Monday, March 14, 2022

इतिहास वगैरे


 काळ्या कसदार मातीतून वर आलेलो मी.

आज एक नवी पालवी फुलटीय कोवळी,

तिचा नारिंगी भगवा रंग

तिचा कोवळेपणा

सृजनाचा प्रयत्न

फार भावलाच.

पण त्याहून भावला 

तो तिचा इतिहासाशी

नाळ जोडण्याचा प्रयत्न! 


मागे, खाली 

तपशील हरवलेला 

इतिहास दिसतोय?

हो तोच कणखर, दगडी

स्वत:चं एक अस्तित्व 

उभं करून तग 

धरून असलेला.

हा, आता काहींना 

दिलाय विटांच्या

भगव्या रंगाचा 

गिलावा, कुठेकुुठे.

लपलेत काही तपशील,

काही नवेच आयाम

उमटलेत त्यावर.

काही हरवलेत बुरुज,

उगवलीत काही  

नवी बांडगुळं.

पण आहे न, आहेच.

तिथे उभा इतिहास;

माझा समृद्ध वारसा! 


हा, आता माझी

पाळंमुळं नाहीत तिथवर...

पण आहे, पाठिमागे

तो इतिहास.

मग मी माझ्या नव्या

गुलाबी लव्हाळ्याला

मागच्या भगव्य़ा गिलाव्याशी

जोडू पहातो, 

उर कसा

अभिमानाने 

दाटून येतो.

खाली पाण्यात पडलेल्या

जुन्या खोडाच्या 

हिरव्या डेरेदार 

प्रतिबिंबात आणि 

माझ्या जुन्या 

पानांमधला हिरवेपणा 

मला नाही 

बघावा वाटत.

ते साधर्म्य मला 

फारच सुमार वाटतं.

मग पानाच्या टोकाशी

कळत नकळत दिसणारा

वास्तवाचा कराल 

मातकट रंग त्या

जुन्या भिंतीतल्या चिऱ्याशी

कसा जुळतोय 

हेच शोधत 

खुष होतो मी.


पायाखालची जमीन 

दिसत नाही तेच बरय;

नकोच दिसायला ती.

तिचा सुपीक, 

काळाभोर रंग

अजिबात जुळत नाही

त्या मागच्या भव्यदिव्य

इतिहासाशी!

अन हो, ही नव्हाळीही

आपली वानगी दाखल हो!

तिनं आयुष्यभर 

असं भगवं वगैरे

रहावं, असं नाहीच हं!

शेवटी निसर्ग आहे, 

नियम आहेत,

संसार आहेत

जबाबदाऱ्या आहेत.

यात कुठे हो वेळ?

अन माझी परंपरा

कौटुंबिक रुढीही... 

कुठे हो इतिहासाशी

बांधलेलं सगळं?

तो इतिहास कसा

दूरून उत्तुंग वगैरे.

तो वर्तमान असताना;

मी, माझे वंशज

नेहमीच दूर असतो हो.

अहो त्याशिवाय 

मी जगलो कसा असतो?

इतिहासातच विरून 

नसतो का गेलो? 


पण काही म्हणा हं

आज या सृजनामुळे

माझी त्या इतिहासाशी

नाळ जुळली 

हे खरच, 

अभिमानाचच! 

छाती कशी

अभिमानाने

फुलून 

आलीय!

---

No comments:

Post a Comment