Monday, July 13, 2026


रात्र वादळी सुसाट वारा

जुनीच वही, फडफडती पाने...

हळूच सुटल्या ओळी काही

अलवार टेकल्या भाला वरती


विसरलेली काही सुखे दु:खे

ओणवून पाहती आत माझ्या

त्या सोबतचे सोबती काही

नावे, चेहरे ठळक होती


का रडावे उगाच मी

असता सोबत हे सगेसोयरे

कळी काळाचे फटके काही

होय बसले होते तरीही


फुंकर होती सतत तरीही

सावली अन घट्ट मिठीही

जखमा होत्या काही खोल

पण खपल्याही धरल्या होत्या


अन व्रणाच्या खुणाही आता

पुसट होत आल्या होत्या

मग घोर कशास आता

शांत निवांत हो कृतज्ञ!

---

Sunday, July 5, 2026

मोत्याचा सर

माहिती आहे ग
पाऊस कधीचा झरतोय;
तुझ्या गालावरून खाली...
शक्य असतं तर
एक एक मोती
जपून वेचला असता
जवळ असतो तर.
अन मग तुझ्याच
गळ्यात घातला असता
माझ्या हातांचा सर!

चिंब पाऊस


कधीचा कोसळतोय
पाऊस!
तू मात्र अजिबात
भिजू नकोस हं.
तुझ्या मनातलं
गैरसमजाचं मळभ
सगळं त्यात
वाहून गेलं तर...
हळव्या, अलवार
आठवणीच रहातील;
अन त्या आठवून
तूच होशील
चिंब पाऊस!