Wednesday, September 27, 2023

पाऊस अन वारी

बरसे कधीचा, झिरझिर पाऊस
इंद्राचा आशीर्वाद, डोईवरी

बनातुनी वाहे, झुळुझुळु वारा
कान्ह्याची पावरी, कानी येई

कृष्णे काठी काळीकाळी काया
विठुची माया, अंथरली

हिरवा पदर, लाल जांभळी कुसर
रखुमाईचा पदर, डोईवरी

उभ्या पिकात कणसे डोलती
आनंदे नाचती, वारकरी

Thursday, September 14, 2023

जीवन

पहाट होते तशी,

डोळे किलकिले उघडू लागतात.
पण फार दिसत नाही
तेव्हढी नजरच नसते.

मग हळूहळू उजाडू लागतं
थोडा थोडा प्रकाश
झिरपू लागतो
मग आसपासचं काळं पांढरं
थोडं थोडं कळू लागतं.

मग जरा उन्ह वर येतात
स्वच्छ प्रकाशात
सगळे रंग झळाळून उठतात.
सकाळच्या कोवळ्या उन्हात
सगळंच कसं छान, सुंदर
दिसत रहातं, भासत रहातं.

उन मग मध्यान्हीचा सूर्य
सगळे जीवन देत, घेत
वास्तव उभे रहाते समोर.
उपभोगाची सगळी द्वारं
हात पसरून स्वागत करतात.
एक एक उन्हाची तिरिप
एक एक सावलीचा वसा
घेत, देत  साथसंगत देत घेत
कधी उन्हाच्या झळा
कधी सृजनाचा उन्माद
साफल्याचे मनोरे, मनोहर!

अन मग हलकेच सूर्य ढळू लागतो.
एक समाधान, एक स्थिरता
हळूहळू रंध्रारंध्रात पसरत जाते.
एक स्थैर्य, एक निवांतपणा
एक समाधान, एक पूर्तता
हळुवार पसरत जाते
घरभर, आयुष्यभर, रोमारोमात.

अन मग संधिकाल येतो
एक सावट पण सोनेरी किनार
थोडे साफल्य, थोडी हुरहूर
कुठे मळभ, कुठे एखादी चांदणी
अन मग हळूच सावल्या
गायब होत जातात.
कठोर वास्तव दुलईत 
सामावून घेऊ लागतं.

अन मग येतेच रात्र.
काळीशार, डोळे मिटो, न मिटो
अंधारतंच सारीकडे.
पण तेव्हाच झोप कमी होते
मग अंधारल्या आकाशात
टक लावून बसावं वाटतं.
अन तेही आनंदाचंच होतं.
हळूहळू एक एक चांदणी
दिसू लागते, चमकू लागते.
आयुष्यभराची मेहनत
अशी चंदेरी बनू लागते.

अन मग उगवतो चंद्रही
अनेक चंदेरी क्षण पुन्हा
उजळवून टाकतो
कितेक क्षणांची शिदोरी
अशी लख्ख उलगडून बसतो
एक एक झळाळता क्षण
एक एक लुकलुकती चांदणी
एक एक चकाकता कवडसा
जमवलेले चंद्रतारे
येतात आठवणींच्या घेऱ्यात
अन रात्र सारी उजळून जाते.

अन मग उत्तररात्री
निमालेल्या डोळ्यांना
पुन्हा मिटावं वाटतं
पापण्यांवरचे समाधान
अलगत उतरत जातं.
एक नाजूकशी स्मित लकेर
उमटत जाते... तिचाच
हलका उजेड पसरतो
पूर्वेच्या किनाऱ्यावर, अलवार!

Tuesday, September 5, 2023

मार्गारेटचा निर्णय

(न्यू अॅमस्टरडॅम या सिरिजमधल्या एका पात्राला समर्पित)

मला ऐकायचं होतं,

तुझं बोलणं, तुझा आवाज
पक्षांचा गुंजारव, सिंहाची गर्जना
गाड्यांचे आवाज, विमानाचा वेग
नदीची खळखळ, समुद्राची गाज
वाऱ्याची झुळक, पानांची सळसळ
वाद्यांचे संगीत अन गायकाची लकेर
अन असच किती तरी, काय काय...

मला सांगायचं होतं,
माझ्या मनातलं सारं सारं गुज
गायची होती पक्षाची लकेर,
घ्यायची होती सुंदरशी तान
मांडायचे होते माझे विचार
करायच्या होत्या खूप चर्चा
घालायचे होते वाद विवाद
साधायचा होता संवाद, साऱ्या जगाशी...


अन मग मी निर्णय घेतला,
कानांचे पडदे दुरुस्त करायचे
बाहेरच्या विश्वासाठी कवाडं उघडायची
मोठा निर्णय होता, पण ठरवला घ्यायचा
अन मग सुरु झाली धडपड, ऐकण्याची...
योग्य त्या सगळ्या काळज्या घेतल्या
सगळी अगदी सगळी तजवीज केली
अन सुरु झाला एक नवीन प्रवास, नादमय...

अन मग मी ऐकला,
गडबड, गोंधळ, गोंगाट, कोलाहल
कोकिळेचे चिरकणे, सिंहाची रौद्र आरोळी
गाड्यांचे भोंगे, विमानाच्या कानठळ्या
नदीच्या पूराचा भीषण खळखळाट
विजांचा कडकडाच अन रौं रौँ वारा
मिरवणुकीतल्या ढोल ताशांचे कडकणे
अन मी कान घट्ट बंद करू पाहिले...

अन मग मी बोललो,
केला तुझ्यावर आरडाओरडा
आरोप प्रत्यारोपांचा भडिमार
रागावर स्वार होत गायलो बेसूर
कचाकचा भांडलो विचार मांडताना
चर्चेच्या नादात विसरलो विवेक
साऱ्यांवर उगारली तत्वांची पहार
हे काय करून बसलो मी...

नको, नको मला हे उसने श्रवण,
मला तो पूर्वीचाच पडदा हवा आहे
नाद न उमटवणारा
मला ती शांतता हवी आहे
कोणतेही नाद न उमटवणारी
मला ती निरवता हवी आहे
समाधान पसरवत नेणारी
मग उपसून फेकून दिले ते कान

आता एक अपार
शांतता नांदते आहे
आत, आत खोलवर
माझ्या हृदयाचा ताल
माझ्या धमन्यातला प्रवाह
एक अपार शांतता
एक नवा प्रवास
सजग, निरव समाधान!

- अवल