Saturday, March 16, 2024

अनुभव

तास भराच्या योगा नंतर

सगळी गात्र दमली, थकली

आता सगळं हलकं हलकं

मन शांत, एकाग्र ध्यान.

अलगद बंद चंक्षु समोर

एक अलवार ढग तरंगतोय

अन त्यासमोर मी निश्चल.

आसपासचा थंड गार वारा

एक भरून राहिलेली तृप्तता

शांतीचा तो अविरत अनुभव

अस्तित्वा शिवाय तरंगत रहाणं.

हलकेच ढग पुढे येतो

त्याचा न कळणारा स्पर्श

तरीही तन मनाला जाणवणारं

हलकेच अलवार एक चुंबन!


एक तरल अनोळखी अनुभूती

अन लगेच वास्तवाची जाणीव

प्रखर, उन्नत, धगधगती जाग

एक क्षण थरथरलं मन

शरीर उसासलं, हृदय धडधडलं

तक्क्षणी जाणवंलं, आहे आहे,

अजून जिवंत आहे मी!

अन मग गेलेला क्षण

तो पुन्हा आठवू पहातेय

शक्यता आहे, तयार करतेय

माझी मलाच मी, त्यासाठी.

किती मजेशीर आहे हे 

हे सगळं जाणणं जमलं

याची देही, हृदयी अनुभवला 

मनी झेलला, पचवला तो

किस ऑफ द डेथ!