक्तेही दिखे मुझको 


कलाम पढ़ते हुये झुकी जरा तुम तो

कमऩिय सी 'काफ' ک दिखा मुझको 


दामन जो तेरा, हलकेसे पकडा मैने

दामन नही 'रे' ر का फर्राटा दिखा मुझको 


ठोडी जो तेरी हलकेसे उठाई मैने

नाजुकसा 'दाल' د दिखा मुझको 


जाते हुये इक बार मुडके देखा तुने

तू नही कमसिन सा 'मीम' م दिखा मुझको 


तुझे अनोखा कहु, बेमिसाल या अवल कहुँ

तेरी हर अदा 'नस्तलिख' में दिखती है मुझको









Wednesday, March 23, 2022

अस्तित्व की पहचान

वह कहते है, न सोच;

"उस" ने लिख रखा है!

मै कहू की गर न सोचू

तो क्या खाक जिंदा हू ? 


समझेगा हिज्र की रातको;

न वह है, न मेरी सोच है

न जिंदगी, न सभ्यता, न हक है

बस अंतरिक्ष में उभरा हुवा ओम है!

---

वह कहते है, न सोच;

"उस"ने लिख रखा है!

वह- समाजाचे नेते, इथे धर्ममार्तंड; म्हणतात की जीवन कसं जगावं याबाबत तू काही विचार करू नकोस.

त्याने, म्हणजे प्रेषिताने ते लिहून ठेवलय; म्हणजे आपल्या धर्मग्रंथात सांगितलय तसं जग. 


मै कहू की गर न सोचू

तो क्या खाक जिंदा हू ?

पण मी म्हटलं की, मी जर विचारच केला नाही तर;

मी जिवंत आहे असंच असणार नाही- इथे देकार्ट सूचवायचाय - आय थिंक देअर फर आय अॅम 


समझेगा हिज्र की रातको

न वह है, न मेरी सोच है

(हिज्र म्हणजे सेपरेशन) जीवन आणि मृत्यू यांच्यापासून अलग होण्याच्या दिवशी- म्हणजे जेव्हा पापपुण्याचा हिशोब केला जाईल त्या रात्री; 

तुला समजेल की प्रेषित वगैरे काही नसतं, ना तुझी विचार करण्याची क्षमता ( म्हणजे तू स्वत:); 


न जिंदगी, न सभ्यता, न हक है*

बस अंतरिक्ष में उभरा हुवा ओम है

ना काही जगण्याचे महत्व (कसे जगताय, जगण्याचे नियम म्हणजेच धर्म), ना कोणती संस्कृती, ना कोणता देव (हक म्हणजे खुदा - देव) 

यातलं काहीच नाही;

तर अंतराळात फक्त ओम हा आवाज उमटत असतो (असं म्हणतात की कॉसमिक साऊंड ओम सारखा आहे, तो संदर्भ) 


एकुणात जगण्याबद्दल, त्याचे नियम, धर्म, तत्वज्ञान, इतिहास, संस्कृती हे सगळं फोल आहे, शेवटी मानव हा एक क्षुद्र जीव आहे विश्वाच्या पसाऱ्यात. अन 50-80 वर्ष हा एका व्यक्तीचा जीवनकाळ हाही नगण्य आहे विश्वाच्या कालमर्यादेत.






Wednesday, March 16, 2022

साथ

फोटो:  अश्विनी पत्की


तुला पाहिले अन 

थबकले जरा मी

वळले लगेच अन 

प्रवाही बनले मी


तुझ्या दो बाहुंनी

दिले आवतण मला

वळले मग बाजुंनी

आस लागली मला


पाहण्या वाकलास तू

मज शोधण्यास खाली

अन मग मी बने तू

बिंब प्रतिबांबास जळी


बंध जन्मोजन्मीचा

कधी इथे, कुठे कधी

खेळ जिवा शिवाचा 

हा असे जन्मोजन्मी

- ---

चल, पुन्हा लढूत!

फोटो: सोनाली मालवणकर
फोटो: सोनाली मालवणकर


मला हवाय तो प्रकाश

दूरवर दिसणारा 

जगण्याची धडपड करणाऱ्या

न झोपणाऱ्या शहराची

ती अविरत जीवनेच्छा

आसुसून प्यायचीय

जिवाच्या निकराने पाय मारत

पोहोचायचय त्या पर्यंत

मनातली सारी खळबळ

पायाच्या रेट्याने उडवून द्यायचीय

अन सरसर आवाजाच्या तालात

मन शांत करत नेणारा

हा अदभूत एकांतही

सुखावतेय तनमनाला

नव्या उन्मेषाचे खुणावतेय

एक सकारात्मक विश्व

दुरत्वाच्या अस्तित्वाला

पचवण्याची ताकद मिळवून

चाललेय परत त्या शहराकडे

एक नवी उमेद, 

एक नवी सकाळ

मनाला बुद्धीशी जोडून

पुन्हा दोन हात करत

परतेय आता शहराकडे!

---

Monday, March 14, 2022

इतिहास वगैरे


 काळ्या कसदार मातीतून वर आलेलो मी.

आज एक नवी पालवी फुलटीय कोवळी,

तिचा नारिंगी भगवा रंग

तिचा कोवळेपणा

सृजनाचा प्रयत्न

फार भावलाच.

पण त्याहून भावला 

तो तिचा इतिहासाशी

नाळ जोडण्याचा प्रयत्न! 


मागे, खाली 

तपशील हरवलेला 

इतिहास दिसतोय?

हो तोच कणखर, दगडी

स्वत:चं एक अस्तित्व 

उभं करून तग 

धरून असलेला.

