Thursday, September 14, 2023

जीवन

पहाट होते तशी,

डोळे किलकिले उघडू लागतात.
पण फार दिसत नाही
तेव्हढी नजरच नसते.

मग हळूहळू उजाडू लागतं
थोडा थोडा प्रकाश
झिरपू लागतो
मग आसपासचं काळं पांढरं
थोडं थोडं कळू लागतं.

मग जरा उन्ह वर येतात
स्वच्छ प्रकाशात
सगळे रंग झळाळून उठतात.
सकाळच्या कोवळ्या उन्हात
सगळंच कसं छान, सुंदर
दिसत रहातं, भासत रहातं.

उन मग मध्यान्हीचा सूर्य
सगळे जीवन देत, घेत
वास्तव उभे रहाते समोर.
उपभोगाची सगळी द्वारं
हात पसरून स्वागत करतात.
एक एक उन्हाची तिरिप
एक एक सावलीचा वसा
घेत, देत  साथसंगत देत घेत
कधी उन्हाच्या झळा
कधी सृजनाचा उन्माद
साफल्याचे मनोरे, मनोहर!

अन मग हलकेच सूर्य ढळू लागतो.
एक समाधान, एक स्थिरता
हळूहळू रंध्रारंध्रात पसरत जाते.
एक स्थैर्य, एक निवांतपणा
एक समाधान, एक पूर्तता
हळुवार पसरत जाते
घरभर, आयुष्यभर, रोमारोमात.

अन मग संधिकाल येतो
एक सावट पण सोनेरी किनार
थोडे साफल्य, थोडी हुरहूर
कुठे मळभ, कुठे एखादी चांदणी
अन मग हळूच सावल्या
गायब होत जातात.
कठोर वास्तव दुलईत 
सामावून घेऊ लागतं.

अन मग येतेच रात्र.
काळीशार, डोळे मिटो, न मिटो
अंधारतंच सारीकडे.
पण तेव्हाच झोप कमी होते
मग अंधारल्या आकाशात
टक लावून बसावं वाटतं.
अन तेही आनंदाचंच होतं.
हळूहळू एक एक चांदणी
दिसू लागते, चमकू लागते.
आयुष्यभराची मेहनत
अशी चंदेरी बनू लागते.

अन मग उगवतो चंद्रही
अनेक चंदेरी क्षण पुन्हा
उजळवून टाकतो
कितेक क्षणांची शिदोरी
अशी लख्ख उलगडून बसतो
एक एक झळाळता क्षण
एक एक लुकलुकती चांदणी
एक एक चकाकता कवडसा
जमवलेले चंद्रतारे
येतात आठवणींच्या घेऱ्यात
अन रात्र सारी उजळून जाते.

अन मग उत्तररात्री
निमालेल्या डोळ्यांना
पुन्हा मिटावं वाटतं
पापण्यांवरचे समाधान
अलगत उतरत जातं.
एक नाजूकशी स्मित लकेर
उमटत जाते... तिचाच
हलका उजेड पसरतो
पूर्वेच्या किनाऱ्यावर, अलवार!

Tuesday, September 5, 2023

मार्गारेटचा निर्णय

(न्यू अॅमस्टरडॅम या सिरिजमधल्या एका पात्राला समर्पित)

मला ऐकायचं होतं,

तुझं बोलणं, तुझा आवाज
पक्षांचा गुंजारव, सिंहाची गर्जना
गाड्यांचे आवाज, विमानाचा वेग
नदीची खळखळ, समुद्राची गाज
वाऱ्याची झुळक, पानांची सळसळ
वाद्यांचे संगीत अन गायकाची लकेर
अन असच किती तरी, काय काय...

मला सांगायचं होतं,
माझ्या मनातलं सारं सारं गुज
गायची होती पक्षाची लकेर,
घ्यायची होती सुंदरशी तान
मांडायचे होते माझे विचार
करायच्या होत्या खूप चर्चा
घालायचे होते वाद विवाद
साधायचा होता संवाद, साऱ्या जगाशी...


अन मग मी निर्णय घेतला,
कानांचे पडदे दुरुस्त करायचे
बाहेरच्या विश्वासाठी कवाडं उघडायची
मोठा निर्णय होता, पण ठरवला घ्यायचा
अन मग सुरु झाली धडपड, ऐकण्याची...
योग्य त्या सगळ्या काळज्या घेतल्या
सगळी अगदी सगळी तजवीज केली
अन सुरु झाला एक नवीन प्रवास, नादमय...

