Sunday, December 18, 2022

ख्वाजा मेरे ख्वाजा...

(ख्वाजा मेरे ख्वाजा हे जोधा अकबर मधलं गाणं फार आवडतं. शब्दही, दृष्यही. सुफि संप्रदायाबद्दल एक गूढ आकर्षणही आहे. आज पुन्हा हे गाणं ऐकताना पहाताना हे सुचलं...)

सगळीकडे भरून तू

बाहेर तू, आत तू

तुझ्यात तू, माझ्यात तू.

फिरतो मी माझ्याच भोवती

की फिरतो तुझ्या भोवती

की तूच फिरवते आहेस मला

की तुझ्यातल्या मला फिरवतो आहेस?


एक हात वर, एक बाजुला

वरून तुला घेतो सामावून

अन बाजुने देऊन टाकतो

तुझे तुलाच माझे मीपण!

तूच माझा मालिक

तूच माझा कर्ता धर्ता

तुझ्यातच मी, माझ्यातच तू.


संसार भवंडरात फिरणारा

मला गुंतवणाराही तू 

अन सोडवणाराही तूच

हे माझ्या परमात्म्या

तुलाच सारे सादर!