Monday, May 31, 2010

" प्रिय मामा.....

जवळच्या व्यक्तीने संबंध अचानक तोडून टाकले की त्याची एखादी कृती ही किती दुखावणारी असते नाही ? एका मामाने असाच एक जुनी वस्तू परत केली; तेव्हा भळभळलेली ही जखम..... झाली जवळ जवळ दहा वर्षे. तेव्हा झालेली ही कविता. तशी खुप व्यक्तिगत. पण जितकी व्यक्तिगत तितकी सार्वत्रिक असं वाटलं, म्हणून आता दहा वर्षांनंतर पोस्टतेय.
( इजाजतमधल्या गझलेस धन्यवाद देऊन )


आईचे अजून काही सामान राहिलय तुझ्यापाशी....
ते परत करशील मामा ?
तिची एक छोटीशी नात आहे, तुझ्यापाशी.....
जिच्या बारश्याला, तिच्या आई-आजीला;
जेवता यावं म्हणून, सत्तरीची माझी आई;
पायाला रग लागली तरी, मांडीत घेऊन बसलेली.
जिच्या बारश्याला, डोळे खोबण्या झाल्या तरी;
दुपट्यावर घड्याळाचे आकडे अन
तिच्या नावाची A,B,C,D जुळवत बसली होती
अशी तिची एक नात आहे तुझ्याजवळ
ती परत करशील मामा ....?
तिची एक सून आहे, मामा तुझ्यापाशी....
जिच्या प्रत्येक सणाला, तिनं आत्या हवी असं म्हटलं,
जिनं आपल्या प्रेग्नन्सीत , प्रत्येक अडचण विचारली,
काय खाऊ, किती खाऊ विचारलं,
जिनं आपल्या बाळाला कसं वाढवू विचारलं,
अशी तिची एक सून आहे, तुझ्याजवळ,
ती परत करशील, मामा....?
तिचा एक जावई आहे, तुझ्याकडे...
ज्याच्याशी तिची ओळखही नाही,
त्याचा फोटोही नाही तिच्याकडे,
ज्याच्या प्रतिक्षेची तिने खुप वाट पाहिली होती...
तो जावई आहे , तुझ्याकडे,
तो परत करशील मामा...
तिचा एक भाचा आहे, मामा तुझ्यापाशी...
जो लहानपणी आत्या, आत्या करत
फिरायचा तिच्या मागे मागे,
त्याच्या आईच्या आजारपणात,
तिच्याकडून जेवायचा...
त्याच्या वडिलांच्या अनुपस्थितीत...
वडिलांच्या लहानपणच्या गोष्टी ऐकायचा तिच्याकडून,
अन मोठेपणी आपल्या लग्नातल्या
अनेक मतभेदांमध्ये मानायचा सल्ला तिचा,
असा एक भाचा आहे तिचा, तुझ्यापाशी
तो परत करशील मामा....
तिची एक भाची आहे मामा, तुझ्यापाशी....
तिची जणू काही ती पहिली नातच,
अन तिच्यात काही अंशी पाहिली,
तुम्ही सर्वांनीच तुमची फार कमी
पाहिलेली, अनुभवलेली तुमची आई.
जिच्या कोडकौतुकासाठी, माझी आई;
अनेक शनिवार-रविवार, आपला संसार उरकून;
धडपडत करायची पुणे-मुलुंड वारी.
अन मोठेपणी जी स्वतः म्हणायची,
"आत्याचं घर कितीही लांब असू दे,
मी जाईनच तिच्या घरी..."
अशी तिची भाची ....
जी तिच्या सगळ्या गुजगोष्टी
सांगण्यासाठी धडपडत यायची,
अन एका आन्सरिंगमशीनमुळे,
सगळे धागे तोडून टाकणारी,
अशी एक भाची आहे, तुझ्याकडे
ती परत करशील, मामा...
तिची एक वहिनी आहे मामा, तुझ्याकडे...
सुरुवातीला काहीशी शंकेने,
मग खुपशी समजून, की फायदा म्हणून
अन नंतर खुपशी स्पर्धा म्हणून,
नाते तुटत नाही म्हणूण स्विकारणारी
जिच्या आजारपणात आपला संसार गुंडाळून,
माझी आई धावली होती, तिच्या कच्च्याबच्च्यांसाठी.
जिचा संसार टिकावा म्हणून;
तुझ्याशीही भांडली, तिची बाजू घेऊन,
अशी एक वहिनी आहे तिची, तुझ्याजवळ
ती परत करशील, मामा...
आणखीन एक सर्वात महत्वाचे सामान तिचे
राहिलेय तुझ्यापाशी मामा, ते परत करशील ?
तिची आई गेली तेव्हा बाळा-भाई म्हणत
तिने जवळ घेतले....
लहान म्हणून अनेकदा, शिस्तीच्या नानासाहेबांसमोर,
ज्यांना पाठीशी घातले, त्यातल्या...
तडकफडक तरूणपणी ज्याला पाठिंबा दिला,
तरूणपणी ज्याच्या इच्छा जाणून घेतल्या,
तेव्हा ज्याला मानसिक आधार दिला,
ज्याच्या लग्नात केवळ ताई नाही तर आई,
हा मान मिळवला, अन तशी कर्तव्येही पार पाडली,
ज्याच्या संसारातल्या वादळांना शांत केलं,
ज्याचे तारू भरकटू नये म्हणून
सगळा वाईटपणा घेतला,
अन ज्याने मानसिअक आधारही दिला,
घर बदलताना, काही महत्वाचे निर्णय घेताना,
जो सांगता मदतीला पुढे झाला,
असा एक भाऊ आहे तिचा, तुझ्याकडे...
तो परत करशील, मामा...
हे सगळं सामान परत करशील मामा ?
आणि हे सगळं नाही परत करू शकलास...
तर एक विनंती करू तुला, मामा...
वयाच्या सत्तरीला, डोळ्याच्या खाचा झाल्यावर
निदान त्यांचे वाहत असलेले अश्रू तरी
आता वाढवू नकोस, मामा...
पूर्वीची कणखर, खंबीर अशी तुझी ताई....
आता खरच झालीय एक म्हातारी आजीबाई...
तिचं काही सामान राहू दे ना, तुझ्याकडे, मामा..... "

