Wednesday, July 8, 2020

सुस्नात वसुंधरा



झरझर झरली
ही संततधारा
भिजवून गेली
आसमंत सारा

नवी नव्हाळी
उमेदही नवी
जागली उगवली
हिरवी कोवळी

उन्हात बसली
सुकवित पिसारा
मंदसा वाही
शीतल वारा

डोले सारी
सृष्टी जननी
आनंदे सृजननी 
सुस्नात वसुंधरा


Tuesday, July 7, 2020

जीवनवाट

खरं तर भिजायचंच असतं 
त्यालाही अन तिलाही...
छत्री तर नुसतंं एक निमित्त
जवळ येण्याचं, एकत्र चालण्याचं,
सोबत असण्याचं

दोघांनाही पक्क माहितीय
इवलुशी छत्री नाहीचे पुरणार
पण तिच्या मुळेे येणारी 
ही सोबत आहे
जन्मजन्मांतरिची

पडणारी एक सारखी पावलं, 
पाया खालची ओली जमिन...
सगळं तेच तर सांगताहेत
त्यांच्या मनातला ओलावा
एकमेकांबद्दलचा

ओथंबून आलाय हिरवा निसर्ग
तजेलदार नवपरिणित अन 
सोबत अनुभवी गहरेपणही
त्यांच्या नात्याची किती 
वैविध्यपूर्ण वीण

तसे गेलेत बरेच दूर
निम्मी वाट ओलांडून
करायचीय अजून पार
एकमेकांना जपणारी ही वाट, 
अहं जीवनवाट

Wednesday, July 1, 2020

भेट

आले आभाय भरून
वाजे कडाडा ही वीज
भरु लागे वारं अंगात
धूळ भरारा अंगणात

अहो ऐकता का जरा
म्हणे रखुमाई भ्रतारास
वीट मोकळीच दिसता
समजली ती मनात

तीर चंद्रभागेचा धपापे
उर भरुनिया येई
तुक्या ज्ञानोबाचा आठव
कानी टाळांचा गजर

वाटेवरती निरा नद
उचंबळून उसासून
पालखीचा पायारव
राही कानोसा ती घेत

वाट सरळ; नागमोडी
घाटा दरी डोंंगराची
उन पाऊस वारा
चाले भक्तांचा हा तांडा

डोई तुळशीचे राऊळ
गळा तुळशीची माळ
पायी ओढ पंढरीची
मुखी रामकृष्णहरी

पालखी पुढे पालखी
मागे नाचे वारकरी
पाहत धावे पुढती
उराउरी भेटे विठुमाई