Friday, April 17, 2020

सुनसान शहर, शहर,गल्ली, घर

( गोरखनाथांचे एक निर्गुणी भजन सतत कानात वाजत असतं; शून्य गढ शहर... आज ते मनात वेगळं घरं पाडत गेलं... )

सुनसान शहर, शहर,गल्ली, घर
कोणजाणे सगळे कुठेयत
मी माझा,माझ्यात मी
बाहेर शांत पण काहूर आत

गाव, माणसांशिवाय
मोहला, माणसांशिवाय
बाजार सारा, माणसांशिवाय
सारेच कसे ओस, ओस, ओस ...

मुलांशिवाय शाळा शांत
मुलांशिवाय मैदानं शांत
मुलांशिवाय ओसरी शांत
घरातही मुलं शांत शांत शांत ...

धडधडणारी मशीनं बंद
उंचावणारे बांधकाम बंद
रोजगाराची टपरी बंद
मुकाट जत्था चाल चाल चाल...

दवाखाना, डॉक्टर नर्स मामा
प्रयोगशाळा, तपासणी
सरकार, प्रशासन, यंत्रणा
गडबड, ताण अन धाव धाव धाव ...

नदी शांत, संथ, स्वच्छ
हवा शांत, संथ, स्वच्छ
निसर्ग शांत, संथ, स्वच्छ
विषाणू मात्र जगभर फिर, फिर , फिर ...

कधी संपेल भयाण, भयाण शांतता
कधी उजाडेल जुनी
लगबगती सकाळ
बाहेर काहूर , मनात शांत शांत शांत ...