Wednesday, June 29, 2022

कठोर वास्तव

नजरेच्या टप्यातलं सगळं क्षितीज
हळूहळू भरत जातं नभांनी
आधी पांढरे मग निळे, सावळे, काळे...
अन आपण गाडीत बसून जाताना
झाडांना कसं वाटत असेल
अगदी तसं जाणवून देत
हलके हलते डावीकडे सरकत जातात
आपलं छप्पर मात्र तसच कोरडं ठक्क
सृजनाच्या सगळ्या शक्यता समोर असून
आपली झोळी रिकामी ती रिकामीच....

Tuesday, June 21, 2022

वणवा



आज समोरचा डोंगर म्हणाला, 

"पोरी, काल पेटलेला वणवा.

कितीही वाचवावं म्हटलं तरी

उन्हानी रापलेले सारे तण

भराभर पेटत गेले,

त्यांची मुळं नव्हतीच खोलवर

वर वर वाढलेलं तण नुसतं.

मोठी झाडं मात्र तगली

खोलवरच्या मुळांनी पेलून धरली

झळांनी खोडं, पानं होरपळलीच

पण आतला ओलावा पुरून उरला

वणव्यातूनही जिवंत रहायला

उपयोगी पडला तो ओलावा!"


नात्यांचही असच असतं नं?

काही वरवरची, बेगडी नाती

अडचणींच्या वणव्यात

उभी पेटतात अन 

राख होऊन जातात

पण खरी नाती,

मनाच्या पोटातून 

ओलावा धरून असणारी

जगतात, तरतात, 

अजून घट्ट होतात

वणवा, आपलं-परकं

असं टळटळीतपणे 

शिकवून गेला...

---

Monday, June 20, 2022

जलद







 

कोण कुठले आप्त

भरभरून यायला लागलेत

आधी एखादाच तुरळक

पण मग एकाचा शेव पकडून 

दुसरा, तिसरा, भरगच्च गर्दी

कधी फेर धरत कधी झुंडीत

कधी भरगच्च कधी चुटपुट

कधी सुसाट कधी झुंबड


कुठल्या कुठल्या नदीचं

कुठल्या समुद्राचं

अन कुठल्या डोळ्यांतलं

जलद घेऊन चाललेत...

अडवणाऱ्या प्रत्येक डोंगराला

त्याचं त्याचं माप घालत

जलद चाललेत, मोठ्या प्रवासाला

वर्षभर साठवलेलं काय बाय

आळुमाळु उराशी लावत

भरत भरत राहिले

अन आता निघाले जलद

ज्याचं त्याचं देणं देत


एकदा सगळं भरभरून दिलं

मोकळा केला सगळा पसारा

सगळा उरक, सगळी देणीघेणी

की मग कसं मोकळंमोकळं

निरभ्र होऊन पुन्हा नवं जोडत

जगता येईल निळंनव्हाळं


आठवणींचही असच आहे न?

एकदा सगळा निचरा 

व्हायला हवाच अधूनमधून

मग नवीन आठवणींना 

भिडता येतं निळंनव्हाळं बनून

---



Monday, June 6, 2022

मुक्त???

टप टप टप टप

गळतच होते तिचे डोळे


केलेल्या कितीतरी तडजोडींची
हातभर जाळी तयार झालेली

अन नकोशी प्रत्येक गोष्ट
कपाळावर आठ्यांनी भरून गेलेली

दाबलेला प्रत्येक हुंदका
ओठांवरच्या दंत खुणांनी भरलेला

तिला आता खरच, खरच
सगळं नको नको झालेलं

अन मग घेतला मोठा श्वास
अन घेऊन टाकला एक निर्णय

आता ना ती कोणाची, कोणाचीच
आता फक्त तिची ती, मुक्त...

खरच असतात का अशा कोणी मुक्त
की कवितेतची एक वर्दळ नुसती...
---