Saturday, August 13, 2022

तारेवरचे पक्षी आपण



लांब लटकलेली तार
अन त्यावर बसणारे पक्षी.
काही उगा क्षणभर टेकलेले,
काही मोठा प्रवास करणारे.
काही स्थिर बसलेले,
तर काही झोके घेणारे.

काहींना आवडतं कसरत करत
तारेवर तोलत रहायला;
काही निसर्गाला मान तुकवून
उलट सुटल लटकलेले;
काही ठामपणे स्थिरावलेले
तर काही बावचळत रहाणारे.

कधी दुक्कल तर कधी एकांडे
कधी कळप तर कधी झुंड.
कधी कळपामधले एकटे,
कधी एकएकटे कळप.
कधी झुंडीने भांडणारे,
कधी एकोप्याने बसणारे.

काही तारेच्या लवचिकतेचा
मनसोक्त आनंद घेणारे;
तर काही त्या तारेच्या
अस्थिरतेवर चिडचिडणारे;
तर काही दोलायमानतेवर
आपले स्थितप्रज्ञत्व जोखणारे.

तसे सगळेच गरजेचे
तसे सगळेच आकर्षक.
तसे सगळेच जिवंत,
अन रसरशीत.
आपापल्या दृष्टिनुरूप
सुंदर आकर्षक.

तार आहेच, राहिलच;
जशी आहे तशीच.
शेवटी ठरवायचं
आपलं आपणच.
तर कोण व्हायचं,
अन कसं व्हायचं!
---

No comments:

Post a Comment