Sunday, December 6, 2020

झाडोरा

सोनाली मालवणकर हिने काढलेला फोटो

पानांफुलांना वरदान असतं उमलण्याचं

पण सोबत येतो शापही गळण्याचा

पानाफुलांचे रंगही चमकते तजेलदार

पण सुकण्याचाही वसा ओटीत

फांद्यांचे उमलणे, दिसणे

सगळेच कसे कसनुसे

पण त्यांना नाही शाप गळण्याचा

मोडली एखादी तरी 

तरून जाते इतरांच्या आधाराने

अन मग त्यांनाच वसा मिळतो

नवोन्मेषाचा, सृजनाचा अन

नव्या जन्मांच्या अनुभूतीचाही!

Tuesday, December 1, 2020

प्रवाह !

या  टप्यावर थांबून जरा वळून

पहातोय मागून वाहात आलेल्या आयुष्याकडे.

खळाळते माझेच आयुष्य

किती साहसी दिसतेय

असा होतो मी? 

इतका जिवंत सळसळता?

आता सगळ्या अनुभवांमधून जात

किती शांत झालोय

स्थिरावलोय

खोलीही आलीय.

असं नुसतं वाटतय? 

की खळबळ आहेच 

आताही, आसपास?

हम्... आयुष्य 

एक खळाळ नुसता !

बयो...



अगदी मान्य बयो

तुझी तुटूनच गेली नाळ

ज्यांच्याकडे आधारासाठी 

हात पुढे केलास

त्यांनीच चार स्वाक्षऱ्या 

पुढे केल्या फक्त

अगदी मान्य आहे बयो

ज्याने भरभक्कम 

पाठीमागे उभं रहायचं

राखीचे नाजूक बंध 

तोडून टाकले त्यानेच


अगदी मान्य आहे बयो

 ज्या जमिनीत तुझी नाळ पुरली

तिथे नाहीच फुटला 

पाझर मायेचा

अगदी मान्य आहे बयो

सगळं झुगारून 

झटलीस असाध्याशी

मात्र त्या झगडण्याचा 

अधिकारच प्रश्नांकित झाला

परंपरेला पुढे नेण्यासाठीचा 

तु मांडलेला नवा मार्ग

पार पार डागाळून टाकला त्यांनी


बयो सगळं सगळं मान्य आहे गो

पण बयो कितीतरी धागे

तसेच विखरून पडलेत बघ

तुझ्याशी जोडलेली नाळ

अजून ओलीय बघ त्या जिवाशी

जिवाशिवाचा साथी तोही

थांबलाय बघ अवाक होऊन

तुटलं तुटलं वाटत असतानाही

आज पोटात तुटणारी 

तुझी माणसं तळमळताहेत

अनेकांना श्वास मिळावा 

म्हणून तू लावलेली हजारो झाडं 

आज श्वास धरून स्तब्ध

मनोमन आशिर्वाद देणारे 

ते विस्कटलेले हात

दुवा मागताना कापताहेत बघ

नव्या स्वप्नांमधे गुंगलेले कितीतरी डोळे

नुसते नुसते पाझरताहेत- वांझपणे

नवं जग नवं विश्व नवं स्वप्न

सगळं कसं पारोसं होत पडून राहिलय


बयो बयो सगळं तसच 

सोडून  जाताना

एकही नाजूक धागा 

नाही का ग आठवला

नाही का ग 

एकही धागा गुंतला 

तुझ्या पायात हातात

बयो अगदी मान्य 

तू सुटलीस

पण सुटला का ग 

गुंता सगळा

बयो...