Friday, July 29, 2022

गोष्ट - तुमची आमची

आजी

पहाटे उठायची चूल पेटवायची
दुधाची चरवी ठेवून
केरवारे आवरायची
आन्हिकं उरकायची
सडासंमार्जन, रांगोळी, पुजा
मग सगळ्यांचा नाश्तापाणी
भाजी, भाकरी, भात आमटी...
दुपारची वामकुक्षी
संध्याकाळचा केरवारा
सांजवात, शुभंकरोती, रामरक्षा
तुळशीपुढचा दिवा लावणं
रात्रीचा स्वयंपाक, चूल सारवणं...
सगळं सगळं रोज तेच

आई
सकाळी उठायची गॅस पेटवायची
दुध, चहा ठेवून
केरवारे आवरायची
आन्हिकं उरकायची
उंबऱ्याबाहेरची रांगोळी, पुजा
मग सगळ्यांचा नाश्तापाणी
भाजी, पोळी, भात आमटी...
दुपारची वामकुक्षी
संध्याकाळचा केरवारा
सांजवात, शुभंकरोती, रामरक्षा
देवघरातला दिवा लावणं
रात्रीचा स्वयंपाक, ओटा सारवणं...
सगळं रोज तेच तेच

मी
सकाळी उठते
दूध फ्रिजमधून बाहेर काढते
सोबत लॅपटॉप स्टार्ट करते
गॅसवर दुध, चहा ठेवून
इमेल, नवीन मेसेज चेक करते
चहा पिता पिता
त्यांना उत्तरं देते
ब्रेकफास्ट, स्वयंपाक
मुलांची दप्तरं, डबे
त्यांची अर्धवट प्रोजेक्ट्स, रडारड
बस रिक्षाची वेळ
सगळं मार्गी लावून मग
आंघोळ पांघोळ आवरणं
डबा, पर्स घेऊन
स्कूटरला किक मारून
ऑफिस गाठणं
दिवसभरचं ऑफिस ऑफिस
मग प्रचंड दमवणारा ट्रॅफिक
मुलांचा अभ्यास
सटरफटर खाणं
धाकदपटशाचं शुभंकरोती
शक्तिपात झाल्यासारखं मग
वनटाईम मिल किंवा मग स्विगी
टिव्ही, फेसबुक, इन्स्टा
चकचकीत स्टोऱ्या पहात जेवण
जरा व्हॉटसअपवर चटरपटर
मुलांच्या कुरबुरी, अभ्यास
नवऱ्याचा रोमान्स अन
आपला निरुत्साह
उद्याची तयारी अन
एक दिवस पार पडला
म्हणून केलेलं हुश्य...
सगळं रोज तेच तेच

तर ही बाईची कथा
पुरुषाचीही अशीच
जरा तपशील इकडे तिकडे...

गोष्ट जन्म जन्मांतरीची
कि झेरॉक्सची
पण तुमची, आमची सर्वांची!
---

Wednesday, July 20, 2022

पिसारा

 


पिसारे असेच असतात न?

डौलदार, वळणदार, झोकदार

म्हटलं तर अलवार, हलके, तरल

एखादा वाऱ्याचा झोत

अन कसं सगळं 

सुरेख होऊन जातं.

अन मग त्यावर 

आपली एक पुसटशीच

पण ठाशीव स्वाक्षरी!


आयुष्य असच असतं नै?

---

Wednesday, July 6, 2022

आरस्पानी तळं

गोठलेलं तळं एक

आरस्मानी, हलकं निळं

तळ दिसेल इतकं स्वच्छ


पण जरा वाकून शोधाल

तळाशी काय बरं

तर अडकलात तुम्ही


ज्या क्षणी वाकाल

तुमचच प्रतिबंब येईल मधे

गढुळेल, आरस्पानी तळ


बर्फा खालचा खोल तळ

त्यावर आजचं प्रतिबिंब

सगळी सरमिसळ गुंतागुंत


खरा तळ शोधायचा तर

व्हायला हवं तुम्हीही

आरपार आरस्पानी!

---

Wednesday, June 29, 2022

कठोर वास्तव

नजरेच्या टप्यातलं सगळं क्षितीज
हळूहळू भरत जातं नभांनी
आधी पांढरे मग निळे, सावळे, काळे...
अन आपण गाडीत बसून जाताना
झाडांना कसं वाटत असेल
अगदी तसं जाणवून देत
हलके हलते डावीकडे सरकत जातात
आपलं छप्पर मात्र तसच कोरडं ठक्क
सृजनाच्या सगळ्या शक्यता समोर असून
आपली झोळी रिकामी ती रिकामीच....

Tuesday, June 21, 2022

वणवा



आज समोरचा डोंगर म्हणाला, 

"पोरी, काल पेटलेला वणवा.

कितीही वाचवावं म्हटलं तरी

उन्हानी रापलेले सारे तण

भराभर पेटत गेले,

त्यांची मुळं नव्हतीच खोलवर

वर वर वाढलेलं तण नुसतं.

मोठी झाडं मात्र तगली

खोलवरच्या मुळांनी पेलून धरली

झळांनी खोडं, पानं होरपळलीच

पण आतला ओलावा पुरून उरला

वणव्यातूनही जिवंत रहायला

उपयोगी पडला तो ओलावा!"


नात्यांचही असच असतं नं?

