Thursday, September 14, 2023

जीवन

पहाट होते तशी,

डोळे किलकिले उघडू लागतात.
पण फार दिसत नाही
तेव्हढी नजरच नसते.

मग हळूहळू उजाडू लागतं
थोडा थोडा प्रकाश
झिरपू लागतो
मग आसपासचं काळं पांढरं
थोडं थोडं कळू लागतं.

मग जरा उन्ह वर येतात
स्वच्छ प्रकाशात
सगळे रंग झळाळून उठतात.
सकाळच्या कोवळ्या उन्हात
सगळंच कसं छान, सुंदर
दिसत रहातं, भासत रहातं.

उन मग मध्यान्हीचा सूर्य
सगळे जीवन देत, घेत
वास्तव उभे रहाते समोर.
उपभोगाची सगळी द्वारं
हात पसरून स्वागत करतात.
एक एक उन्हाची तिरिप
एक एक सावलीचा वसा
घेत, देत  साथसंगत देत घेत
कधी उन्हाच्या झळा
कधी सृजनाचा उन्माद
साफल्याचे मनोरे, मनोहर!

अन मग हलकेच सूर्य ढळू लागतो.
एक समाधान, एक स्थिरता
हळूहळू रंध्रारंध्रात पसरत जाते.
एक स्थैर्य, एक निवांतपणा
एक समाधान, एक पूर्तता
हळुवार पसरत जाते
घरभर, आयुष्यभर, रोमारोमात.

अन मग संधिकाल येतो
एक सावट पण सोनेरी किनार
थोडे साफल्य, थोडी हुरहूर
कुठे मळभ, कुठे एखादी चांदणी
अन मग हळूच सावल्या
गायब होत जातात.
कठोर वास्तव दुलईत 
सामावून घेऊ लागतं.

अन मग येतेच रात्र.
काळीशार, डोळे मिटो, न मिटो
अंधारतंच सारीकडे.
पण तेव्हाच झोप कमी होते
मग अंधारल्या आकाशात
टक लावून बसावं वाटतं.
अन तेही आनंदाचंच होतं.
हळूहळू एक एक चांदणी
दिसू लागते, चमकू लागते.
आयुष्यभराची मेहनत
अशी चंदेरी बनू लागते.

अन मग उगवतो चंद्रही
अनेक चंदेरी क्षण पुन्हा
उजळवून टाकतो
कितेक क्षणांची शिदोरी
अशी लख्ख उलगडून बसतो
एक एक झळाळता क्षण
एक एक लुकलुकती चांदणी
एक एक चकाकता कवडसा
जमवलेले चंद्रतारे
येतात आठवणींच्या घेऱ्यात
अन रात्र सारी उजळून जाते.

अन मग उत्तररात्री
निमालेल्या डोळ्यांना
पुन्हा मिटावं वाटतं
पापण्यांवरचे समाधान
अलगत उतरत जातं.
एक नाजूकशी स्मित लकेर
उमटत जाते... तिचाच
हलका उजेड पसरतो
पूर्वेच्या किनाऱ्यावर, अलवार!

No comments:

Post a Comment