Wednesday, August 2, 2017

पाऊस...


पाऊस...
दूर नको, नको राहूस

पाऊस,
तुझ्यामाझ्या स्वप्नांचा
चल भिजु जरा
खळाळता झरा
तुझ्यामाझ्या प्रेमाचा
खोली नको पाहूस
दूर नको, नको राहूस
पाऊस...

पाऊस,
सोनसळी ऊन
ओसंडे डोळ्यांतून
झंकारली धून
स्पर्शा स्पर्शातून
आता नको उसासू
दूर नको, नको राहूस
पाऊस...

पाऊस,
चल देऊ झोकून
माझेतुझे मीपण
चिंब भिजून भिजून
होऊ एकच मिळून
दूर नको, नको राहूस
पाऊस..


Wednesday, June 28, 2017

गाज

आय थिंक,देअर फोर आय अॅम
हे,देकार्ट कधीच गेला सांगून
पण हे मला कळल्यापासून
हे अस्तित्व माझं मलाच
मिरवावं, मिरवावं वाटू लागलं
कधी संथ,शांत,निवांत वरून
कधी प्रचंड खळबळ आतून
कधी वादळापूर्वीचं गडदभरून
कधी उचंबळणारं खदखदून
अन मग वादळं, अनेक एकामागून
कधी लोकांचं एकणारं मन
कधी तावातावाने केलेलं भांडण
कधी रुढीतले उपटलेलं तण
कधी स्वत:शीच केलेलं रण
अन कधी अगदी, अगदी नवं सृजन
उमटेल, न उमटेल, पण असेल
जाणवेल, न जाणवेल पण असेल
एक नक्की, नक्की राहिल निनादत
मनाच्या खोल खोल गाभाऱ्यात
विचारांची एक संतत, अविरत गाज!

Monday, June 19, 2017

निरमोहीतू तो निरमोही, हे मुरारी
फिरसे न देखा एक बार भी
तू तो निरमोही, हे मुरारी

रंग तो सारे डारे तुने
भिगी चुनरि, मै रंगी सारी
तू तो निरमोही, हे मुरारी

एक बार रख ली मुरली
फिर ना रे तुने उठाई
तू तो निरमोही, हे मुरारी

कैसे सहुँ दु:ख ये सारे
कैसे रहु तुमबिन अकेली
तू तो निरमोही, हे मुरारी

चल पडे परदेस तुम तो
अब तो मै रहु तरसती
तू तो निरमोही, हे मुरारी


Thursday, March 16, 2017

प्रिया तुज वाचून दिनरात सुनी ही

प्रिया तुज वाचून  दिनरात  सुनी ही
सजणा तुज वाचुनि, संतत धार नयनी

येशील कधी तू अचानक दारी
हीच निरंतन आस मनाशी
प्रिया तुज वाचुनि दिन रात सुनी ही

नको मला तो साज शरिरी
नको नको तो गंध सुवासी
प्रिया तुज वाचुनि दिन रात सुनी ही

तलम वसने मला जाळती
गरम हवा ही वाळ्यांमधूनी
प्रिया तुज वाचुनि दिन रात सुनी ही 

Tuesday, January 24, 2017

सागरओढ ( अनुवाद)

Sea Fever : BY JOHN MASEFIELD या कवितेचा स्वैर अनुवाद

सागरओढ

आज गेलंच पाहिजे, खोल खोल एकांत समुद्रात आभाळासोबत,
संगतीला हवीय उंच शिडाची होडी अन तिलाच न्याहाळणारा एक तारा;
सुकाणूचा ताबा अन वाऱ्याच्या शिळेवर फडफडणारे शुभ्र पांढरे शीड,
सागरावरच्या गुढ गडद धुक्याला कापत जाणारा संधीप्रकाश.

मला पुन्हा जायलाच हवं, समुद्रात खोल खोल, बोलावतेय प्रत्येक लाट
वाऱ्याचा तो पुकारा, अगदी आतून आलेला पुकारा, नाहीच टाळता येणार आता;
शुभ्र नभांनी गच्च भरलेला वादळी दिवस हवाय फक्त,
फेसाळलेल्या फुटणाऱ्या लाटांचे तुषार, सीगलचा आर्त पुकारा.

