Tuesday, June 24, 1986

सूरावट

रोजचा तो पावसाळा
रोजची तीच ती उन्हे
पण कसे कोण जाणे
आजचे हे किरण नवे.

कोंब हा नेहमीचचा अन
पानगळही ही नेहमीचची
पण कशी कोण जाणे
ही नव्हाळी मात्र नवी.

ओळखीचा तोच तू अन
मी ही तीच ती जुनी
पण कशी कोण जाणे
आज ही जाणीव नवी.

रोजचे ते शब्द हेच अन
तीच ती गाणी जुनी
पण कशी कोण जाणे
ही सूरावट वेगळी

Thursday, May 1, 1986

प्रिय सर

[ सरांनी नेहमीच आमच्या शंका अतिशय मायेने सोडवल्या अन त्यामुळे आम्ही सर्वच जण जरा सोकावलोच होतो, त्यांच्याकडे शंका घेऊन जायला :) ]

अशीच एकदा बसले होते
वादळ घेऊन विचारांचे
एक झुळूक हळूच आली
हलकेच लाटांना थोपटून गेली.

वळून पाहिले , ती एक म्हातारी
सावरीच्या कापसाची...
तेव्हापासून चटक लागली
विचारांचे वादळ घेऊन
तिचा माग रोज घेते
तिच्याच झाडाला डोकं टेकून
वादळ हलकेच शांत करून
तिच्या गावी निघून जाते
माझ्या गावचीच
नसल्यासारखी .....

आजही मी शोधते आहे
त्याच त्या म्हातारीला
वादळातून
वाट काढत.......... !

Wednesday, April 16, 1986

जाण

ती एक नवीनच जाण
नवीनच पहचान
पण पुरते ओळखण्याआधीच
फव- ओझरती चुंबून ,
लहरत पुढे गेली....
हो, अगदी, अगदी तशीच...
सायलीच्या हळूवार गंधासारखी....

Saturday, December 14, 1985

खेळ अनोळखी

ते स्वप्न म्हणू की
सत्यची घडले सारे ?
तीज कविता म्हणू की
होते त्याचे भाव खरे ?

किणकिणल्या सार्‍या
त्या होत्या का तारा ?
की हृदयची माझे
झंकारियले होते ?

हळुहळुच येउनी
शीळ घालूनी गेला तो वारा
कि निश्वासच त्याचा
मज कुरवाळुनि गेला ?

क्षण कुणी असा हा
गंधीत करुनि गेला ?
हा धुंद मारवा
कि या पाऊसधारा ?

कि तोच तो हा
मज आजवरी जो
खेळ अनोळखी
प्रितीचा हा सारा ?

Saturday, April 6, 1985

विंदांची क्षमा मागून !

देणार्‍याने देत जावे,
घेणार्‍याने घेत जावे.
देणारा देतच राहतो,
देणार्‍याचे "हात" सोडून,
घेणारा घेतच राहतो .
देणार्‍याच्या देण्याला
अनंतात सीमा नाही.
घेणार्‍याच्या "हात" घेण्याला
अनंतात स्थान नाही.
देणारा देतच राहतो,
शब्द देतो, अर्थ देतो,
धीर देतो, हात देतो.
बाकी सर्व घेऊन ;
घेणारा, "हातां"चे डोंगर रचतो.
मग कधीतरी
घेणार्‍या हातांकडे,
देणार्‍याच्या "हातां"च्या डोंगराकडे
बघत राहतो, समजू पाहतो, कळू पाहतो, ....
पण,
कळूनही वळत नाही,
वळला तरी,
डोंगराकडे जात नाही,
गेला तरी,
डोंगर काही उपसत नाही.
आणि उपसला तरी,
" बुंदसे गयी,
वो हौद से
आती नहीं । "

Wednesday, August 3, 1983

जीवन

जीवन, जीवन, म्हणून जे बोललं जातं
ते आम्ही पाहिलच नव्हतं,
प्रत्येक गोष्टीत आनंद मानत
जगत जाणंच स्विकारलं होतं.

परीक्षा पास होत होत,
पुढं जात होतो, परीक्षार्थी बनून
खरं ज्ञान निसटून गेलं होतं
आम्हाला हलूव बनवून !

प्रेम प्रेम म्हणतात, ते अनुभवण्यासाठी
गेलो प्रियेच्या शोधात...
प्रियातर भेटली नाहीच...
आम्हीमात्र अप्रिय झालो मित्रांत.

पण नाही, अजून जिद्द संपली नाही;
जीवन जगण्याची वा प्रियेच्या शोधाची,
मित्रा, अरे धुंडाळण्यातच मजा आहे
अन तो वरच मजा आहे जिण्याची !

Monday, October 15, 1979

समांतर रेषा

धैर्य लागतं एखाद्यावरून 
जीव ओवाळून टाकायलाही 
तुझ्या-माझ्याजवळ ते नसेलच 
असं मी म्हणत नाही;
पण मी तुझ्यासाठी, तू माझ्यासाठी
आता ते करणार नाही.
दोघांच्या वाटा आता भिन्न आहेत....
पण कधीकाळी तरी 
त्या मिळाल्या होत्या का ?
सुरुवातीपासून शेवटपर्यंत 
आपण समांतरच होतो,
कधीकाळी छेदण्याचा 
विचारही केला नव्हता...
मग ही लागलेली हूरहूर 
कोणासाठीकशासाठी ?
आपल्या दोघांमध्ये 
भरून राहिलेल्या पोकळीसाठी ?
की या कळलेल्या 
समांतर रेषांसाठीच ?

Friday, May 18, 1979

आधुनिक फ्लॅटच्या जमिनी

चौकोनावर चौकोन, अगणित चौकोन
एकात एक मिसळलेल्या भावनांची भेसळ.
कमी झाले म्हणून की काय
एक गुंतवळ तिथेच पडलीय
बंडाळ्या रोखून धरण्यासाठी
प्रत्येक केस आसुसला आहे.
एक चौकोन सुटका करू पाहतो;
जवळचाच केस दक्षतेने पाय घालतो !

(चौकोन म्हणजे व्यव-तीच्या भावभावना. अन मानवी समाजाचे प्रतिनिधित्व करतेय एक गुंतवळ .)