Sunday, February 12, 2023

निर्झरी


वाहते कधीची, ही नदी निर्झरी

शोधित चाललो, तू न मी दिगंतरी


दोन काठांवरी, नांदते वेगळी

पण कशी कोणती, नाळ आहे अंतरी


नात्यात आपुल्या, जाहल्या पडझडी

पण पुन्हा सांधल्या, मनाच्या ओंजळी


दावितो मी तुला, गगनी ही तर्जनी

सारे दाविशी तु, तुझिया दो अंजनी


पुजते जग सारे, मजसी अंतर्यामी

अन मनी माझिया, तूच तू निर्झरी'

---


कान्हा राधेसाठी उरे

अंधाराला पडे

चांदण्याचे खळे

बाभळीला आले

निशिगंधाचे कळे


दाट जंगलातले

निळेशार तळे

गुज मनातले 

मनालाच कळे


साज चांदण्यांचे

गाज किनाऱ्यांची

निळेशार हले 

मनाच्या तळ्याशी


शंखशिंपले, मोती

बांधलेली घट्टनाती

संवाद अविनाशी

मनाचा मनाशी


भोवरे नदीच्या कुशीत

ब्रम्हांड मनात ठेवले

साऱ्या विश्वाचा होऊन

कान्हा राधे साठी उरे

---