Monday, January 1, 2024

नाव

फोटो बाय निखिल


टरारा फाटलं

फडकतं शिड

कायाच्या चिंधड्या 

मोडली डोलकाठी 

भंगली होडकी


सफरीचा रोमांच

उडवला कधीच

रौद्र वादळाने,

समुद्राची आसक्ती

उतरवू पाहिली


पसरला क्षितीजभर 

कभिन्न कालडोह

बरसते अंबर

आली भरभरून

एकटेपणाची झूल


निकराने झगडणं

अनामिक ओढ

अनाकलनीय घटनांची

कोसळणारी रात्र

अविरत गूढगाज


उसळत्या लाटा

कवळती कितीदा

वल्ही सरसावून

ढासळलेलं मन

पुन:पुन्हा सावर


ओसरती लाट

भेलकांडे नाव

वाळूत रुते

सापडे अखेर

सुखाचे निधान

 ---

Monday, December 18, 2023

प्राजक्त

रात्र गडद झालेली

हळूच झुळूक आली

तशी त्या उमलून बसल्या.

अन ते कळलच अगदी

वाऱ्याने पसरवला गंध.

वर चांदण्या चमचमल्या

अन त्या प्रकाशात याही.

रात्र चढू लागली तशी

याही अधिकच गंधाळल्या.

पहाटेचा गारवा सुटला

हलकेच पूर्व रंगू लागली.

अलवार उन्हाचे किरण

त्यांना लगटू लागले.

अन मग टपटप टपटप

त्या ओघळू लागल्या.

दुधट, अलवार पाकळ्या 

अन गंधाळलेले देठ.

गोऱ्या, नाजूक, पऱ्यांचे 

गंधाळलेले गोल पाय.

सारा गालिचाच पसरला

पांढरा, केशरी, नक्षीदार!

---

Thursday, October 19, 2023

नद - नाद

एक छोटासा झरा
खळाळ वहात
कधी असेच काही झरे
येऊन मिळतात त्याला
कधी संचित, कधी देन
कधी संस्कार, कधी संस्कृती
कधी श्रेय, कधी धडपड
तर कधी
त्याचाच एक तुकडा
सुटतो, वेगळा होतो
माहित नाही कसा, कुठे
स्वतंत्र वाट शोधत
अलग होतो, दृष्टी आड होतो
आपापला मार्ग शोधत जातो...

झरा वहात रहातो
आपला मार्ग ठरवत
हळू हळू आवाका वाढत,
वाढवत ही
कधी खळाळ
मग कधीतरी संथ, खोल
कधी इतका सृजन
की फुलवत जातो 
आजुबाजुला
कधी केतकीचे बन
कधी निवडुंगाचं रान
कधी निशिगंधाचे खळे
कधी पोटापाण्यासाठी
भाजीभाकरीची ताटं
तर कधी विचारांचे
गहन गूढ अंधारबनही!

पेरत, फेकत दमून भागून.
कधी नुसताच संथ शांत
नाही एकही तरंग.
कधी पुन्हा उंच, खोल
प्रपात, धबधबा
पुन्हा कधी पसारा, अथांग
कधी खळाळ
कधी धीरगंभीर, सखोल
कधी आत्ममग्न, कधी व्यक्त
कधी संवाद, कधी मूक
कधी भसाभस
कधी गप्प...

अन मग सगळ्या
धकाधकी नंतरचा
सापडलेला आतला
एक धीरगंभीर शांत नाद
आपल्याशीच आपला
अविनाशी संवाद
लप लप समुद्र गाज
अथांग, अज्ञाताशी गूढ संवाद!

Wednesday, September 27, 2023

पाऊस अन वारी

बरसे कधीचा, झिरझिर पाऊस
इंद्राचा आशीर्वाद, डोईवरी

बनातुनी वाहे, झुळुझुळु वारा
कान्ह्याची पावरी, कानी येई

कृष्णे काठी काळीकाळी काया
विठुची माया, अंथरली

हिरवा पदर, लाल जांभळी कुसर
रखुमाईचा पदर, डोईवरी

उभ्या पिकात कणसे डोलती
आनंदे नाचती, वारकरी

Thursday, September 14, 2023

जीवन

पहाट होते तशी,

डोळे किलकिले उघडू लागतात.
पण फार दिसत नाही
तेव्हढी नजरच नसते.

मग हळूहळू उजाडू लागतं
थोडा थोडा प्रकाश
झिरपू लागतो
मग आसपासचं काळं पांढरं
थोडं थोडं कळू लागतं.

मग जरा उन्ह वर येतात
स्वच्छ प्रकाशात
सगळे रंग झळाळून उठतात.
सकाळच्या कोवळ्या उन्हात
सगळंच कसं छान, सुंदर
दिसत रहातं, भासत रहातं.