Sunday, May 23, 2010

पावलं : साद - प्रतिसाद

माझ्या एका मैत्रिणीची ही एक कविता .

पावलं
-सरोजिनी
सप्तपदी चालतांना
योजले होते मी मनाशी
तुझ्या पावलांवर
पाऊल ठेवून चालायचे
पण.......
तुझ्या वेगवान पावलाशी
स्पर्धा करणे
मला कधीच जमले नाही
एकाच टांगेत गेलास तू
क्षितीजाच्या पार.....
गोठवलेली पावलं माझी
झालीत निराधार
दूरवर दिसतात....
आता तुझी पावले
एका अज्ञात
गुहेकडे जाणारी
जेथून परतणार्‍या
पावलांचे ठसे
अजून कुणीच पाहिले नाहीत.

यावर माझी प्रतिक्रिया -
" पावलांना त्या नाही तुझी याद
मग का करून घ्यावास तुच फक्त त्रास ?
शोध तुझी, अगदी तुझीच वाट
ते सोपे नाही नाहीच;
अगदी मान्य, पण
हे सोसणे तरी
कुठे आहे सोपं ?
कर आता सुरूवात,
पुन्हा चालायला लाग.
तुझ्या पावलांच्या ठशांचाच
घेईल कोणीतरी माग .
मग होईल सोपी वाट
आणि होईल तीच खरी साथ !
किंवा असेही होईल
तुझ्या नव्या उमेदीकडे
अगदी त्याचेच जाईल लक्ष.
चकीत होऊन मागे फिरून
वळून बघेल तोच.
मग मात्र एकच कर
तुझ्या पावलांचेही महत्व
सतत ठेव जागते;
त्याच्या मनात,
अन हो,
त्याहूनही तुझ्या मनात ! "

