Wednesday, July 6, 2022

आरस्पानी तळं

गोठलेलं तळं एक

आरस्मानी, हलकं निळं

तळ दिसेल इतकं स्वच्छ


पण जरा वाकून शोधाल

तळाशी काय बरं

तर अडकलात तुम्ही


ज्या क्षणी वाकाल

तुमचच प्रतिबंब येईल मधे

गढुळेल, आरस्पानी तळ


बर्फा खालचा खोल तळ

त्यावर आजचं प्रतिबिंब

सगळी सरमिसळ गुंतागुंत


खरा तळ शोधायचा तर

व्हायला हवं तुम्हीही

आरपार आरस्पानी!

---

Wednesday, June 29, 2022

कठोर वास्तव

नजरेच्या टप्यातलं सगळं क्षितीज
हळूहळू भरत जातं नभांनी
आधी पांढरे मग निळे, सावळे, काळे...
अन आपण गाडीत बसून जाताना
झाडांना कसं वाटत असेल
अगदी तसं जाणवून देत
हलके हलते डावीकडे सरकत जातात
आपलं छप्पर मात्र तसच कोरडं ठक्क
सृजनाच्या सगळ्या शक्यता समोर असून
आपली झोळी रिकामी ती रिकामीच....

Tuesday, June 21, 2022

वणवा



आज समोरचा डोंगर म्हणाला, 

"पोरी, काल पेटलेला वणवा.

कितीही वाचवावं म्हटलं तरी

उन्हानी रापलेले सारे तण

भराभर पेटत गेले,

त्यांची मुळं नव्हतीच खोलवर

वर वर वाढलेलं तण नुसतं.

मोठी झाडं मात्र तगली

खोलवरच्या मुळांनी पेलून धरली

झळांनी खोडं, पानं होरपळलीच

पण आतला ओलावा पुरून उरला

वणव्यातूनही जिवंत रहायला

उपयोगी पडला तो ओलावा!"


नात्यांचही असच असतं नं?

काही वरवरची, बेगडी नाती

अडचणींच्या वणव्यात

उभी पेटतात अन 

राख होऊन जातात

पण खरी नाती,

मनाच्या पोटातून 

ओलावा धरून असणारी

जगतात, तरतात, 

अजून घट्ट होतात

वणवा, आपलं-परकं

असं टळटळीतपणे 

शिकवून गेला...

---

Monday, June 20, 2022

जलद







 

कोण कुठले आप्त

भरभरून यायला लागलेत

आधी एखादाच तुरळक

पण मग एकाचा शेव पकडून 

दुसरा, तिसरा, भरगच्च गर्दी

कधी फेर धरत कधी झुंडीत

कधी भरगच्च कधी चुटपुट

कधी सुसाट कधी झुंबड


कुठल्या कुठल्या नदीचं

कुठल्या समुद्राचं

अन कुठल्या डोळ्यांतलं

जलद घेऊन चाललेत...

अडवणाऱ्या प्रत्येक डोंगराला

त्याचं त्याचं माप घालत

जलद चाललेत, मोठ्या प्रवासाला

वर्षभर साठवलेलं काय बाय

आळुमाळु उराशी लावत

भरत भरत राहिले

अन आता निघाले जलद

ज्याचं त्याचं देणं देत


एकदा सगळं भरभरून दिलं

मोकळा केला सगळा पसारा

सगळा उरक, सगळी देणीघेणी

की मग कसं मोकळंमोकळं

निरभ्र होऊन पुन्हा नवं जोडत

जगता येईल निळंनव्हाळं


आठवणींचही असच आहे न?

एकदा सगळा निचरा 

व्हायला हवाच अधूनमधून

मग नवीन आठवणींना 

भिडता येतं निळंनव्हाळं बनून

---



Monday, June 6, 2022

मुक्त???

टप टप टप टप

गळतच होते तिचे डोळे


केलेल्या कितीतरी तडजोडींची
हातभर जाळी तयार झालेली

अन नकोशी प्रत्येक गोष्ट
कपाळावर आठ्यांनी भरून गेलेली

दाबलेला प्रत्येक हुंदका
ओठांवरच्या दंत खुणांनी भरलेला

तिला आता खरच, खरच
सगळं नको नको झालेलं

अन मग घेतला मोठा श्वास
अन घेऊन टाकला एक निर्णय

आता ना ती कोणाची, कोणाचीच
आता फक्त तिची ती, मुक्त...

खरच असतात का अशा कोणी मुक्त
की कवितेतची एक वर्दळ नुसती...
---

Tuesday, May 31, 2022

टुमदार गाव

माणसाचं आयुष्य म्हणजे

एक वसलेलं टुमदार गाव!


बालपणी डुबकी मारायला

पायथ्याशी असणारा शांत किनारा

ये, पुढे ये म्हणत 

वाकुल्या दाखवणारी छोटी बोट

किनाऱ्यावरच्या छत्राखाली

मनसोक्त हुंदडणं.

