Friday, September 11, 2020

अलातचक्र


असं म्हणतात की

नदीचं मूळ आणि 

ऋषीच कुळ शोधु नये

संकटांचंही 

तसच असेल का? 

अलातचक्रासारखी 

फिरत रहातात

सुरुवात कुठे शेवट कुठे 

समजूच नये

एकानंतर एक 

सलग धगधगते 

अवकाशातले कुंड,  

अनाकलनीय आकर्षण

मध्यबिंदुत केंद्रीत

आशेच्या मिणमिणत्या

प्रकाशालाही 

गिळून टाकलेला

काळाकभिन्न मरण डोह

अन परिघाभोवती

गरगरणारी हजारो लाखो

विश्वं, जिवंत जीवनं

निशब्द गिळून टाकणारं 

नुसते डोळे दिपवणारं

अनामिक वेगाने धावणारे

भूल घालणारं 

एक अलातचक्र


Thursday, September 10, 2020

पोवाडा

 नातीने हट्ट केला शिवाजीचं गाणं लिही  :) मग तिला म्हणता येईल असा पोवाजा लिहुन दिला पटकन


शिवाजी राजा महाशूर

महाराष्ट्राचा गौरव

मावळ्यांचा मोठा आधार

होऊनी घोड्यावर स्वार

हाती घेऊनी तलवार

निघाला खानावर कराया वार

जी जी जी


हे इथे बघा पुण्यनगर

मुळामुठेचा किनार

लाल महाल मध्यावर

भोवती झाडी हिरवीगार

सिंव्हगडाचा शेजार

असे वसले गाव सुंदर 

जी जी जी


आला चालून शास्ताखान

सवे सैन्य दोन हजार

तोफा, गोळे अन तलवार

घेतले जिंकुनी बळावर

शास्ता भरवी दरबार

नगरजन झाले हवालदील

जी जी जी


शिवाजीने योजला कट

रात्रीत निघाली वरात

मावळे झाले सामिल

लपून आले वाड्यावर

थांबले होईस्तो अंधार

मग तुटून पडले शास्त्यावर

जी जी जी


शिवाजी राजा हुषार

घुसला शास्त्याच्या खोलीत

शास्ता मारे उडी खिडकीत

शिवाने केला त्याच्यावर वार

तुटली शास्त्याची बोटे चार

घाबरून पळाला पार

जी जी जी


मराठ्यांची बसली दहशत

शास्ता निघाला दिल्लीला परत

खानाचा झाला पुरा नि:पात

लाल महाली आला परत

शिवबा आला आपल्या घरात

पुण्यनगरी सारे आनंदात

जी जी जी

---

 

Wednesday, July 8, 2020

सुस्नात वसुंधरा



झरझर झरली
ही संततधारा
भिजवून गेली
आसमंत सारा

नवी नव्हाळी
उमेदही नवी
जागली उगवली
हिरवी कोवळी

उन्हात बसली
सुकवित पिसारा
मंदसा वाही
शीतल वारा

डोले सारी
सृष्टी जननी
आनंदे सृजननी 
सुस्नात वसुंधरा


Tuesday, July 7, 2020

जीवनवाट

खरं तर भिजायचंच असतं 
त्यालाही अन तिलाही...
छत्री तर नुसतंं एक निमित्त
जवळ येण्याचं, एकत्र चालण्याचं,
सोबत असण्याचं

दोघांनाही पक्क माहितीय
इवलुशी छत्री नाहीचे पुरणार
पण तिच्या मुळेे येणारी 
ही सोबत आहे
जन्मजन्मांतरिची

पडणारी एक सारखी पावलं, 
पाया खालची ओली जमिन...
सगळं तेच तर सांगताहेत
त्यांच्या मनातला ओलावा
एकमेकांबद्दलचा

ओथंबून आलाय हिरवा निसर्ग
तजेलदार नवपरिणित अन 
सोबत अनुभवी गहरेपणही
त्यांच्या नात्याची किती 
वैविध्यपूर्ण वीण

तसे गेलेत बरेच दूर
निम्मी वाट ओलांडून
करायचीय अजून पार
एकमेकांना जपणारी ही वाट, 
अहं जीवनवाट

