Saturday, March 18, 2023

सप्तपदि


चालवुनि चाका, गरगरा पायी

भेटीलागी जिवा,
चक्रधारी!

चालविशी किती, अनाथांच्या नाथा
आस लागली,
पंढरीनाथा

सोडोनिया सारा, सग्यांचा संग
आलो पायाशी,
पांडुरंग

धावाधाव किती, पडतो पाया
भेट आता,
पंढरीराया

ओव्या, अभंग आणि विराणी
तुची सांग,
विठाई

डोईवरी हात, ठेवी आजोबा
त्यांच्यात पाही,
विठोबा

अभंग गाई, तुक्याची सावली
मज सावरी,
विठुमाऊली

संपत्ती सत्ता, संपेना हाव
सुटो पाश,
गुरूराव

विचार, वंचना, वादळ मिटलं
टेकतो माथा,
विठ्ठल

भवसागर संपला, सुटेना तरी
भास मनाचा,
श्रीहरी

उखडेल कधी, वरलिया रंग
भरुनिया राही,
पांडुरंग
---

Wednesday, March 15, 2023

गारठा



तुहिन वादळ

बर्फाळ चादर


हिमाचा पाझर

दुलई धवल


छतांवर भुरा

ओलेत्या वाटा


शांत गावकूस

नाही मागमूस


पानोपानी ओस

ओथंबला कोष


गारठे आसमंत

परिपक्व हेमंत!

--

Tuesday, March 14, 2023

गारुड!


एक निरस स्थिर चित्र समोर!
कबुतरी रंगाचे छपरांचे डोंगर
राखाडी रंगांचे निष्पर्ण वृक्ष
हिरवे, रुखे, काटेरी झुडुपं
वा जाडेभरडे काटेरी पाईन
सुनसान रस्ते चित्रातल्यासारखे
एखादीच सुळकन पळणारी गाडी
वातावरणात भरून राहिलेले मळभ
हाडांपर्यंत पोहोचणारा गारवा


अन मग जादू व्हावी तसे

अचानक वरून पाझरू लागतो
पांढरा शुभ्र हलका कापूस
वाऱ्यावर हवे तसे झुलणारे
नजर ठरूच न देणारे हे पुंजके
सारा आसमंतच बदलून टाकणारे
स्थिर चित्राला सजीव करणारे
अलगद, अगदी आपल्याही नकळत
स्वप्नाच्या घेऊन जाणारे, एक गारुड!