Wednesday, March 17, 2010

अद्वैत


यमुना तीरी राधा कधीची
वाट पाही श्रीरंगाची
मिटलेल्या दोन लोचनी
मूर्ती चित्तचोरट्याची

कोण जाणे कसे जाहले
एक अवचित घडून गेले
मोरपीस तव डोईवरले
पुर्‍या शरीरी तिच्या फिरले

माधवाचे रुप गोजिरे
तिच्या मुखी रेखियले
नाग लाघवी वेणूचे
तिच्या वेणीत उतरले

सारे गारूड विश्वाचे
तिच्या चोळीत झळके
चैतन्य परम-आत्म्याचे
तिच्या पदरी सामावले

सावळ्याची निळाई
उतरली तिच्या देही
काया मोहरूनी तिची
झाली अंतर्बाह्य हरीची

आला आला श्रीरंग
हरपूनी होई स्तब्ध
पाहूनी राधेतलं
स्वतःचेच प्रतिबिंब

राधा, राधा न राहिली
राधा कृष्ण कृष्ण झाली
अचंबित होई हरी ही
द्वैतातले अद्वैत पाहुनि


२५.०१.२०१०

Friday, February 26, 2010

कृष्णा , थांबव तुझा पावा




कृष्णा , थांबव तुझा पावा
घरचे सारे काम, अन सासूचा पहारा
संध्याकाळची वेळ, अन सा-यांच्याच नजरा
कृष्णा , थांबव ना पावा !
कृष्णा , थांबव तुझा पावा
कालिंदीचा तट, तिथे गोपांचा मेळावा
कदंबाची सावली, जिथे सगळ्यांना विसावा
कृष्णा , थांबव ना पावा !
कृष्णा , थांबव तुझा पावा
मनीची मझ्या घालमेल, त्यात तुझा पुकारा
होते कालवाकालव, मन पिसाटवारा
कृष्णा , थांबव ना पावा !
कृष्णा , थांबव तुझा पावा
गोळा झाले सारे, गोकुळ भोवती तुझ्या
राहिले नाही भान, जनाजनास सा-या
आता हरकत नाही, सख्या वाजव तुझा पावा
कृष्णा , वाजव ना पावा !

Wednesday, February 24, 2010

कृष्णा....


काम तसे नेहमीचे
मन राधेचे गुंतलेले
अन अचानक ,
कानात बरसू लागले
आर्त सूर बासरीचे.

थंडीचे छोटे छोटे दिवस,
त्यातली धुक्याने गारठलेली सायंकाळ.
गावातले चिडिचुप्प झालेले रस्ते
गप्प उभ्याने रा़खण करणारी झाडे.
अंधुकलेल्या पायवाटा
यमुनेचा नीरव किनारा.
तिचे संथ हलणारे
निळे सावळे पाणी
त्यात तटावरच्या झाडांची
संथ हलणारी सावली.
चुबकन वर येणारी
एखादीच मासोळी.
अलवार चांदण्याची अष्ट्मी
पायाखाली रूतणारी शुभ्र रेती.

आर्त सूर आता
अधिकच तीव्र झालेत,
पण श्रीहरी तर
दिसत नाही.

"कुठे शोधू तुला माधवा?
हा तुझा लाडका कदंब...
पण तिथेही नाहीस तू.
अन हे काय ?
त्याच्या पावलात
हा बाण कसा रुतून बसलाय ?
अन त्यातून पाझरणारे
हे शुभ्र दूध ...?
ही जिवाची अशी घालमेल
श्रीरंगा संपव ही वेदना.
नको, नको, थांब जाउ नको
मलाही घे ना रे, ने ना रे
..........................."

अन मग एक स्तब्ध शांतता
................................... !