अन मग मी ऐकला,
गडबड, गोंधळ, गोंगाट, कोलाहल
कोकिळेचे चिरकणे, सिंहाची रौद्र आरोळी
गाड्यांचे भोंगे, विमानाच्या कानठळ्या
नदीच्या पूराचा भीषण खळखळाट
विजांचा कडकडाच अन रौं रौँ वारा
मिरवणुकीतल्या ढोल ताशांचे कडकणे
अन मी कान घट्ट बंद करू पाहिले...

अन मग मी बोललो,
केला तुझ्यावर आरडाओरडा
आरोप प्रत्यारोपांचा भडिमार
रागावर स्वार होत गायलो बेसूर
कचाकचा भांडलो विचार मांडताना
चर्चेच्या नादात विसरलो विवेक
साऱ्यांवर उगारली तत्वांची पहार
हे काय करून बसलो मी...

नको, नको मला हे उसने श्रवण,
मला तो पूर्वीचाच पडदा हवा आहे
नाद न उमटवणारा
मला ती शांतता हवी आहे
कोणतेही नाद न उमटवणारी
मला ती निरवता हवी आहे
समाधान पसरवत नेणारी
मग उपसून फेकून दिले ते कान

आता एक अपार
शांतता नांदते आहे
आत, आत खोलवर
माझ्या हृदयाचा ताल
माझ्या धमन्यातला प्रवाह
एक अपार शांतता
एक नवा प्रवास
सजग, निरव समाधान!

- अवल

Sunday, August 6, 2023

प्रिय मनी


मला आवडते गोधडी

ब्लँकेटपेक्षाही, जास्त

खूप जास्त"

ब्लँकेट असतं खूप गरम

लोकरीची उब

त्याचं खरबरीतपणा

कधी अगदी अती मऊपणाही

म्हटलं तर जास्त

जाड अन टिकावूही...

पण गोधडी?

ती असते नरम, मऊ

म्हटलं तर उबदार

कधी गारही

पण तिच्यात असते 

आजी, आईची माया.

त्यांचं आयुष्य वापरून

बनलेला असतो

एक एक पदर.

त्यांचे अनुभव, विचार;

माझ्यावरचा त्यांचा

गाढ विश्वास;

अन माझी त्यांच्यावर

सगळं सोडून देण्याची

सगळी तयारी...

हे बंधच तर बनतात

सगळ्यात महत्वाचे.

ती पिढ्यानुपिढ्या

वाहत आलेली संस्कृती,

ते आपलेपणाचे धागे

एकमेकांत घट्ट विणलेले.

कधी विलग न होणारी नाती...

मला माहितीय शेवटी

गोधडीच तारून नेणार

मला, तुला, आईला

अगदी आजीलाही.

इतकच नाही तर

साऱ्या विश्वाला!

मला आवडते गोधडीच

त्या ब्लँकेटपेक्षा!

- अवलमावशी

Friday, August 4, 2023

सापळे

एखादी अभद्र कृती

नासवून टाकते सगळं.

प्राप्त परिस्थितीवरची

साधी एक प्रतिक्रिया;

पण होतं नव्हतं ते सारं

एका क्षणात पुसून जातं.

समोरून आलेला एक वार

तलवारी ऐवजी ढालीवर

पेलता आला असता तर...!

तर ही सगळी क्रूरता

अशी वर आली नसती.

मागे वळून पहाताना

लाज वाटत रहाते

कुठून आली, कुठे दडलेली

इतकी बिभत्सता???

सुसंस्कृततेचे सगळे लेप

खळाखळ आपल्या पायाशी

ढलप्यांनी पडत रहातात.

अन आपण सारेच खुजे होत

त्या ढलप्याच्या ढिगाऱ्यात

हळूहळू सापळे बनत जातो...

Wednesday, August 2, 2023

तर असंच असतं....

विचारांचं कसं असतं न

कधी कधी निरभ्र आकाश

छान निळं निळं, स्वच्छ.

कधी गच्च भरून आलेलं

गडद काळंभोर अंधारलेलं.

अनेक छोट्या पुंजक्यांचं

तर कधी सलग अच्छादन.

कधी भराभर पळणारे मेघ

कधी ओथंबून राहिलेला नद.

कधी झरझर बरसणारे

कधी ढगफुटीने कोसळणारे.

कधी एकाच वेळी धप्पकन

तर कधी संतत धार रिपरिप.

कधी इंद्रधनू सारखे रंगबिरंगी

तर कधी निस्तेज निरस.

कधी गडद असूनही उल्हसित

कधी गडदगूढ, झाकोळलेले.

कधी सूर्यप्रकाशात नाहून

तर कधी विजांनी लखलखून.