हा, आता काहींना 

दिलाय विटांच्या

भगव्या रंगाचा 

गिलावा, कुठेकुुठे.

लपलेत काही तपशील,

काही नवेच आयाम

उमटलेत त्यावर.

काही हरवलेत बुरुज,

उगवलीत काही  

नवी बांडगुळं.

पण आहे न, आहेच.

तिथे उभा इतिहास;

माझा समृद्ध वारसा! 


हा, आता माझी

पाळंमुळं नाहीत तिथवर...

पण आहे, पाठिमागे

तो इतिहास.

मग मी माझ्या नव्या

गुलाबी लव्हाळ्याला

मागच्या भगव्य़ा गिलाव्याशी

जोडू पहातो, 

उर कसा

अभिमानाने 

दाटून येतो.

खाली पाण्यात पडलेल्या

जुन्या खोडाच्या 

हिरव्या डेरेदार 

प्रतिबिंबात आणि 

माझ्या जुन्या 

पानांमधला हिरवेपणा 

मला नाही 

बघावा वाटत.

ते साधर्म्य मला 

फारच सुमार वाटतं.

मग पानाच्या टोकाशी

कळत नकळत दिसणारा

वास्तवाचा कराल 

मातकट रंग त्या

जुन्या भिंतीतल्या चिऱ्याशी

कसा जुळतोय 

हेच शोधत 

खुष होतो मी.


पायाखालची जमीन 

दिसत नाही तेच बरय;

नकोच दिसायला ती.

तिचा सुपीक, 

काळाभोर रंग

अजिबात जुळत नाही

त्या मागच्या भव्यदिव्य

इतिहासाशी!

अन हो, ही नव्हाळीही

आपली वानगी दाखल हो!

तिनं आयुष्यभर 

असं भगवं वगैरे

रहावं, असं नाहीच हं!

शेवटी निसर्ग आहे, 

नियम आहेत,

संसार आहेत

जबाबदाऱ्या आहेत.

यात कुठे हो वेळ?

अन माझी परंपरा

कौटुंबिक रुढीही... 

कुठे हो इतिहासाशी

बांधलेलं सगळं?

तो इतिहास कसा

दूरून उत्तुंग वगैरे.

तो वर्तमान असताना;

मी, माझे वंशज

नेहमीच दूर असतो हो.

अहो त्याशिवाय 

मी जगलो कसा असतो?

इतिहासातच विरून 

नसतो का गेलो? 


पण काही म्हणा हं

आज या सृजनामुळे

माझी त्या इतिहासाशी

नाळ जुळली 

हे खरच, 

अभिमानाचच! 

छाती कशी

अभिमानाने

फुलून 

आलीय!

---

Thursday, March 3, 2022

जाणीव



तुझ्या आत आहे एक 

प्रकाशाचे रोपटं!

तुझं तू जाणलस 

तर ठिकच.

अन्यथा काही खरं नाही

प्रकाशाचं!

Wednesday, March 2, 2022

दोस्त



दोस्त समझ कर तुझे,

जो बिठाया पलकोंतलें

ढुँढता चला गया तू

मेरी रुह को, जर्रें जर्रें


न मिला दिल तो मेरा,

खंजीर को चलाता गया

देखता गर गिरेबान में

वही तू पाता दिल मेरा.







Sunday, February 20, 2022

सागर की हर एक लहर, आहट देती रहती है

तुम्हारे आने की, मगर जिंदगी चली जाती है


कितनी बहारें आयी, सुनी सी चली गयी है

खडी मै पेड जैसे, एक जमाना हो चला है


कैद हो गयी हुँ मै अब, जमाने की ढुँढती निगाहे है

हवा का एक झोका, सुखे पतोंको बीखेर देता है

---

Saturday, February 19, 2022

घनगर्द

फोटो नेट वरून साभार

निसर्गाची किती कोडी

किती गहन गुपितं

हिरव्या पाचूत लपवलेली.

गुहेत त्या शिरावं का

मीपण मिटवून 

सामावून जावं का

थोडी भिती थोडी हुरहूर

मनात घट्ट धरावी का

धीट होऊन शिट्टी मारत

भिडावं का त्या हिरव्याला

असेल त्या घनदाट मिट्ट 

गुहेच्या अंधारा आत 

एक नवीन सुर्य!

---


 

Friday, February 18, 2022

धर्माचे किल्ले

किल्यांआतले किल्ले

भलीभक्कम तटबंदी

बांधीव फरसबंदी

सशस्त्र शिलेदार!

कित्येक, कायकाय, 

कोणकोण बंदिस्त!


गुपितं, खलबतं

नियम, कटकारस्थानं

चिमणीतला धूर

वाजणाऱ्या घंटा

पाळतीवर क्रूस

समाजावरचा अंकुश!


काय कसं 

कधी कुठं

कोण जाणं

धर्माचा भस्मासूर

बदलणारा कसूूर

श्रद्धेचा पूर...!

Saturday, January 8, 2022

नाणेघाट धबधबा

खळाळ डोंगरावरुनी वाहे

खोल खाली छलांग घेते

मस्तीतच मग होऊनि हलके 

उन्मेषाचे शुभ्र पटल उभे


जगण्याचे हे नवे उमाळे 

झोकुनी सारे परी उडे 

खोल दरीची भिती नसे

आकाशा जोडशी तू नाते


प्रवाह दूर किती पसरला

प्रपात  सलग परि एकला

दुधाट धुक्याचा गडद पडदा

वाऱ्यावर वाही उंच फवारा


सोडता कड्याचा साथ जरासा

उंचावूनि पुन्हा भिडशी परतसा

पाश हळुच सोडता त्याचा 

देशी दुलई डोई त्याच्या

-