दुस-या दिवशीचा सूर्य उगवला
पण
आसमंतातला सूर हरवून गेलेला.
अन यमुना अश्रू ढाळत उभी ;
सोबत राधेचे कलेवर
अन
त्या तिकडे लां ऽऽऽऽ ब रानात
श्रीकृष्णाचे........ !

२१.०१.२०१०

Monday, June 22, 2009

विझू नको

थांब थांब विझू नको
नकोस फडफडू

मान्य आहे
अंधारलय
ज्योतीने ज्योत
पेटवावीच लागेल

जगात वाहणारा
जोराचा वारा
त्यातून तुझ्या हातात
नवी ज्योत

अरे लोकांना
लागेल थोडा वेळ
तुझ्या ज्योतीचे
ओळखायला तेज

पण एक नक्की
येतील एक एक
आपणहून
तोपर्यंत थांब

विझू नकोस
नकोस फडफडू


Monday, February 2, 2009

आशा


अष्टमीचा चंद्र शांत
ढळला बघ पश्चिमेस
मंद मंद थंड वात
शीरशीरी तनमनात

लाल केशराचे घट
फुटती नील अंबरात
पक्षांचे थवे नभी
मग्न गोड कुजनात

सरली बघ काजळरात
उदयास येई प्रभात
उजळला आसमंत
नव आशा पल्लवीत

Friday, December 5, 2008

अगणित अश्वत्थामे !

Thursday, May 6, 2010
{अश्वत्माथा एक चिरंजिवी ! मृत्यूचे त्याला भय नव्हते. मात्र महाभारतातील एका भयंकर चुकीमुळे, त्याच्या कपाळावरचा जन्मजात दिव्य मणी उपसून काढला गेला. अन तिथे राहिली एक न सुकणारी जखम ! ही डोक्यावरची भळभळणारी जखम घेऊन हा चिरंजिवी अजूनही फिरतो आहे.

आपला समाज एक सनातन समाज - ज्याला आदि नाही, ज्याला अंत नाही ! एका अर्थाने चिरंजिवी ! आपल्याही कपाळावर एक दिव्य मणी आहे, संयमाचा !

गेल्या काही दिवसात, काही घटनांनी हा संयमाचा दिव्य मणी असाच उपसून काढण्याचा प्रयत्न केला गेला. एक भळभळणारी जखम घेऊन आपण फिरतो आहोत. आपल्यातले हे दिव्यत्व पुन्हा प्राप्त करूयात. सर्व शहिद व्यक्तींची आठवण सतत जागती ठेऊयात आणि त्यांना आदरंजली वाहूयात. अन हा संयम पुन्हा मिळवून पुन्हा ताठ उभे राहूयात, अधिक संघटित होउन, अधिक ताकदवान होऊन !}


"अरे निचे बैठ, निचे बैठ...."
असे तो म्हणाला,
अन प्रतिक्षिप्त क्रियेने
मी खाली बसलो.
अन डोक्यावरून एक गोळी
सणसणत मागे गेली.

वळून पाहिले
मला सांगणाराच
त्या गोळीचा
बळी ठरला होता !

खरं तर संध्याकाळी
दिवसभराचा ताप ताण
हलका करण्यासाठी
रोजच जातो मी
गेट वे आँफ इंडियावर !

आज मात्र
आख्ख्या इंडियाचा ताण घेऊन
वणवण फिरतोय मी
या गेट वरून त्या गेट वर !

त्या अनामिकाचा,
गोळीने छिन्न विछिन्न झालेल्या चेह-याचा
फक्त एक फोटो आहे हातात
अन त्याच्या हातातला डबा,
अन त्याच्या पाकिटातले काही पैसे,
अन हो
त्याचे फुटके नशिब !
ज्याच्या मुळे मी आज फिरतोय
जिवंत !

वणवण फिरतोय त्याचे
नाव- पत्ता शोधण्यासाठी
अन
त्याच्या जिवलगांना
आधार देण्यासाठी.
त्याच्या शेवटच्या दर्शनाने
खचतील ते.

पण किमान
पुढच्या आयुष्याची
त्रोटक शिदोरी
एखाद वेळेस मिळेल
एखाद्या राजकारण्याकडून !