कधी वादळी झंजावात लेवून

कधी मंद शीतल झुळूक.

कधी विरळ न उमजलेले

कधी ठोस, ठाम समजलेले.


तर असंच असतं विचारांचं


Tuesday, July 18, 2023

पावसाळी सांज

हे आज निघाले आभाळीचे ढग

करी सोबत त्या एकाकी एक खग

क्षितिजावर उभे, लालकेशरी रंग
धुसर धुक्याची, दुलई असे संग

टपटपे ही धारांची, अविरत गाज
कौलाशी सजे, पागोळ्यांचा साज

ओलेती थंडगार, ओसरती सांज
सुसाट वारा वाजवी, पानांची झांज

चमके मधेच वेडी, एखादी वीज
येई उतरुनी हळुच, नयनी नीज

Monday, June 19, 2023

कविता कशी होते?

माझ्या संदर्भात कविता दोन प्रकारे माझ्याजवळ येते. एक पूर्णताच स्पॉंटेनियस! ज्यात मनात एक प्रकारचा कॅनव्हास तयार होत जातो. वेगवेगळ्या भावना, मूडस तयार होत जातात. कधी याला बाह्य वातावरण निमित्त असतं, तर कधी अंतर्मनातच काही घडत असतं. मग ते कधी वादळी वारं असेल, कधी ठप्प पडलेली हवा असेल, तरी आसपासचा कोलाहल असेल, कधी शांतता असेल, कधी मनातली अस्वस्थता, कधी मनातली निरव शांतता, कधी मनातली उलघाल, कधी मनातले अपार समाधान, ...!  हा एका अर्थाने कवितेचा कॅनव्हासच! हळूहळू या मानसिक अवस्थेला जास्त नेणीव रूप येतं. भावनांचा गुंता सुटून, एक रेषीय भावना स्थिरावत जाते. 

पुढची पायरी शब्द सुचण्याची. मग ते सुचतानाच, खूप नेमकेपणाने स्वीकारले जातात. ही प्रक्रिया नेणीवेवरच होते; पण कधी कधी नंतर एखाद दुसरा शब्द जाणीवपूर्वक येथून बदलावा वाटतो. 

बरं, हे शब्द मनातून वर येत असतानाच नेमका फेर, नेमकी लय, नेमकी जागा घेऊन येतात. फारच क्वचित त्यांच्या जागा नंतर हलवल्या जातात.  मग मनातच या शब्दांच्या मालिकेला जरा घोळवलं जातं. तेही जाणीवपूर्वक नाही; तर एक चाळा असावा तसे; म्हणजे कधी कधी आपण अकारण पाय हलवत राहतो, झोपाळ्यावर बसल्याबसल्या नकळत हलके झोका घेतो, कधी नकळत कपाटामधलं नेमकं एकच पुस्तक उचलतो किंवा साग्रसंगीत वाढलेल्या जेवणाच्या पानांमधला, नकळत एखादा पदार्थ, पहिला निवाला म्हणून उचलतो; तसे काहीसे! काहीच निश्चित कारणमीमांसा नसते. आवड वगैरेही नसते. फक्त त्या त्या क्षणांचा देन! 

तर तसे हे शब्द आणि त्यांची रचना. ती उगाच पुढे मागे होत राहते. आणि मग एक क्षण असा येतो आपल्याला आपल्याच मनात चाललेले हे सर्व जाणवते, लक्षात येते. आणि मग तेव्हा घाईने ते सगळे अक्षरात उतरवून ठेवण्याची निकड होते. मग हाती असेल तो कागद, असेल ती लेखणी आणि असेल त्या माहौलमधे ते जसं आलं तसं बोटातून उतरेल उतरवू देणं इतकच आपलं काम! कधी अशी वेळ येते असते की ती वास्तवात प्रत्यक्ष उतरवणे शक्यच नसतं. मग ते मनातल्या एखादा तावदानावरती, डोळ्यांना अक्षर दिसतील असं उतरवणे भाग पडतं. ते एकदाच उतरवलं,  डोळ्यांना दिसलं की झालं. सृजनाची प्रक्रिया पूर्ण! 

या सगळ्यात मी असते ती ही अक्षरं उतरवण्या पुरतीच. बाकी सगळे खेळ अंतर्मनात खोल कुठेतरी चालू असतात. ना त्यावर माझा अंमल, ना माझे काही नियंत्रण, ना माझी निवड. पूर्णतः आपापत:  घडत असणारी ही प्रक्रिया. 