उन मग मध्यान्हीचा सूर्य
सगळे जीवन देत, घेत
वास्तव उभे रहाते समोर.
उपभोगाची सगळी द्वारं
हात पसरून स्वागत करतात.
एक एक उन्हाची तिरिप
एक एक सावलीचा वसा
घेत, देत  साथसंगत देत घेत
कधी उन्हाच्या झळा
कधी सृजनाचा उन्माद
साफल्याचे मनोरे, मनोहर!

अन मग हलकेच सूर्य ढळू लागतो.
एक समाधान, एक स्थिरता
हळूहळू रंध्रारंध्रात पसरत जाते.
एक स्थैर्य, एक निवांतपणा
एक समाधान, एक पूर्तता
हळुवार पसरत जाते
घरभर, आयुष्यभर, रोमारोमात.

अन मग संधिकाल येतो
एक सावट पण सोनेरी किनार
थोडे साफल्य, थोडी हुरहूर
कुठे मळभ, कुठे एखादी चांदणी
अन मग हळूच सावल्या
गायब होत जातात.
कठोर वास्तव दुलईत 
सामावून घेऊ लागतं.

अन मग येतेच रात्र.
काळीशार, डोळे मिटो, न मिटो
अंधारतंच सारीकडे.
पण तेव्हाच झोप कमी होते
मग अंधारल्या आकाशात
टक लावून बसावं वाटतं.
अन तेही आनंदाचंच होतं.
हळूहळू एक एक चांदणी
दिसू लागते, चमकू लागते.
आयुष्यभराची मेहनत
अशी चंदेरी बनू लागते.

अन मग उगवतो चंद्रही
अनेक चंदेरी क्षण पुन्हा
उजळवून टाकतो
कितेक क्षणांची शिदोरी
अशी लख्ख उलगडून बसतो
एक एक झळाळता क्षण
एक एक लुकलुकती चांदणी
एक एक चकाकता कवडसा
जमवलेले चंद्रतारे
येतात आठवणींच्या घेऱ्यात
अन रात्र सारी उजळून जाते.

अन मग उत्तररात्री
निमालेल्या डोळ्यांना
पुन्हा मिटावं वाटतं
पापण्यांवरचे समाधान
अलगत उतरत जातं.
एक नाजूकशी स्मित लकेर
उमटत जाते... तिचाच
हलका उजेड पसरतो
पूर्वेच्या किनाऱ्यावर, अलवार!

Tuesday, September 5, 2023

मार्गारेटचा निर्णय

(न्यू अॅमस्टरडॅम या सिरिजमधल्या एका पात्राला समर्पित)

मला ऐकायचं होतं,

तुझं बोलणं, तुझा आवाज
पक्षांचा गुंजारव, सिंहाची गर्जना
गाड्यांचे आवाज, विमानाचा वेग
नदीची खळखळ, समुद्राची गाज
वाऱ्याची झुळक, पानांची सळसळ
वाद्यांचे संगीत अन गायकाची लकेर
अन असच किती तरी, काय काय...

मला सांगायचं होतं,
माझ्या मनातलं सारं सारं गुज
गायची होती पक्षाची लकेर,
घ्यायची होती सुंदरशी तान
मांडायचे होते माझे विचार
करायच्या होत्या खूप चर्चा
घालायचे होते वाद विवाद
साधायचा होता संवाद, साऱ्या जगाशी...


अन मग मी निर्णय घेतला,
कानांचे पडदे दुरुस्त करायचे
बाहेरच्या विश्वासाठी कवाडं उघडायची
मोठा निर्णय होता, पण ठरवला घ्यायचा
अन मग सुरु झाली धडपड, ऐकण्याची...
योग्य त्या सगळ्या काळज्या घेतल्या
सगळी अगदी सगळी तजवीज केली
अन सुरु झाला एक नवीन प्रवास, नादमय...

अन मग मी ऐकला,
गडबड, गोंधळ, गोंगाट, कोलाहल
कोकिळेचे चिरकणे, सिंहाची रौद्र आरोळी
गाड्यांचे भोंगे, विमानाच्या कानठळ्या
नदीच्या पूराचा भीषण खळखळाट
विजांचा कडकडाच अन रौं रौँ वारा
मिरवणुकीतल्या ढोल ताशांचे कडकणे
अन मी कान घट्ट बंद करू पाहिले...

अन मग मी बोललो,
केला तुझ्यावर आरडाओरडा
आरोप प्रत्यारोपांचा भडिमार
रागावर स्वार होत गायलो बेसूर
कचाकचा भांडलो विचार मांडताना
चर्चेच्या नादात विसरलो विवेक
साऱ्यांवर उगारली तत्वांची पहार
हे काय करून बसलो मी...

