Monday, October 31, 2022

भान वास्तवाचे

तशी मऊ गोधडी असतेच

उबदार, आधार देणारी,
अनेक पिढ्यांचे वात्सल्य पांघरून
त्या कोझीपणात वाटतच छान
ती सहानुभूती, सहसंवेदना, आपुलकी,...
अगदी सारं सारं, खरच वाटतं
आश्वासक, सुरक्षितता देणारं...

पण एक लक्षात ठेवावच लागतं,
ती गोधडी ओढून घेणारे आपले हात
वा,
आपल्यावर आच्छादणारे हात
ते मात्र कळिकाळाशी झगडणारेच.
समोर येणारं प्रत्येक वास्तव
हाताळून, घट्टे सहन करणारे;
ते हात आहेत म्हणून गोधडीची उब.
ते हात आहेत म्हणून
ती ओढून घेण्याचं सुख!

अन हेही लक्षात घ्यायलाच हवं
की हे हात तावून सुलाखून
कणखर झाले असतील तरच
तरच पेलु शकतात गोधडी!

तेव्हा गोधडी तर हवीच;
किंबहुना ती असतेच कुठे न कुठे,
वा शोधू, सापडवू शकतो.
पण ती पेलणारे हात मात्र
आपले आपल्यालाच
घडवावे लागतात!

जितक्या लवकर हे कळेल,
जितक्या लवकर हे जमेल,
तितकं गोधडीच काय,
आयुष्यही पेलणंही
सहन होऊ शकतं;
इतकच नाही तर
ते सुंदरही करता येतं!
----

Sunday, October 16, 2022

ती अन तो


ती:

कसे रे, सगळे हात 

पसरून उभा रहातोस

माझा एक एक अश्रु

अन एक एक इच्छा

हलकेच झेलायला!


तो:

कशी ग फुलत असतेस

सुखात, अगदी दुखातही.

माझ्या साऱ्या पानांना

सुगंधीच नाही तर;

केशरीही करून टाकतेस

हळुवार बरसण्याने!