Wednesday, August 25, 2021

साथ

दूर दूर पसरलेली

वाट,मऊसर माती

एक मेक पाऊल

रमलखुणांची नाती


भरू भरू आलेल्या

आभाळाची दाट गर्दी

चिंब चिंब भिजताना

उबदार घट्ट मिठी


उधळलेल्या धुळीस,

वादळाची चाहुल

डोळ्याआड रात्रीस

ओलसर पाऊस


ओलांडण्या नदीला

हाती नव्हती नाव

वाहताना परंतु

सोबत होती साथ

Wednesday, August 4, 2021

जखरंडा

फोटे फ्रॉम  रश्मी साठे
किती हिवाळे, उन्हाळे

अन किती पावसाळे

हर एक वसंतातले

वळण वेगळे, वेगळे।

वाहत्या वाऱ्यासवे मी

फिरवली पाठ किती

तगून जगलो उरी

किती युगे, लोटली।

साज श्रुंगार, चढविला

उतरला तोही कितेकदा

नव्हाळीची नवी तऱ्हा

प्रसवे उदरी पुन्हा।

हरेक फांदी उकली

अंतरीच्या कळा किती

उतरून हरेक ठेवी  

हिरवी पाने, किती।

उभा कधीचा इथे

बदलुनी रंग रुपे

जख्ख म्हातारा म्हणे,

कुणी, जखरंडा म्हणे।

---

काळ

खिडकीत बसून

बाहेरची मजा

न्याहाळणारी ती
इटुकली गोंडस
फ्रॉकवाली परी

हलणारी झाडं
उडणारी चिमणी
आकाशात कधीतरी
उंच उडणारा
रंगबिरंगी पतंग

पडणारा पाऊस
नाचणारी उन्हे
उगवणारा सूर्य
रात्रीचा चांदोबा
कधी चांदण्याही

तिला वाटे
बाहेर जावे
मस्त फिरावे
पावसात भिजावे
गवतावर लोळावे

पण कधीच
आई बाबांनी
एकटीला नाही
जाऊ दिले
कधीच नाही

आता तर
तीच घाबरते
खिडकी बाहेरची
भितीदायक भूतं
घाबरून बसते

खिडकीच्या आतलं
सुरक्षित जग
तिला सुखावतं
गज आता
तुरुंग नसतात
--