Tuesday, November 12, 2024

स्नेहबंध

(बालमानसशास्त्रातला एक सिद्धान्त अॅटेचमेंट थिअरी - स्नेहबंध सिद्धान्त. त्याला अनुसरून)


जेव्हा म्हणता मुलांना
हट्टी चिडा रडका
तो प्रतिसाद असतो त्यांचा
तुमच्या पालकत्वाला

कापली, तुटली नाळ
तरी स्पर्शाला आसुसले बाळ
अन अव्हेरता स्तनपान
जुळते ना तन, ना मन

मी आहे बाळा सोबत
हा आधारही पुरेसा असतो
समोर नसताही मग
बाळ सुरक्षित राहातो

दुर्लक्ष मात्र मातेचे
गोंधळतो बाळ
आयुष्याला तोंड देताना
चाचरतो मग फार

साधे पुरेत खेळ
आईबाबांचा मेळ
पालकत्वाचे भान
वाढ बाळाची होई छान

भारंभार अन महाग
नुसतीच खेळणी समोर
आईबाबा समोर नाही
निकोप वाढ कैसी व्हावी?

नात्यांचा पट अवघड
जपू बाळाचा विकास
स्नेहाचा बंध धरोनी
बाळ वाढी निकोप

जर टिकले नाही नाते
ना कुटुंब एकसंध
बाळ होई मोठे परि
विस्कटतो स्नेहबंध!
---

Saturday, October 5, 2024

कधी झाकोळुनी येते

कधी झाकोळुनी येते

आकाश, काळे करडे

काय काय कोण घालते

आभाळा साकडे


पेरले भुईत हे दाणे

जरा शिडकावा पडे

बिजास ओलावा पुरे

कोंब गाभ्यातून उले


मग भुई भेग आवळे

पोटी काय ते साकळे

जेव्हा रोप वर येते

जनास तेव्हाच आकळे


झाड हिरवे, किती वाढे

फुटे किती ते धुमारे

फांदीच्या बेचक्यात उभारे

उसवे मातृत्वाचे उमाळे


उन कडक कोरडे

भूमी कोरडी होत जाते

वंश टिकावा इच्छेने

झाड प्रसवी फुलांची राने

---

Friday, September 27, 2024

प्रेम म्हणूनि गाईले

जाहल्या काही चुका अन्‌ शब्द काही बोललेले

तू दिलेले दु:ख सारे, प्रेम म्हणूनि गाईले

प्रेम भरल्या त्या दिसांचा, आठव जागा आजही
एकटीने झेलते आघात सोयऱ्यांचे, कधीची
त्या क्षणांना साद घालीत, संसार सारा ओढिते
तू दिलेले दु:ख सारे, प्रेम म्हणूनि गाईले...

होईल सारे नीट अन, पार करेन भवसागरा
आशा ही लावुनिया हृदया, मी कधीची धावते
मी असे सर्वस्व माझे, तुलाच रे वाहिले
तू दिलेले दु:ख सारे, प्रेम म्हणूनि गाईले...

आज हवा आधार मजला, सांग तू देशील ना
प्रेमभरल्या आसवांना, तू कवेत घेशील ना
साथ लाभावी तुझी, साठीच सारे साहले
तू दिलेले दु:ख सारे, प्रेम म्हणूनि गाईले...
---

Thursday, September 12, 2024

माती

 माती,

आधी भिजते,

मिळून येण्यासाठी 

मळून घेते,

स्वत:चे एक एक 

अस्तित्व मिटवते,

तयार होते

नवीन रुप घ्यायला!

अन मग कुठे,

मूर्तिकार घडवतो,

सुंदर मूर्ती!

अन मग

मूर्तीला नमस्कार

मिळत रहातात,

माती,

माती, मुकीच रहाते...

---

Sunday, August 18, 2024

वर्षा

आकाश पेटले हे

प्रपात ओतूनी हे

त्या शामवर्णी नभाचे

कळेले गूज मनीचे?


बरस बरसून कधीचा

आता लकेर अबोली

मनसोक्त तो पडोनी

झाला व्यक्त पुरेसा?


