Saturday, July 21, 2012

.... चांदणे माझ्या मनी |

(परवा मा. राजेंद्र कंदलगावकर गुरुजींच्या शिष्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करताना सुचलेले काही ....)


वेगळ्या रंगात असुनि, रंगते त्यांच्या सवे
रचलेली माळ त्यांची, शब्द-सूतात ओवते |

पौर्णिमा त्यांच्या गुरुंची, सुस्वरांनी साजरी
सूर त्यांचे लीन सारे, भावपूर्ण स्वरांजली |

ओवला मोती हरेक, वाहिला श्री गुरुचरणी
साधकांच्या संगीतांचे, सूर कानी दरवळती

वेधता शब्दात सूरांना, शब्द ही झाले सुरिले
ओवलेल्या फुलांनी, सूत माझे गंधावले |

सूत-शब्द फक्त माझे, सूर्-मैफिल ही तयांची
पौर्णिमा त्यांच्या गुरुंची, चांदणे माझ्या मनी |

Thursday, June 21, 2012

पावसाचे गाणे

गार गार हा सुटला वारा, वीज लागली कडाडु 

नाचत नाचत चला सख्यानो, पावसात या भिजू ||


सुवास सुटला सर्व फुलांचा, चला वेणी माळू

गोल गोल धरुनी फेर, गाणी मजेची गाऊ 


चुर्र कशाचा आवाज येई, आई करते खाऊ 

चटकदार कुरकुरीत, भजी कांद्याची खाऊ 


नवे वर्ष आले शाळेचे, चला दप्तर घेऊ 

नव्या गोष्टी, नवा अभ्यास, नवी गाणी गाऊ 


कोणी म्हणे आकाश रडे, म्हणून पडे पाऊस 

अश्रू त्याचे गोड पण, करती धरेस संपन्न 


जाण सखे ग, आपल्याच दुःखात नको राहूस 

तुझ्या आसवांचे व्हावे सिंचन, नव्या रोपट्यास 


उठून उभे राहो कोणी, पाहुनी जिद्द तुझी खास 

कसे जगावे, आनंदी राहावे, समजावे त्याचे त्यास


गार गार हा सुटला वारा, वीज लागली कडाडु 

नाचत नाचत चला सख्यानो, पावसात या भिजू ||

Tuesday, May 29, 2012

साथ

दु:ख, सुख, अपुरेपणा
सा-या सा-या आवरलेल्या वेदना
तू येताच मात्र, अश्रूंनी मुक्त व्हावं
असं का व्हावं, तुझ्या सहवासात

बंदिस्त वणव्यात, न फुटणारा
भाऊक गर्दीतही, न पाझरणारा
तुझ्या संरक्षक आपुलकीत मात्र
धडाधड कोसळतो, असा कसा हा बांध

रक्ताची ओढ, नात्याचा बंध
मैत्रीचा धागा, या सर्वांहूनही
तुझे केवळ अस्तित्वही
व्हावे केव्हढे आश्वासक

तुझ्याशिवाय मी, माझ्याशिवाय तू
दोघेही असूच. पण त्याही पेक्षा
एकमेकांसाठी, एकमेकांसह असणं
किती आनंददायी आणि परिपूर्णही !

Friday, March 30, 2012

तू गेलास तेव्हा ...

वैशाखाआधीच
असा वणवा पेटला !

अनेकदा कळला,
अनेकदा नाही
पण भिडत राहिलास
प्रत्येक वेळेस,
आत अगदी आत
कोठेतरी...

'हृदया'च्या संगीतातून
पाझरला जेव्हा जेव्हा
शब्द शब्द तुझा;
आत आत
झरत राहिला
पाऊस,पाऊस नुसता...

माझ्याही मनातल्या,
मलाच न समजलेल्या
भावभावना
वाचत राहिले
कधी समजून
कधी न उमजून...

आता तर तूही गेलास,
आता येणारा वैशाख
कसा, कसा झेलू ?
अन आता तो पाऊसही
'निनादेल' की नाही
कोण जाणे ...

Saturday, March 3, 2012

स्वर्गलोकीची परी

जिथे फुलली रातराणी
धुंदावत तेथे जाई

जाईजुईचा वेल ही
अशी झुलते कमानी
फुले कुंद ठाई ठाई
झाड शुभ्र चांदण्यांनी

झुबे बुचाचे डोलती
वार्‍यासंगे वरखाली
नवे धुमारे फुटती
सुगंधी मधुमालती

टपोरी गुलाब कळी
शोभे बागेची राणी
छे स्वर्गलोकीची परी
येई माझिया अंगणी

Sunday, January 22, 2012

गाणे ...

