Monday, November 23, 2020

सोपं नसतंच...

खळाळत्या नदीत पाय 

सोडून तर काय

कोणीही बसेल


ना कुठली चिंता

ना निसरडे दगड पायाखाली

झुळझुळ वाहणारं 

स्वच्छ, आरसपानी पाणी

थोडं गार थोडं उबदार

क्षणाक्षणाला जिवंतपणाची

उसळत्या उन्मेषाची ती अनुभुती!


खळाळत्या नदीत पाय 

सोडून तर काय

कोणीही बसेल


खरा धाडसी तोच

जीवनाला जोखण्यासाठी

जो डोहात उतरेल


डोह; काळाशार, निशब्ध!

तळ न दिसणारा

क्षणात पाय निसटेल

अशा अनेक अनुभवांची

शेवाळी काठावर घेऊन बसलेला

अन काळी-पांढरी नव्हे 

तर अनेकरंगी अनुभवांना 

पोटात सामावून घेतलेला


अशा डोहात 

नुसतं पाय बुडवणंही

सर्रकन काटा आणणारं

त्याचा थंडगार दचकवणारा स्पर्श

शिळेसारखा काळाकभिन्न रंग

खोल खोल नजर न टिकणारा.

जितकं खोल बघावं;

भूल पडत जाणारा गहिरेपणा

चढत जाणारी एकटेपणाची गुंगी

आणि आत आत भिनत जाणारे

गुढ गंभीर आपल्यातलेच

एक अनाकलनीय साधुत्व


डोहात पाय सोडून बसणं

आत उतरणं... छे...

नसतच अजिबात सोपं