Saturday, January 8, 2022

नाणेघाट धबधबा

खळाळ डोंगरावरुनी वाहे

खोल खाली छलांग घेते

मस्तीतच मग होऊनि हलके 

उन्मेषाचे शुभ्र पटल उभे


जगण्याचे हे नवे उमाळे 

झोकुनी सारे परी उडे 

खोल दरीची भिती नसे

आकाशा जोडशी तू नाते


प्रवाह दूर किती पसरला

प्रपात  सलग परि एकला

दुधाट धुक्याचा गडद पडदा

वाऱ्यावर वाही उंच फवारा


सोडता कड्याचा साथ जरासा

उंचावूनि पुन्हा भिडशी परतसा

पाश हळुच सोडता त्याचा 

देशी दुलई डोई त्याच्या

-

Friday, November 19, 2021

विरहगर्ता



विहरतो हा खग कुणी 

की अंतरात्मा कुणी

शोधतो उंची, अवकाश, खोली

स्वत:च्याच अंतरंगातली 


धुक्यात हरवू कुणी पहातो

स्वत:च्यात प्रतिबिंबास पहातो


अनोळखी गाव धूसर वाटा

धुळीचाच मळभ भरला कपाळा


झुगारून सगळा अंधार पडदा

चितारू पहातो इंद्रधनुचा पिसारा


शोधित फिरतो दिडदाs दिडदाss

कुणी खग की हा विरहगर्ता!

 

Monday, September 6, 2021

झळाळते दुभंगलेपण

(श्वेता चक्रदेव यांचे एक फॉरवर्ड वाचून मनात ही उमटली...)


तसे तर सगळेच आपण

दुभंगलेले

कधी दु:खाने, कधी त्रासाने

कधी जबाबदाऱ्यांमुळे

तर कधी तणावांमुळे...

आतून-बाहेरून दुभंगलेले


पण भरतो आपण या भेगा

आपल्या आपणच

कधी मैत्र, तर कधी नाते

येतात सोबत भरावयाला

खाच येतेच भरून

काळाचा महिमा अन

सखेसोबत्यांचा आधार


अन मग होतो आपणच

एक नवीनच व्यक्ती

एक नवीनच जाणीव

दुभंगलेल्या भेगांमधून

आत आत पसरत जातो

लख्ख प्रकाश, प्रगल्भतेचा

भरली जाणारी प्रत्येक भेग

मग झळाळते; होऊन सोनं

अनुभवांचं लेणं


मग झळाळतो आपण 

पुन्हा नव्या ताकदीने उभे

नवे वार पेलायला,

नवे दुभंगलेपण अन

नवी झळाळी पेलायला

आपली हीच दुर्दम्य आशा!

...

