Monday, September 6, 2021

झळाळते दुभंगलेपण

(श्वेता चक्रदेव यांचे एक फॉरवर्ड वाचून मनात ही उमटली...)


तसे तर सगळेच आपण

दुभंगलेले

कधी दु:खाने, कधी त्रासाने

कधी जबाबदाऱ्यांमुळे

तर कधी तणावांमुळे...

आतून-बाहेरून दुभंगलेले


पण भरतो आपण या भेगा

आपल्या आपणच

कधी मैत्र, तर कधी नाते

येतात सोबत भरावयाला

खाच येतेच भरून

काळाचा महिमा अन

सखेसोबत्यांचा आधार


अन मग होतो आपणच

एक नवीनच व्यक्ती

एक नवीनच जाणीव

दुभंगलेल्या भेगांमधून

आत आत पसरत जातो

लख्ख प्रकाश, प्रगल्भतेचा

भरली जाणारी प्रत्येक भेग

मग झळाळते; होऊन सोनं

अनुभवांचं लेणं


मग झळाळतो आपण 

पुन्हा नव्या ताकदीने उभे

नवे वार पेलायला,

नवे दुभंगलेपण अन

नवी झळाळी पेलायला

आपली हीच दुर्दम्य आशा!

...