Wednesday, July 1, 2020

भेट

आले आभाळ भरून
वाजे कडाडा ही वीज
भरु लागे वारं अंगात
धूळ भरारा अंगणात

अहो ऐकता का जरा
म्हणे रखुमाई भ्रतारास
वीट मोकळीच दिसता
समजली ती मनात

तीर चंद्रभागेचा धपापे
उर भरुनिया येई
तुक्या ज्ञानोबाचा आठव
कानी टाळांचा गजर

वाटेवरती निरा नद
उचंबळून उसासून
पालखीचा पायारव
राही कानोसा ती घेत

वाट सरळ; नागमोडी
घाटा दरी डोंंगराची
उन पाऊस वारा
चाले भक्तांचा हा तांडा

डोई तुळशीचे राऊळ
गळा तुळशीची माळ
पायी ओढ पंढरीची
मुखी रामकृष्णहरी

पालखी पुढे पालखी
मागे नाचे वारकरी
पाहत धावे पुढती
उराउरी भेटे विठुमाई

Friday, April 17, 2020

सुनसान शहर, शहर,गल्ली, घर

( गोरखनाथांचे एक निर्गुणी भजन सतत कानात वाजत असतं; शून्य गढ शहर... आज ते मनात वेगळं घरं पाडत गेलं... )

सुनसान शहर, शहर,गल्ली, घर
कोणजाणे सगळे कुठेयत
मी माझा,माझ्यात मी
बाहेर शांत पण काहूर आत

गाव, माणसांशिवाय
मोहला, माणसांशिवाय
बाजार सारा, माणसांशिवाय
सारेच कसे ओस, ओस, ओस ...

मुलांशिवाय शाळा शांत
मुलांशिवाय मैदानं शांत
मुलांशिवाय ओसरी शांत
घरातही मुलं शांत शांत शांत ...

धडधडणारी मशीनं बंद
उंचावणारे बांधकाम बंद
रोजगाराची टपरी बंद
मुकाट जत्था चाल चाल चाल...

दवाखाना, डॉक्टर नर्स मामा
प्रयोगशाळा, तपासणी
सरकार, प्रशासन, यंत्रणा
गडबड, ताण अन धाव धाव धाव ...

नदी शांत, संथ, स्वच्छ
हवा शांत, संथ, स्वच्छ
निसर्ग शांत, संथ, स्वच्छ
विषाणू मात्र जगभर फिर, फिर , फिर ...

कधी संपेल भयाण, भयाण शांतता
कधी उजाडेल जुनी
लगबगती सकाळ
बाहेर काहूर , मनात शांत शांत शांत ...

Wednesday, February 12, 2020

सोबत


(माझी मैत्रीण कविता नवरेचे हे चित्र बघून सुचलेल्या काही ओळी. थँक्यु कविता चित्र शेअर करायला परवानगी दिलीस  :) )

हिरव्या निबिड जंगलातून
अंधारलेल्या वाटा
संथ वाहणारी
काळी यमुना
सुर्यास्तानंतरची
केशरी अंधारी चंद्रकला
अन त्यात लहरत
झुलणाऱ्या नावेत
तुझी सोबत...
अजून काय हवं?
😊

Thursday, October 10, 2019

रे पावसा

का बरं इतका, कोसळतो आहेस
कुठे काय इतके, दु:ख पाहिलेस
काय इतके टोकाचे, तुला बोचलय
कोणाला इतकं, उणावतो आहेस
किती दिवसांचं काय, उतु जातो आहेस
का रे का इतका, भरभरून कोसळतो आहेस

सगळं सगळं अगदी, धुवून निघालं रे
सगळी लक्तरं आणि भांडीकुंडी घरे
सगळं सगळं वाहून, घालवलस रे पार
सारी लाज भिड, उतरली पार
उघडी पाडलीस, पालं अन पाठ
का रे का जीवघेणा,  कोसळतो आहेस

थांब रे थांब आता, संपली सारी ताकद,
संपला सगळा आव, ना उरला धीर,
कुठे कसा कसला, सांग बांध घालू
कुठे कसा कशाने, सारे कसे सावरू
कोणते शब्द आणू, कोणते हात देऊ
कोणत्या हाताने, डोळे किती पुसु
का रे असा उफाळून, कोसळतो आहेस

मान्य अगदी मान्य, झाल्या चुका खुप
बांधले बांध, आवळले नदीचे तीर,
झाडांचे कापले शेले, बोडके डोंगर,
कसे विसरलो, निसर्गाची नाळ
तूच आता त्राता, तूच थांबव आता
पुरे हा आकांत, आमचा अन तुझा

Tuesday, October 8, 2019

सुरकुत्या



मला नाहीच भावत फारसा
तुकतुकीत, नितळ, तजेलदार
चेहरा, त्वचा, अगदी व्यक्तीही.

ना कळतं व्यक्तित्व, ना विचार
ना प्रेम, ना आस्था, ना लागणी
व्यक्त होणं, अगदी निर्विकार

तुलनेत रेषां कशा सांगतात सर्व
काय काय सोसलं, कसं, किती,
सोसतानाही पचवलं, अगदी हसत

प्रत्येक सुरकुती जोडत जाते
त्याला न मला एकेका धाग्याने
कळत जातो तो, अगदी खराखुरा

त्याच्यातलं माणूसपण झिरपतं
त्याची माझी नाळ विणली जाते
भिजवत जाते आत, अगदी मनात