Tuesday, May 31, 2022

टुमदार गाव

माणसाचं आयुष्य म्हणजे

एक वसलेलं टुमदार गाव!


बालपणी डुबकी मारायला

पायथ्याशी असणारा शांत किनारा

ये, पुढे ये म्हणत 

वाकुल्या दाखवणारी छोटी बोट

किनाऱ्यावरच्या छत्राखाली

मनसोक्त हुंदडणं.

अन तारुण्याच्या उभारीतलं

ते नावेतून स्वत:ला

झोकून देणं, 

स्वत:च्याच परिसीमा जोखणं.

मग कधी तरी किनाऱ्याशीच जरा दूर

आपली बोट नांगरणं

तिथून आपली उंची, आपलं प्रतिबिंब

सिद्ध करत रहाणं.

अन मग कधीतरी

उंचावरच्या पर्वतावर

बसून केलेली साधना,

मन:शांतीसाठी केलेले ध्यान.


या सगळ्यात आकाशीचा 

पांढरा शुभ्र, दिशा दर्शक

अभ्र बघायचा राहिलाच की...

अन राहिली सागरी 

दूर वर टाकायची नजर.


पण असो,

आभाळीचे निळे अन

समुद्राचे निळे

दोन्ही पोहोचलेच की थोडे थोडे.

अन हाती आलेले सगळं

टुमदार सजलं, सजवलं.

अजून काय पाहिजे?

शिवाय पर्वतराशीवरून का होईना,

शुभ्र अभ्र अन त्याचं तेज 

पोहोचलं थोडं थोडं.

म्हणतात ना, माणसाचं आयुष्य;

एक टुमदार गाव, वसलेलं! 

---

Saturday, May 28, 2022

सोनसळी

 


जशी निळ्याच्या ओठी 

साजिरी बासुरी

तशी जलाशयी सोनेरी 

उभी मध्यात मुरली


घन:श्यामाच्या बासुरीचे 

सूर आसमंती

सोनसळी मुरलीची 

आभा आसमंती


सुखदु:खाच्या भाऱ्यात 

शांत करी शाम

निसर्गाच्या कुशीतून देई 

आशेचा संदेश!

---

Tuesday, May 17, 2022

अळवावरचा थेंब

अळवावरच्या थेंबा सारखे, जमेल का मज जगणे?

कशातच मिळून न जाणे, असेल का ते जगणे?


भाव भावना, गुंत्यात त्या साऱ्या, हरवून जाणे

की साऱ्यातून निर्लेप राहणे, हे असेल जगणे?


पुस्तकांतील अनुभव, ज्ञान, विचार वाचित जाणे

की ध्यान धारणा, अध्यात्म साधणे, हे असेल जगणे?


समाजातील प्रत्येकाशी स्व:चे, नाते जोडत जाणे

की तुटूनी त्यागुनी, ध्यास तयाचा, हे असेल जगणे?


प्रत्येकाचा मार्ग असा, भिन्न विभिन्न असे

या सगळ्यांचे, सगळ्यातून जगणे, हेच असेल जगणे?

---

Friday, May 13, 2022

कृष्ण मंजिरी


दिवसभर केलेल्या तडजोडी, व्यवहार

सगळ्याची पुटं

चढत रहातात त्याच्यावर.

लोकांची पापं स्वत:वर घेत

त्यांना आशिर्वाद देत

तो सगळा राप स्वत:वर चढू देतो

भक्ताला आश्वस्त करत

सगळे शाप आपल्यावर

लेवत जातो.

अन मग दुसऱ्या दिवशी 

सचैल स्नानाने शुचिर्भूत होऊन

पुन्हा उभा रहातो कृष्ण, 

....... दर्शनासाठी!


स्नानाचे निर्माल्य आपसूक 

वाहिले जाते तुळशीला.

सगळी पापं येऊन पडतात 

तिच्या पायाशी.

अन तीही निमुटपणे, 

सगळ्यांचे सगळे अपराध पोटाशी घेते.

सगळा कळिकाळाचा काळा राप

लेवून घेते पानापानांवर, अंगभर

केलेलं सगळं कृष्णार्पण

शेवटी तिच्या नशीबी येतं.

कृष्णा, तू दिलेला काळेपणा 

उतरत गेलाय बघ वर्षानुवर्ष तिच्यात

अन गोरी , निर्वाज्य 

राधा बनलीय आता

..... कृष्ण मंजिरी!

---