अन तारुण्याच्या उभारीतलं

ते नावेतून स्वत:ला

झोकून देणं, 

स्वत:च्याच परिसीमा जोखणं.

मग कधी तरी किनाऱ्याशीच जरा दूर

आपली बोट नांगरणं

तिथून आपली उंची, आपलं प्रतिबिंब

सिद्ध करत रहाणं.

अन मग कधीतरी

उंचावरच्या पर्वतावर

बसून केलेली साधना,

मन:शांतीसाठी केलेले ध्यान.


या सगळ्यात आकाशीचा 

पांढरा शुभ्र, दिशा दर्शक

अभ्र बघायचा राहिलाच की...

अन राहिली सागरी 

दूर वर टाकायची नजर.


पण असो,

आभाळीचे निळे अन

समुद्राचे निळे

दोन्ही पोहोचलेच की थोडे थोडे.

अन हाती आलेले सगळं

टुमदार सजलं, सजवलं.

अजून काय पाहिजे?

शिवाय पर्वतराशीवरून का होईना,

शुभ्र अभ्र अन त्याचं तेज 

पोहोचलं थोडं थोडं.

म्हणतात ना, माणसाचं आयुष्य;

एक टुमदार गाव, वसलेलं! 

---

Saturday, May 28, 2022

सोनसळी

 


जशी निळ्याच्या ओठी 

साजिरी बासुरी

तशी जलाशयी सोनेरी 

उभी मध्यात मुरली


घन:श्यामाच्या बासुरीचे 

सूर आसमंती

सोनसळी मुरलीची 

आभा आसमंती


सुखदु:खाच्या भाऱ्यात 

शांत करी शाम

निसर्गाच्या कुशीतून देई 

आशेचा संदेश!

---

Tuesday, May 17, 2022

अळवावरचा थेंब

अळवावरच्या थेंबा सारखे, जमेल का मज जगणे?

कशातच मिळून न जाणे, असेल का ते जगणे?


भाव भावना, गुंत्यात त्या साऱ्या, हरवून जाणे

की साऱ्यातून निर्लेप राहणे, हे असेल जगणे?


पुस्तकांतील अनुभव, ज्ञान, विचार वाचित जाणे

की ध्यान धारणा, अध्यात्म साधणे, हे असेल जगणे?


समाजातील प्रत्येकाशी स्व:चे, नाते जोडत जाणे

की तुटूनी त्यागुनी, ध्यास तयाचा, हे असेल जगणे?


प्रत्येकाचा मार्ग असा, भिन्न विभिन्न असे

या सगळ्यांचे, सगळ्यातून जगणे, हेच असेल जगणे?

---

Friday, May 13, 2022

कृष्ण मंजिरी


दिवसभर केलेल्या तडजोडी, 

व्यवहार सगळ्याची पुटं

चढत रहातात त्याच्यावर.

लोकांची पापं स्वत:वर घेत

त्यांना आशिर्वाद देत

तो सगळा राप स्वत:वर चढू देतो

भक्ताला आश्वस्त करत

सगळे शाप आपल्यावर

लेवत जातो.

अन मग दुसऱ्या दिवशी 

सचैल स्नानाने शुचिर्भूत होऊन

पुन्हा उभा रहातो कृष्ण, 

....... दर्शनासाठी!


स्नानाचे निर्माल्य आपसूक 

वाहिले जाते तुळशीला.

सगळी पापं येऊन पडतात 

तिच्या पायाशी.

अन तीही निमुटपणे, 

सगळ्यांचे सगळे अपराध 

पोटाशी घेते.


सगळा कळिकाळाचा काळा राप

लेवून घेते पानापानांवर, अंगभर

केलेलं सगळं कृष्णार्पण

शेवटी तिच्या नशीबी येतं.

कृष्णा, तू दिलेला काळेपणा 

उतरत गेलाय बघ 

वर्षानुवर्ष तिच्यात

अन गोरी , निर्वाज 

राधा बनलीय आता

..... कृष्ण मंजिरी!

---

Friday, April 22, 2022

कुणास ठावे

 


कशास आलो जगी मी या, कुणास ठावे

जगण्याची धुंदी तरी कशी मज, कुणास ठावे


भाजी भाकरी, खळगे भरणं करीतच आलो

जगण्याचा परि या उपेग काही, कुणास ठावे


प्रेम, आपुलकी, आदर यांचा प्रयत्न करीत आलो

यातूनी साधले का काही, कुणास ठावे


शिकणे आणि शिकवणे हे ही, करीत आलो

परि सगळ्याचा उपेग काही, कुणास ठावे


दया, कणव अन मदत सगळ्यांना करीत आलो

याने भले कुणाचे झाले काही,  कुणास ठावे


भाव इतरांचे जपणे - समजणे करीतची आलो

दु:ख किती कुणाचे हलके झाले, कुणास ठावे


कसा जगलो आयुष्य सारे कळतची नाही

जगलो का की बस, जीवंत होतो, कुणास ठावे

---