Wednesday, July 1, 2020

भेट

आले आभाय भरून
वाजे कडाडा ही वीज
भरु लागे वारं अंगात
धूळ भरारा अंगणात

अहो ऐकता का जरा
म्हणे रखुमाई भ्रतारास
वीट मोकळीच दिसता
समजली ती मनात

तीर चंद्रभागेचा धपापे
उर भरुनिया येई
तुक्या ज्ञानोबाचा आठव
कानी टाळांचा गजर

वाटेवरती निरा नद
उचंबळून उसासून
पालखीचा पायारव
राही कानोसा ती घेत

वाट सरळ; नागमोडी
घाटा दरी डोंंगराची
उन पाऊस वारा
चाले भक्तांचा हा तांडा

डोई तुळशीचे राऊळ
गळा तुळशीची माळ
पायी ओढ पंढरीची
मुखी रामकृष्णहरी

पालखी पुढे पालखी
मागे नाचे वारकरी
पाहत धावे पुढती
उराउरी भेटे विठुमाई

No comments:

Post a Comment