Tuesday, April 12, 2022

तू बाई आहेस न म्हणून !



बाईनं कसं सोज्वळच असायला हवं
कितीही शिकली सवरली तरी
आत्मविश्वासाचा ताठा नको हो
बसताना शालिनतेनंच बसावं
चालताना ताठ, आत्मविश्वास नकोच
उभं रहाताना लवून नाजूक दिसावं
उंचनिंच, ताठ, खांदे सरळ, थेट नजर
छे, छे असं कसं चालेल बरं 
नाजूक, बारीक, कमनियच असायला हवं
अगदी सोळा पासून सत्तरी पर्यंतही हो.
तू बाई आहेस न म्हणून हो!

आवाजाचा पोत कसा हलका हवा
बोलावं किती याचं भान हवं
तुझा नाजुकपणा कसा टिकायला हवा
कोणते विषय बोलायचे, कोणते 
टाळायचे याचं सतत भान हवं
मोठ्यानं हसणं, टाळ्या देणं
हे सगळं टाळायला हवं
तू बाई आहेस न म्हणून हो!

काळ बदलला, तर शिक हो भरपूर
नोकरीही कर, गाड्याही चालव
पण मुलांची ने आण तूच कर
त्यांना वळण लावणं हे तुझच काम
स्वयंपाक पाणी, आला गेला
घर आवरणं, सुबक, सुंदर ठेवणं
हे सगळं तुझंच बरं का
त्यात हयगय नको
तू बाई आहेस न म्हणून हो!

कितीही शिकलीस, पदं मिळवलीस
तरी घर तुलाच नीट ठेवायचय
नाती गोती पै पाहुणा तूच बघायचायस
वाणसामान भाजीबिजी तुझीच कामं
ऑफिसच्या जबाबदाऱ्या, कामाच्या वेळा
ते तुझं तू बघ पण घरही तूच बघ हं
तू बाई आहेस म्हणून हो!

एकटीनं मजा करणं, आनंद मिळवणं
तसं ठिके म्हणा, म्हणजे कर तू.
पण कुटुंबाला धरून रहायला हवंस
दुसऱ्याने कितीही कटू बोललेलं,
तू ते सकारात्मकच घ्यायला हवं
इतरांनी तुझे दोष दाखवले, तर
तुझ्यात बदल करायला हवेसच
तुझं तुझं म्हणून काही का मत असेेना
कुटुंबा,समाजासाठी मुरड घालायला हवीस
तू बाई आहेस न म्हणून हो!

आणि हो, या अपेक्षा, ही दृष्टी
सगळ्याच समाजाची बरं का
बाई असो वा पुरुष तुला जोखताना
फरक नाही दृष्टीत अजिबात
तुझं बाईपण सगळे हिरीरीने तपासणार
आरशात स्वत:चं नाजूकपण सांभाळत
अन जगात दणकट जबाबदारी पेलूनही
तुला पहाताना, दुसरी बाईही असंच बघणार
तू बाई आहेस न म्हणून हो!
---

No comments:

Post a Comment