आत आतला कल्लोळ 

कोसळे असा सारा

मिटला की निवला 

तो अधिक झाकोळ


बघ पसरोनी हात

आली काजळ रात

जा सामावुनी तिच्या

नीज आता करात

Wednesday, August 14, 2024

शेर

 अभी जाम भरा भी न था

और तुम चल दिये मय़कदे सें
हिज्र की रात तो बहोत दूर है
और तुम हिसाब ले कर बैठ गये

-अवल

Saturday, August 3, 2024

राह

फोटो क्रेडिट:  रश्मी

इन सब्ज़ राहों की कसम

चलते रहना ऐ शरिक हयात


सब्ज की गुफाँ से 

नजर नहीं हटती

काश तेरी पहलुँ में 

सीमट ही जातें


सब्ज परदा ओढे हुये

ये कितनी दस्त तिरी

कितनी तड़प रहीं है

आगोश में लेने के लिये


सब्ज पत्ते पर 

ठहरा हुवा ये लब्ज़

बयाँ कर रहा है के 

तू ही है तू ही है तू ही है!

फोटो क्रेडिट : रश्मी



Monday, July 15, 2024

निवारा

 गुहा असू दे

विस्तिर्ण झाडाचा पसारा असू दे
जमिनीत कोरून अन
झावळ्यांनी शाकारलेली असू दे
काटक्या काटक्यांची असू दे
मातीने लिंपलेली असू दे
दगडांनी उभी केलेली असू दे
लाकडं जोडून साकारलेली असू दे
सिमेंट, वीटांची असू दे
काचांची असू दे

ठेंगणी असू दे
उंच उंच असू दे
कौलारू असू दे
धाब्याची असू दे
छोटी असू दे
वा मोठी असू दे
शांत निवांत असू दे
वा भरलेली असू दे

शेवटी डोक्यावर
छप्पर असलं की झालं!

Tuesday, July 2, 2024

हरवलेपण

 


एखादी ओळ अशी हट्टी, हरवूनच बसते. 


अन मग कधीतरी 

आपण बेसावध असतो 

अन ठक्ककन समोर 

उभी रहाते

म्हणते, 

काय आहे न ओळख? 


अन मग आपण तिला 

शब्दात गुंफायचही विसरतो

मग तीच आपली आपली, 

येऊन बसते तळहातावर

अन आपण नुसतं हल्लख होत, 

तिला अलगद कागदावर उतरवतो.


हरवलेली ती ओळ 

आपसूक उतरते कागदावर

अन मग आपण होतो पिसे

हलके हलके उडत

आपणच हरवून जातो...

Saturday, June 29, 2024

अकु

आभाळ भरून यायचेच
आठवणींचे
किनारही असणारच
दु:खाची
इतक्या वर्षांचे कायकाय
साठलेले
इतक्या साऱ्या अनुभवांचे
भांडार
इतक्या साऱ्या गप्पांचे
सार
खुसखुशीत हास्याच्या कितेक
राशी
चर्चा वादविवादांच्या कितेक
मैफलि
सुरेल गाण्यांच्या मोहक
लकेरी
सल्ले, उपाय अन माहितीच्या
खाणी
माऊच्या दुखऱ्याच पण
गंमतीजमती
तिच्यासाठी म्हटलेले श्लोक पाढे
गाणीबिणी
बहिणीसोबतच्या सगळ्या
धावपळी
केरळचा निसर्ग, तिथली नदी
अन पूर
तिथली काढ्या मसाजाची
दिनचर्या
सिस्टर आयांच्या पोटची
माया
अनेको उपक्रमांमधला सजग
सहभाग
छोट्या मैत्रिणींशी केलेली
दोस्ती
ओळखीच्या अनोळखींच्या मनातला
आदर
सखेग मधलं तुझं समंजस
अढळपद
आपल्या आजाराबद्दलची शांत
स्विकृती
प्रत्येक संकटाला साजरं होणं
हसून
एकदा जोडलं की जोडलं अशी
नाळ

तर अशी ही न संपणारी
यादी
म्हटलं न, भरून यायच्याच
आठवणी
न संपणाऱ्या, उत्साह आनंद
इंद्रधनुष्यी
असच जगलीस आयुष्य
भरभरून
अन शिकवून गेलीस कसं
जगायचं!