Wednesday, August 25, 2021

साथ

दूर दूर पसरलेली

वाट,मऊसर माती

एक मेक पाऊल

रमलखुणांची नाती


भरू भरू आलेल्या

आभाळाची दाट गर्दी

चिंब चिंब भिजताना

उबदार घट्ट मिठी


उधळलेल्या धुळीस,

वादळाची चाहुल

डोळ्याआड रात्रीस

ओलसर पाऊस


ओलांडण्या नदीला

हाती नव्हती नाव

वाहताना परंतु

सोबत होती साथ

Wednesday, August 4, 2021

जखरंडा

फोटे फ्रॉम  रश्मी साठे
किती हिवाळे, उन्हाळे

अन किती पावसाळे

हर एक वसंतातले

वळण वेगळे, वेगळे।

वाहत्या वाऱ्यासवे मी

फिरवली पाठ किती

तगून जगलो उरी

किती युगे, लोटली।

साज श्रुंगार, चढविला

उतरला तोही कितेकदा

नव्हाळीची नवी तऱ्हा

प्रसवे उदरी पुन्हा।

हरेक फांदी उकली

अंतरीच्या कळा किती

उतरून हरेक ठेवी  

हिरवी पाने, किती।

उभा कधीचा इथे

बदलुनी रंग रुपे

जख्ख म्हातारा म्हणे,

कुणी, जखरंडा म्हणे।

---

काळ

खिडकीत बसून

बाहेरची मजा

न्याहाळणारी ती
इटुकली गोंडस
फ्रॉकवाली परी

हलणारी झाडं
उडणारी चिमणी
आकाशात कधीतरी
उंच उडणारा
रंगबिरंगी पतंग

पडणारा पाऊस
नाचणारी उन्हे
उगवणारा सूर्य
रात्रीचा चांदोबा
कधी चांदण्याही

तिला वाटे
बाहेर जावे
मस्त फिरावे
पावसात भिजावे
गवतावर लोळावे

पण कधीच
आई बाबांनी
एकटीला नाही
जाऊ दिले
कधीच नाही

आता तर
तीच घाबरते
खिडकी बाहेरची
भितीदायक भूतं
घाबरून बसते

खिडकीच्या आतलं
सुरक्षित जग
तिला सुखावतं
गज आता
तुरुंग नसतात
--

Friday, July 23, 2021

वादळ!

वृक्ष पेलतो नभांना, जीव ओवाळुनि

बरस बरस असा, फुलु दे अंगी अंगी


गूढ सावळछाया, मनास या वेढी 

नको वास्तवाचे भान, मज स्वप्न हे भुलवी

लोका वाटे भय याचे, मज  आधार तोचि

मना डोळ्यातले आसू, लपे नभाच्या अंधारी

दु:खाचा हा आठव, जपे उराउरी

बरस बरस असा, फुलु दे अंगी अंगी


परि आस ही, सुटता सुटे नाही

मन मनास कसे, उलगडेना काही

दिवटीच्या उजेडी, तिक्षा सजणाची

डोळे स्थिरावती माझे, रस्ता नागमोडी

घोंगावुनि आला वारा, सुसाट वादळी

बरस बरस असा, फुलु दे अंगी अंगी


सावळ्याची दुलई, येई चहुओरांनी

आस मनात असे, लुकलुकत्या दिव्यापरि

येईल साजण दारी, सजेल रात्र सारी

बरस बरस असा फुलु दे अंगी अंगी

Thursday, July 15, 2021

मेघा...


इतकं सारं 

कळिकाळाचं

दु:ख घेऊन

भोरविभोर होऊन

निघालास तर खरा

पण इतकं वाहून नेणं 

होई ना न तुलाही?

मग बरसलास

नको तसा 

नको तिथे!

असं कर 

आता झालाच आहेस मोकळा

तर आरुढ हो वाऱ्यावर

बघ सगळं वाहून टाकल्यावर

कसं हलकं हलकं वाटतं

मग भराऱ्या घेत

जाशील बघ 

कुठच्या कुठे

लहरत!

Tuesday, July 13, 2021

विश्वरुपदर्शनि


मानवा शोधिशी

मजसी तू परि

चराचरात मी 

बघ फिरुनी

जरा मागुति

दृष्टी वळवुनि

मान उंचावुनि

जर पाहशी

सापडेन मी

वृक्ष वल्लरीतुनि

कृष्णहाती पावरी

वा अर्धनटेश्वरनारि

पुन्हापुन्हा दाखवी

पहा विश्वरुपदर्शनि

- अवलरुप आरती



Monday, July 12, 2021

फिदा

जुईच्या वेली,

जुईच्या वेली

ठरलय ना आपलं?

वाढायचं,

आपलं आपणच!

नको कोणाचा आधार,

नको वर वर चढणं,

नको आकाशाला गवसणी

अन नको 

न पेलणारा भारही!


वाढ तुला हवं तसं

पसरू दे परिघ.

वाकू दे फांदी

झुकू दे अवकाश.

तुझा - तुला

तोल सांभाळणं 

जमतय तुला,

तोवर नकोच 

बघूस कोणाच्या 

नजरांचे इशारे!


पोपटी पानांनी 

घे तुलाच वेढुन.

हवं तर उमलव

नाजुकशी कळी,

एका वा अनेक.

पण असू दे सुगंधी

अगदी सारा प्राण,

साठावा श्वासात

असेच असू दे

आसुसलेपण!


नाही रोज 

उमलवलीस 

सारी फुले 

चालेल तरीही.

पण उमलवशील 

तेव्हा अशी उमलव;

असतील नसतील

ती सगळी फुलं, 

की आसमंत सारा 

येेईल शोधत तुला!


मग, ना तुझी 

उंची मोजली जाईल,

ना मोजली जाईल

तुझ्या फुलांची संख्या.

ना पाहतील 

पानं ना फांद्या,

वा तुझा पसारा.

बसं इवलुशा

कळीवरती एका

फिदा सारी दुनिया!

-अवल