Sunday, March 15, 2026

बकुळीच्या झाडा


बकुळीच्या झाडा
बकुळीच्या झाडा
ठरलय ना आपलं?
वाढायचं,
आपलं आपणच!
नको कोणाचा आधार,
आपल्याला आपणच
घालू आकाशाला गवसणी
अन उधळू सुगंध
या साऱ्या अंगणी

वाढ तुला हवं तसं
पसरू दे परिघ.
वाकू दे फांदी
झुकू दे अवकाश.
तुझा - तुला
तोल सांभाळणं 
जमतय तुला,
तोवर नकोच बघूस
कोणाच्या ही नजरा

हिरव्या गार पानांनी 
घे तुलाच वेढुन.
हवं तर उमलव
नाजुकशा कळ्या,
खूप खूप सगळ्या
अन दे उधळून साऱ्या
हलके हलके तरंगत
येऊ दे खाली
एक एक फुल
अन त्यातल्या
सुकूनही दरवळणाऱ्या
धुंद गंधासारखे
असेच असू दे
तुझं आसुसलेपण!

नाही उमलवलेस
रोज एक फुल
चालेल तरीही.
पण उमलवशील 
तेव्हा अशी उमलव;
असतील नसतील
ती सगळी फुलं, 
की आसमंत सारा 
येेईल तुला शोधत

मग,
ना तुझी 
उंची मोजली जाईल,
ना पाहतील आकार
ना पाहतील पानं
ना फांद्या
ना तुझा पसारा.
वा फुलाचा रंग.

बसं इवलुशा
बकुळ फुलावर
होईल बघ फिदा
सारी दुनिया!
---

No comments:

Post a Comment