अर्थात ही क्रिया घडत असते तेव्हा, माझेच अंतर्मन काही खेळत असतं. अन हे सगळ्या खेळांचे शब्द, अनुभव, भावना, वृत्ती, विचार, क्षमता हे सगळं मीच कधी न कधी कमावलेलं असतं. अगदी प्रयत्नपूर्वक, कष्टाने स्वतःला भरपूर तावून सुलाखून. म्हणून ती कविता पूर्णत: माझीच असते. पण नियंत्रण, निवड; ते मात्र माझं नसतं. ती त्या त्या क्षणाची देन असते. ही जी कविता होते ती पूर्णतः स्वतंत्र सृजन! त्यात जे जे असतं, ते ते सगळेच्या सगळे माझं असतं. भले निवड, नियंत्रण त्या त्या क्षणाचा असेल, पण ते क्षणही माझे स्वतःचे असतात. त्यामुळे ही कविता मला जास्त खरी किंवा माझी वाटते.

दुसरी कविता, कधीतरी दत्त म्हणून समोर उभे ठाकते. निसर्गातली एखादी निर्मिती, एखादी घटना, एखादी सुंदर कलात्मक वस्तू, एखादा कलात्मक फोटो, एखादं चित्र, एखादी समोर घडणारी हृद्य घटना,... अगदी काहीही जे तुम्ही स्वतः आधी अनुभवलेलं नव्हतं. त्यावर अंतर्मनात आजवर काहीही उलघाल झाली नव्हती. काहीही मंथन झालेलं नव्हतं.  ते बघितल्या क्षणी तुमच्या मनात काही वादळ उठतात. अचानक त्या दृृृष्य, घटना, चित्र, निसर्गातल्या घटना एकदम थेट मनात घुसतात. आणि मग अत्यंत चपळाईनं मन त्यातून काही शब्द अलगद हाताच्या बोटांमध्ये सोडतात. कधी त्याला लपटून आपला जुना अनुभव, विचारही वर येतो. पण हे खूप चटकन, थोडे वरवरचं असतं. अशा कविता कमअस्सल असतात असं नाही. पण वेगळ्या असतात. त्यात समोरचा निसर्ग, फोटो, चित्र, वगैरे ची टक्केवारी जास्त असते आणि माझ्या अंतर्मनाची टक्केवारी कमी असते. 

दोन्ही कविता म्हटल्या तर स्पॉंटेनियसच असतात. पण पहिली मंद आचेवर आटत असलेल्या बासुंदी सारखी. तर दुसरी मिल्कमेडमध्ये भसकन दूध ओतून काहीशी पटकन तयार झालेली बासुंदी.

असते बासुंदीच. पण पहिली रवाळ, खमंग, दाट, मधूनच साईची स्निग्धता जाणवणारी अशी बासुंदी! तर दुसरी निघोट, घट्ट, जड अशी बासुंदी!

---

Sunday, June 18, 2023

पाऊस अन पाणी

 मध्यंतरी सलमान जावेद यांची एक कविता वाचली. "ट्री अँड आईसक्रिम". तर त्या नंतर सुचलेलं काही...


पाऊस...

धो धो पाऊस आवडतो
रिपरिपही आवडतो

उन्हातलाही आवडतो
अंधाऱ्या रात्रीचाही आवडतो

रिमझिमही आवडतो
वादळी वाऱ्याचाही आवडतो

संततही आवडतो
बदाबदाही आवडतो

शेवटी वहात मिळतो
समुद्रालाच!

----

पाणी...

पाणी कोणतंही आवडतंच.
पावसाचं आवडतं
नदीचही आवडतं
झऱ्याचही आवडतं
तळ्यातलं आवडतं
तलावातलंही आवडतं
ओहोळामधलं आवडतं
पाटातलंही आवडतं

शेवटी बी रुजण्याशी मतलब!
---

Sunday, June 11, 2023

नीलाक्ष

फोटो क्रेडिट:  सोनल इनामदार


हा निलकंठ घेई उशाशी रान

झोपे तरीही जागेच असे भान


दोन्ही नयन जरी मिटलेले

तिसरा ठेवतसे जगाचे भान


जरी लोकांस दिसे तो लाल रक्तिम 

परि निरवतेत असे संथ शांत सान


जग शांत, निसर्ग हिरवा गार

मग अरिष्टनेमि होई नीलाक्ष

---

Thursday, June 8, 2023

हे मेघ निघाले

हे मेघ निघाले आज

पसरुनी दोहो हात.

बाहुत घेऊ पाहत

तेजाचा झळाळ ताप.

रिचवुनी पोटी आग

पसरवे थंड वात.

शिडकावे वर फार

अलवार नीर गार.

ओटीत रात्रीच्या आज

उद्याचा असे श्रृंगार .