नको, नको मला हे उसने श्रवण,
मला तो पूर्वीचाच पडदा हवा आहे
नाद न उमटवणारा
मला ती शांतता हवी आहे
कोणतेही नाद न उमटवणारी
मला ती निरवता हवी आहे
समाधान पसरवत नेणारी
मग उपसून फेकून दिले ते कान

आता एक अपार
शांतता नांदते आहे
आत, आत खोलवर
माझ्या हृदयाचा ताल
माझ्या धमन्यातला प्रवाह
एक अपार शांतता
एक नवा प्रवास
सजग, निरव समाधान!

- अवल

Sunday, August 6, 2023

प्रिय मनी


मला आवडते गोधडी

ब्लँकेटपेक्षाही, जास्त

खूप जास्त"

ब्लँकेट असतं खूप गरम

लोकरीची उब

त्याचं खरबरीतपणा

कधी अगदी अती मऊपणाही

म्हटलं तर जास्त

जाड अन टिकावूही...

पण गोधडी?

ती असते नरम, मऊ

म्हटलं तर उबदार

कधी गारही

पण तिच्यात असते 

आजी, आईची माया.

त्यांचं आयुष्य वापरून

बनलेला असतो

एक एक पदर.

त्यांचे अनुभव, विचार;

माझ्यावरचा त्यांचा

गाढ विश्वास;

अन माझी त्यांच्यावर

सगळं सोडून देण्याची

सगळी तयारी...

हे बंधच तर बनतात

सगळ्यात महत्वाचे.

ती पिढ्यानुपिढ्या

वाहत आलेली संस्कृती,

ते आपलेपणाचे धागे

एकमेकांत घट्ट विणलेले.

कधी विलग न होणारी नाती...

मला माहितीय शेवटी

गोधडीच तारून नेणार

मला, तुला, आईला

अगदी आजीलाही.

इतकच नाही तर

साऱ्या विश्वाला!

मला आवडते गोधडीच

त्या ब्लँकेटपेक्षा!

- अवलमावशी

Friday, August 4, 2023

सापळे

एखादी अभद्र कृती

नासवून टाकते सगळं.

प्राप्त परिस्थितीवरची

साधी एक प्रतिक्रिया;

पण होतं नव्हतं ते सारं

एका क्षणात पुसून जातं.

समोरून आलेला एक वार

तलवारी ऐवजी ढालीवर

पेलता आला असता तर...!

तर ही सगळी क्रूरता

अशी वर आली नसती.

मागे वळून पहाताना

लाज वाटत रहाते

कुठून आली, कुठे दडलेली

इतकी बिभत्सता???

सुसंस्कृततेचे सगळे लेप

खळाखळ आपल्या पायाशी

ढलप्यांनी पडत रहातात.

अन आपण सारेच खुजे होत

त्या ढलप्याच्या ढिगाऱ्यात

हळूहळू सापळे बनत जातो...

Wednesday, August 2, 2023

तर असंच असतं....

विचारांचं कसं असतं न

कधी कधी निरभ्र आकाश

छान निळं निळं, स्वच्छ.

कधी गच्च भरून आलेलं

गडद काळंभोर अंधारलेलं.

अनेक छोट्या पुंजक्यांचं

तर कधी सलग अच्छादन.

कधी भराभर पळणारे मेघ

कधी ओथंबून राहिलेला नद.

कधी झरझर बरसणारे

कधी ढगफुटीने कोसळणारे.

कधी एकाच वेळी धप्पकन

तर कधी संतत धार रिपरिप.

कधी इंद्रधनू सारखे रंगबिरंगी

तर कधी निस्तेज निरस.

कधी गडद असूनही उल्हसित

कधी गडदगूढ, झाकोळलेले.

कधी सूर्यप्रकाशात नाहून

तर कधी विजांनी लखलखून.

कधी वादळी झंजावात लेवून

कधी मंद शीतल झुळूक.

कधी विरळ न उमजलेले

कधी ठोस, ठाम समजलेले.


तर असंच असतं विचारांचं


Tuesday, July 18, 2023

पावसाळी सांज

हे आज निघाले आभाळीचे ढग

करी सोबत त्या एकाकी एक खग

क्षितिजावर उभे, लालकेशरी रंग
धुसर धुक्याची, दुलई असे संग

टपटपे ही धारांची, अविरत गाज
कौलाशी सजे, पागोळ्यांचा साज

ओलेती थंडगार, ओसरती सांज
सुसाट वारा वाजवी, पानांची झांज

चमके मधेच वेडी, एखादी वीज
येई उतरुनी हळुच, नयनी नीज