किंवा होईल त्या फोटोची फ्रेम !
घरातल्यांना देईल
आयुष्यभराचे दु:ख - वेदना !
किंवा
एखाद्या भावी, चांगल्या नेत्याला
देईल तोच फोटो
एक प्रेरणा !

लाखोंचा बिना नेत्यांचा समूह !
त्यातला मीही एक
मिणमिणता प्रकाश.
शोधत फिरतोय त्या किरणाला.
नेता नाही तर नाही,
किमान
माझ्यासारख्या
जन्मभराची जखम घेऊन
फिरण्या-या इतर अश्वथाम्यांची
ओळ्ख तरी होतेय,

दूध नाही, तक नाही,
अन पीठ्-पाण्याचे दूधही नाही,
फक्त डोळ्यातल्या पाण्याने
तहान भागवण्याचा प्रयत्न करतोय.
प्रयत्न करतोय
त्याची मुलं, माणसं,
आई , बायको आणि
कितीतरी....
त्यांचा शोध घेण्याचा.

एका हातात
माथ्यावरची भळभळणारी जखम घेऊन
अन दुस-या हातात
त्याचा फोटो.......!
माझ्या सारखेच
कितीतरी,
अगणित अश्वत्थामे !

५.१२.२००८




Monday, September 22, 2008

पद्मजा

इतर फुलांचं तसं बरं असतं
आधाराचं खोड तरी भक्कम असतं;
अगदी वेलीलाही भिंतीचा, किमान
दुसर्‍या झाडाचातरी आधार असतो.

कमळाला मात्र
"भक्कम आधार नाही-"
हे कळायचाही वाव नसतो.
गढुळ पाण्याआड
सगळं काही झाकलेलं असतं.

त्यातल्या त्यात एक बरं असतं,
त्याची पानं, वेगळा रंग, आकार
घेऊन का होईना
पसरलेली असतात-आसपास
तेव्हढाच दृष्य आधार... !

फुलं म्हटली की डोळ्यांचे सुख !
नाजूक, गोलाकार वळणं,
हिरवा ताटवा,
स्वच्छ, सुंदर फवारा,
रंगीत फुलपाखरं,
चिमुकले पक्षी,...
सगळं कसं
आखीव-रेखीव, गोंडस, सुगंधी....

पण कमळाचं काय ?
खाली चिखल, नाहीतर गढूळ पाणी.
त्याखाली झाकलेला मऊ, नाजूक देठ.
मोठी मोठी जाड पानं .
ती ही पाण्याचा एखादाच
न मिसळणारा थेंब जपणारी.
पाकळ्यांचा टोकेरी देखावा.
ना गंध कोवळा.
बरं वर घोंगावणार तोही भुंगा.
काळा, जाड अन बेढब....!

पण,
हिच प्रतिकुल परिस्थिती घडवते त्याला.
जास्त कणखर, जास्त ठसठशीत्, जास्त मोठी
अन टिकावूही.
इतर फुलांपेक्षा असलेलं वेगळेपण;
प्रतिकुल परिस्थितीचा कॅनव्हास;
त्याच्याशी झगडून वर येण्याचा त्याचा स्वभाव;
त्यातून फुलण्याचे त्याचे कसब;
या सर्वांतूनच तर स्विकारलं जातय त्याचे
"राजपद" !

Tuesday, July 1, 2008

रग्गड ...

हाती बदामाचा दाणा
रगड, रगड, रगड
हाती बुद्धीजन्य तेल

हाती भुईचा शेंगदाणा
रगड, रगड, रगड
हाती जिव्हेचे सुख

हाती छोटासाच तीळ
रगड, रगड, रगड
मिळे थंडीतही सुख

हाती वाळूचाच कण
प्रयत्ने वाळूचे रगडता
तेलही गळे

हाती नाही काही
रगड हातावर हात
कर्तुत्वाचे नवनीत
तेच मला रग्गड !