काही वरवरची, बेगडी नाती

अडचणींच्या वणव्यात

उभी पेटतात अन 

राख होऊन जातात

पण खरी नाती,

मनाच्या पोटातून 

ओलावा धरून असणारी

जगतात, तरतात, 

अजून घट्ट होतात

वणवा, आपलं-परकं

असं टळटळीतपणे 

शिकवून गेला...

---

Monday, June 20, 2022

जलद







 

कोण कुठले आप्त

भरभरून यायला लागलेत

आधी एखादाच तुरळक

पण मग एकाचा शेव पकडून 

दुसरा, तिसरा, भरगच्च गर्दी

कधी फेर धरत कधी झुंडीत

कधी भरगच्च कधी चुटपुट

कधी सुसाट कधी झुंबड


कुठल्या कुठल्या नदीचं

कुठल्या समुद्राचं

अन कुठल्या डोळ्यांतलं

जलद घेऊन चाललेत...

अडवणाऱ्या प्रत्येक डोंगराला

त्याचं त्याचं माप घालत

जलद चाललेत, मोठ्या प्रवासाला

वर्षभर साठवलेलं काय बाय

आळुमाळु उराशी लावत

भरत भरत राहिले

अन आता निघाले जलद

ज्याचं त्याचं देणं देत


एकदा सगळं भरभरून दिलं

मोकळा केला सगळा पसारा

सगळा उरक, सगळी देणीघेणी

की मग कसं मोकळंमोकळं

निरभ्र होऊन पुन्हा नवं जोडत

जगता येईल निळंनव्हाळं


आठवणींचही असच आहे न?

एकदा सगळा निचरा 

व्हायला हवाच अधूनमधून

मग नवीन आठवणींना 

भिडता येतं निळंनव्हाळं बनून

---



Monday, June 6, 2022

मुक्त???

टप टप टप टप

गळतच होते तिचे डोळे


केलेल्या कितीतरी तडजोडींची
हातभर जाळी तयार झालेली

अन नकोशी प्रत्येक गोष्ट
कपाळावर आठ्यांनी भरून गेलेली

दाबलेला प्रत्येक हुंदका
ओठांवरच्या दंत खुणांनी भरलेला

तिला आता खरच, खरच
सगळं नको नको झालेलं

अन मग घेतला मोठा श्वास
अन घेऊन टाकला एक निर्णय

आता ना ती कोणाची, कोणाचीच
आता फक्त तिची ती, मुक्त...

खरच असतात का अशा कोणी मुक्त
की कवितेतची एक वर्दळ नुसती...
---

Tuesday, May 31, 2022

टुमदार गाव

माणसाचं आयुष्य म्हणजे

एक वसलेलं टुमदार गाव!


बालपणी डुबकी मारायला

पायथ्याशी असणारा शांत किनारा

ये, पुढे ये म्हणत 

वाकुल्या दाखवणारी छोटी बोट

किनाऱ्यावरच्या छत्राखाली

मनसोक्त हुंदडणं.

अन तारुण्याच्या उभारीतलं

ते नावेतून स्वत:ला

झोकून देणं, 

स्वत:च्याच परिसीमा जोखणं.

मग कधी तरी किनाऱ्याशीच जरा दूर

आपली बोट नांगरणं

तिथून आपली उंची, आपलं प्रतिबिंब

सिद्ध करत रहाणं.

अन मग कधीतरी

उंचावरच्या पर्वतावर

बसून केलेली साधना,

मन:शांतीसाठी केलेले ध्यान.


या सगळ्यात आकाशीचा 

पांढरा शुभ्र, दिशा दर्शक

अभ्र बघायचा राहिलाच की...

अन राहिली सागरी 

दूर वर टाकायची नजर.


पण असो,

आभाळीचे निळे अन

समुद्राचे निळे

दोन्ही पोहोचलेच की थोडे थोडे.

अन हाती आलेले सगळं

टुमदार सजलं, सजवलं.

अजून काय पाहिजे?

शिवाय पर्वतराशीवरून का होईना,

शुभ्र अभ्र अन त्याचं तेज 

पोहोचलं थोडं थोडं.

म्हणतात ना, माणसाचं आयुष्य;

एक टुमदार गाव, वसलेलं! 

---

Saturday, May 28, 2022

सोनसळी

 


जशी निळ्याच्या ओठी 

साजिरी बासुरी

तशी जलाशयी सोनेरी 

उभी मध्यात मुरली


घन:श्यामाच्या बासुरीचे 

सूर आसमंती

सोनसळी मुरलीची 

आभा आसमंती


सुखदु:खाच्या भाऱ्यात 

शांत करी शाम

निसर्गाच्या कुशीतून देई 

आशेचा संदेश!

---

Tuesday, May 17, 2022

अळवावरचा थेंब

अळवावरच्या थेंबा सारखे, जमेल का मज जगणे?

कशातच मिळून न जाणे, असेल का ते जगणे?


भाव भावना, गुंत्यात त्या साऱ्या, हरवून जाणे

की साऱ्यातून निर्लेप राहणे, हे असेल जगणे?


पुस्तकांतील अनुभव, ज्ञान, विचार वाचित जाणे

की ध्यान धारणा, अध्यात्म साधणे, हे असेल जगणे?


समाजातील प्रत्येकाशी स्व:चे, नाते जोडत जाणे

की तुटूनी त्यागुनी, ध्यास तयाचा, हे असेल जगणे?


प्रत्येकाचा मार्ग असा, भिन्न विभिन्न असे

या सगळ्यांचे, सगळ्यातून जगणे, हेच असेल जगणे?

---