Monday, February 9, 2026

म्हटलं ना...

 

भेटावं लागतं कधीतरी
आपल्याला, आपल्याच मनाला...

आपणच कधीकधी स्वतःचाच
येतो राग, होते चिडचिड
आपलीच एखादी कृती,
विचार बोचत राहतो
टोचत राहतो जिव्हारी लागतो
मन खात राहतं
स्वतःलाच!

अन मग शरीर
मनाला शांत करायला
स्वतः खात राहतं
अरबट चरबट
समोर दिसेल ते
मग तर काय
शरीराही चिडतं, कावतं
संप करतं
नाही तर सरळ
भडाभडा ओकून टाकतं

आणि मग तेव्हा जाणवत
गडबड आहे काहीतरी
हुकतय काहीतरी चुकतंय काही तरी
शरीर थकून जातं
मन तर कधीच सुकलेलं...

मग एखादी शांत संध्याकाळ
हातात कॉफीचा कप
आणि आपलीच आपल्याला सोबत!

निवळत रहातं आकाश
झिरपत जातो सायंप्रकाश;
हळूहळू मनातही!
काही तरी उलगडू लागतं
सात कप्प्यातलं
भळभळून व्हायला लागतं
खोल थिजलेल्या जखमा,
कोण कुठले दुखरे आप्त
तरंगू लागतात
मनाच्या तळ्यात
धुवत धुवत होऊन जातं
सारं मन अवकाश ...

डोळ्यातून पाझरतं काय काय
चूक, संताप, चिडचिड,
असहाय्यता, आक्रमकता,
एकटेपणा, भ्रमनिरास,
फसवणूक, निराधार...
सगळं सगळं
भसभसून वाहून जातं.

आणि मग येते
एक नीरव शांतता
आता नसतात कोणीच
राग, लोभ, नसतात क्लिमिषं
नसतात आरोप 
नसते अपराधीपण
नसतो एकटेपणा
आता मन मनाशीच बोलू लागतं
काय, कुठे, कसं, किती,
का, कोणी, केव्हा, कशाला...
हळूहळू उलगडत जातात
सारेच प्रश्न!

फक्त ती वेळ यावी लागते.
म्हटलं ना,
भेटावं लागतं कधीतरी
आपल्याला, आपल्याच मनाला!

No comments:

Post a Comment