तंबोरा कानाला लावून ऐकत रहावा
गुंजत राहणारा षडज ...
आयुष्याला छातीशी लावून
तशीच ऐकत राहिले
जगण्याचा हृदयंकार

तंबोरा लावताना पिळावी तशी
प्रत्येक खुंटी
पिळत राहिले सगळ्या भावभावना
अन जगण्याचा सूर कधी
नाहीच होऊ दिला बेसूर

वर वर पाहता छेडत होते
फक्त प सा सा सा
पण त्यातच होते
सारे, अगदी सारे सूर
आयुष्याच्याच गाण्याचे ... !

Monday, November 14, 2011

मनातले काही बाही....

मनातले काही बाही
आले आले ओठावरी
मनातले काही बाही
मग वाहे ओळीतूनी

सुख-दु:ख तुझे माझे
शब्द-सूर फक्त माझे
थोडे तुझे थोडे माझे
थोडे हिचे थोडे तिचे
गूज आपुल्या मनीचे
सांडत राही ओळीतूनी

मागे मागे जाई झोका
लपाछपी, काचापाणी
सागरगोटा, लगोरी
खापर्‍या नि सापशिडी
बालपणीचा हिंदोळा
झूले बाई ओळीतूनी

तीन पेडीची ती वेणी
रंगलेली लाल मेंदी
छुमछुम पैंजणे ती
चुल-बोळकी उलुशी
रंगलेली भातुकली
बघ दिसे ओळीतूनी

राजकुमार मनीचा
धावे अबलखी घोडा
वाटे भरुनी घालावा
हाती हिरवा तो चूडा
सडा गुलाबी स्वप्नांचा
सांडीतसे ओळीतूनी

मनाजोगता सौंगडी
दिला हात त्याच्या हाती
स्वप्नं दाटली नयनी
आता करायची पुरी
किती रमले संसारी
सांगे बघ ओळीतूनी

सहजच ओलांडले
ओटी-पोटीचे मी धागे
सांभाळुनी ओलांडले
भरले माप सासरचे
माहेरचा धागा लपे
काळ्या ओळीतूनी

किती सहज चालले
सार्‍या नात्यांच्या या वाटा
किती सहज रंगले
रंगामध्ये मी या सार्‍या
सुखी संसाराचे गाणे
आता गाई ओळीतूनी

Wednesday, November 9, 2011

मी एक स्वतंत्र वर्तुळ

ऊल्हास भिडे यांच्या "π (२२/७)"" :http://www.maayboli.com/node/22901
या कवितेकडून प्रेरित होऊन



माझ्या भावनांचे
अर्थ उलगडत, संदर्भ देत
भावभावनांच्या गुंत्यात
राहिले मी गुंतत
मी आखलेल्या पण
तू दुर्लक्षिलेल्या
व्यापलेल्या परिघाच्या
वर्तुळाच्या केंद्री....
मी .....
……………………
हळूहळू हळूहळू
माझा परिघ
आकसत गेला
मग एक नवेच
फक्त माझे असे
स्वतःचे व्यक्तित्व असलेले
"माझे" वर्तुळ
सापडले मला
तू मात्र पूर्वीच्यात
पारंपारिकतेत मश्गुल
माझ्या वर्तुळाच्याही परीघा बाहेर
माझ्यापासून कितीतरी दूर.....

Monday, October 24, 2011

आयुष्य

काल होता, सूर्य उद्याचा, कवेत माझ्या
झाकळून आले, आजचे नभ, अंगणात माझ्या

नवजात होत्या कल्पना, नवथर होत्या अल्पना
संसार गाडा ओढताना, फव-त ठरल्या वल्गना

कालच्या ताज्या दुधाची, झाली उद्याला कढी
गालबोट एक दह्याचे, आयुष्य सारे विरजले.

Sunday, September 4, 2011

इंद्रधनुष्य


"बघ,
पुन्हा उशीरा आलास तू...
केलीस ना पुन्हा
माझी घालमेल ?"
काळेभोर मेघ डबडबले...




अन तेव्हढ्यात
हसलास तू...
ओंजळ पुढे केलीस
सोनटक्क्याची
सोनेरी, नाजूक,
लखलखीत उन्हाची


अय्या कित्ती छान !
अन हो रे,
अशाच वेळेस
पडतं ना रे
इंद्रधनुष्य ?
ए बघ ना रे,






"अगं मी बघतोच आहे ते..."
अन बघितलं तर
पडलच होतं प्रतिबिंब
त्याच्या डोळ्यात...
एका हसर्‍या इंद्रधनुष्याचं .... !