मला गेलच पाहिजे समुद्रात खोल खोल, त्या वेड्या दर्यावर्दीसारखं,
उजेडाच्या तिरिपीसारख्या त्या,  गील आणि व्हेलच्या वाटेवरून;
आठवणींच्या लडीतून घुसत, हास्याच्या धबधब्यातून वाट काढत,
आणि शांत, सुमधुर स्वप्नात हरवून जायचय, ती गुढ गप संपायच्या आत.

Thursday, January 12, 2017

आणि म्हणे...कबूल करणंही कोणाला अस्वस्थ करू शकतं;
हे कधी डोक्यातच आलं नाही.
इतका सरळ, साधा माफीचा मुद्दा;
कधी अडचणीचा ठरू शकतो, कोणाला.
नको ते जोडले जाणारे संबंध
आणि त्या सोबत येणारे मानपान...

जगणं साधं सरळ सोपं का असू नये
कंगोऱ्यांची किनार अन् गालबोटाचा ठिपका
अगदी हवाच का तलम मऊ वसनाला
सळसळ सुटत जाणारं अलवार पोत
हलकेच मनाला स्पर्शून जाणारं निरागस
सगळच कसं झाकोळून झाकोळून...

एक छोटासा हो - नाहीचा गुंता
अन त्यावर डळमळणारा डोलारा
खळ्ळकन फुटून पडलेलं
निर्वाज्य भावभावनांचं जग
अशक्य,अस्वस्थ तळमळ
अन उरलेली निर्विकार पोकळी...

आणि म्हणे जग न
आनंदाने.....


Monday, October 17, 2016

तुझ्या विना...

(थँक्स टू प्राची : ) )

आसवांचा लोटला
नयनी महापूर हा
बरसुनि मेघ सारे
तरीही उमाळा उरे

अंधुकली सृष्टी सारी
हुंदका ओठांवरी
गहिवर शब्दांवरी
बोलल्या वाचूनही

अधरी थरथरत्या
गाज नावाची तुझ्या
गात्रातुनि अधिरता
अपूर्णता तुझ्याविना... तुझ्याविना

Saturday, October 15, 2016

साकार तू!

चित्र जरा काढावे म्हणोनि,
           कुंचला माझिया हाती
           अन, रंग-सारे नयनी तुझ्या

घडवावी एक सुरई म्हणोनि,
                  चक्र माझिया हाती
                  अन, शाडुसम-मऊ स्पर्श तुझा

भरावा जरा कशिदा म्हणोनी,
               सुई माझिया हाती
              अन, रेशमी-गळाभर हात तुझे

रांधावे काही गोड म्हणोनि,
         तपेली माझिया हाती
         अन, उष्ण-ओले ओठ तुझे

विणावे जरा वाटले म्हणोनि,
           लोकर माझिया हाती
            अन, उबदार-घट्ट मिठी तुझी

गाणे जरा शिकावे म्हणोनि,
             सूर माझिया कंठी
             अन, रियाज सोबतीचा तुझ्या

सूर जरा छेडावे म्हणोनि,
       सतार माझिया हाती
       अन, षड्ज त्यातून साकार तू

Monday, October 10, 2016

लख लख

वाईचा कृष्णाघाट
त्रिपुरी पौर्णिमेची रात
तू आणि मी आणि
कृष्णेच्या गाभ्यातल्या
किती साऱ्या आभा ...

मिणमिणणाऱ्या पणत्या,
आकाशातल्या तारका,
अन कृष्णे मधे उतरलेले
त्यांचे मंद मंद
प्रतिबिंब...

तुुझ्या - माझ्या डोळ्यामधे
ज्योती तेवणाऱ्या
आसमंत मनातला
कसा जादुभरा
करी लख लख!

सोबत

कॉलेजच्या कट्यापाशी मी
अन समोरून आलास तू
थबकलास...

नजरेनेच विचारलस
हे काय?
लेक्चरला नाही येणार?

मैत्रिणींसाठी थांबलेली मी
उठून कधी चालू पडले
कळले नाही मलाही

आता नुसत्या तुझ्या
नजरेची सोबतही
पुरते मला!