गर्भारपण!
किती तरी जुनी गोष्ट;जणु गेल्या जन्मीची!
तस खुप कष्टाचं तर होतच
पण आनंददायीही होतं.
आज एकदम का बरं
त्याची आठवण यावी ?
विमानात बसल्या बसल्या
गेल्या काही दिवसांचे
विचार मनात चालू होते.
गेल्या वर्षी तो येऊन गेला.
आणि मग पुढचे
नऊ साडेनऊ महिने
त्याच्या आठवणीत.
पुढच्या वेळी भेटलो,
की काय काय करायच?
त्याच्यासाठी काय काय न्यायचं,
कोणत्या गप्पा मारायच्या,
कुठे कुठे फिरायचं,
काय काय खेळायचे,
कोणत्या गमती जमती
आठवणी पुन्हा आठवायच्या?
कुठल्या नवीन तयार करायच्या?
कोणत्या चर्चा करायच्या,
कोणत्या पुस्तकांची
देवाणघेवाण करायची?
कितीतरी मनसुबे ...
नऊ साडेनऊ महिने साठवलेले.
आणि मग तो क्षण आला.
जेव्हा भेटले पुन्हा त्याला.
दोन अडिच महिने,
पुन्हा उपभोगून घेतले.
आईपण!
त्याचे लाड, कोड, कौतुक
त्याच्या कडून करून घेतलेले लाड.
खेळणं, भटकणं, गप्पा, चर्चा.
नुसतं एकमेकी सोबत बसणं.
त्याचा सहवास अनुभवणं.
त्याचा श्वास, त्याचा गंध.
त्याचा आवाज, त्याच्या लकबी.
त्याचं बोलणं, त्याचं नुसतं शांत बसणं.
अगदी त्याचं चिडणंही !
आणि मग पुन्हा ती वेळ आली.
परतायची !
अन याच परतीच्या प्रवासात,
सगळं गर्भारपण पुन्हा आठवलं.
खरच!
हे ही गर्भारपणच की!
नऊ साडेनऊ महिने
मनामधे सगळ्या गोष्टी
रुजवत ठेवायच्या.
कुठले कुठले मनसुबे,
मनात, पोटात वाढवत रहायचे.
आणि मग तो भेटला;
की या आकांक्षांची नाळ तोडायची.
अन जगून घ्यायचं
त्याच्या सह, सोबत.
अन मग जाणवलं
पहिल्या वेळेस जेव्हा
खरी नाळ तुटली,
तेव्हा नाही दु:ख झालं.
कारण ती नाळ तुटली,
म्हणून तर तो
कुशीत आला न माझ्या!
पण आता...
आता जेव्हा हे
दोन अडिच महिने भेटल्यानंतर
जी नाळ तुटते न
खुप खुप दुखावते
हेलावून टाकते अगदी.
अन मग
विमानाच्या एकांत अंधारात
कळत न कळात
आत डोळे गळत रहातात...
तसेच कधी तरी मग
डोळे मिटले गेले.
मधेच जाग आली
डोळे उघडले तर
विमानाच्या खिडकीतून बाहेर
अंधाराच्या अवकाशातून
हलकेच निळेपणा वर चढत होता.
हळू सोनेरी, राजवर्खी
हिरण्यगर्भ वर आला.
आणि मग पुन्हा मनात
आशा पल्लवित झाल्या.
पुन्हा एक नवीन गर्भारपण
सुरू झालं.
नऊ साडेनऊ महिन्यांचं.
मग पुन्हा भेटेलच,
येईलच तो कुशीत.
दोन अडिच महिन्यासाठी.
म्हातारपणचं
अलौकिक गर्भारपण!
---