Friday, February 26, 1988

खामोशी

तसा जगाने ही
अन्याय केला होता
माझ्यातल्या मला ही
वेगळे मानले होते.

तुझा आजचा हा
हेका सामर्थ्यशाली
मला कळला नाही
न कळो कधीही.

तुझ्या मनातल्या
माझ्या स्पंदनांचा
जो आकार होता
तो वेगळा होता.

का गोंधळ नात्याचा
घातलास तू ही
होता आधार तूच
मज आज समजण्याचा.

होता राग माझा
माझ्या न समजण्याचा
अन तू ही तेच केले
मज आवरेना उमाळे.

झालाच भावनांचा
कडेलोट परतोनि
पण तो वेगळा होता
अन हा वेगळा आहे.

Saturday, February 13, 1988

युटोपीयन शोध

वाटेवरचा हिरवा किडा
अजूनही वळवळतो आहे
अंतरीच्या गूढ गर्भी
हिरवा चाफा शोधतो आहे

डोळ्यावरच्या तिरीपेसाठी
पिंपळ छाया शोधतो आहे
पौर्णिमेच्या चंदनरात्री
तिसरा डोळा शोधतो आहे

पानगळीच्या गालीच्यावर
हिरवे पान शोधतो आहे
भावनेच्या वातीसाठी
नास्तिक देव शोधतो आहे

वाटेवरचा हिरवा किडा
अजूनही वळवळतो आहे
पानगळीच्या गालीच्यावर
हिरवे पान शोधतो आहे

अंतरीच्या गूढ गर्भी
हिरवा चाफा शोधतो आहे