Thursday, October 19, 2023

नद - नाद

एक छोटासा झरा
खळाळ वहात
कधी असेच काही झरे
येऊन मिळतात त्याला
कधी संचित, कधी देन
कधी संस्कार, कधी संस्कृती
कधी श्रेय, कधी धडपड
तर कधी
त्याचाच एक तुकडा
सुटतो, वेगळा होतो
माहित नाही कसा, कुठे
स्वतंत्र वाट शोधत
अलग होतो, दृष्टी आड होतो
आपापला मार्ग शोधत जातो...

झरा वहात रहातो
आपला मार्ग ठरवत
हळू हळू आवाका वाढत,
वाढवत ही
कधी खळाळ
मग कधीतरी संथ, खोल
कधी इतका सृजन
की फुलवत जातो 
आजुबाजुला
कधी केतकीचे बन
कधी निवडुंगाचं रान
कधी निशिगंधाचे खळे
कधी पोटापाण्यासाठी
भाजीभाकरीची ताटं
तर कधी विचारांचे
गहन गूढ अंधारबनही!

पेरत, फेकत दमून भागून.
कधी नुसताच संथ शांत
नाही एकही तरंग.
कधी पुन्हा उंच, खोल
प्रपात, धबधबा
पुन्हा कधी पसारा, अथांग
कधी खळाळ
कधी धीरगंभीर, सखोल
कधी आत्ममग्न, कधी व्यक्त
कधी संवाद, कधी मूक
कधी भसाभस
कधी गप्प...

अन मग सगळ्या
धकाधकी नंतरचा
सापडलेला आतला
एक धीरगंभीर शांत नाद
आपल्याशीच आपला
अविनाशी संवाद
लप लप समुद्र गाज
अथांग, अज्ञाताशी गूढ संवाद!