Sunday, June 18, 2023

पाऊस अन पाणी

 मध्यंतरी सलमान जावेद यांची एक कविता वाचली. "ट्री अँड आईसक्रिम". तर त्या नंतर सुचलेलं काही...


पाऊस...

धो धो पाऊस आवडतो
रिपरिपही आवडतो

उन्हातलाही आवडतो
अंधाऱ्या रात्रीचाही आवडतो

रिमझिमही आवडतो
वादळी वाऱ्याचाही आवडतो

संततही आवडतो
बदाबदाही आवडतो

शेवटी वहात मिळतो
समुद्रालाच!

----

पाणी...

पाणी कोणतंही आवडतंच.
पावसाचं आवडतं
नदीचही आवडतं
झऱ्याचही आवडतं
तळ्यातलं आवडतं
तलावातलंही आवडतं
ओहोळामधलं आवडतं
पाटातलंही आवडतं

शेवटी बी रुजण्याशी मतलब!
---

Sunday, June 11, 2023

नीलाक्ष

फोटो क्रेडिट:  सोनल इनामदार


हा निलकंठ घेई उशाशी रान

झोपे तरीही जागेच असे भान


दोन्ही नयन जरी मिटलेले

तिसरा ठेवतसे जगाचे भान


जरी लोकांस दिसे तो लाल रक्तिम 

परि निरवतेत असे संथ शांत सान


जग शांत, निसर्ग हिरवा गार

मग अरिष्टनेमि होई नीलाक्ष

---

Thursday, June 8, 2023

हे मेघ निघाले

हे मेघ निघाले आज

पसरुनी दोहो हात.

बाहुत घेऊ पाहत

तेजाचा झळाळ ताप.

रिचवुनी पोटी आग

पसरवे थंड वात.

शिडकावे वर फार

अलवार नीर गार.

ओटीत रात्रीच्या आज

उद्याचा असे श्रृंगार .

Friday, April 28, 2023

नीलकमळाच्या कळ्या

लोकं म्हणतात तुझ्या

शिरावरचं मोरपीस सुंदर

काहींची नजर हटत नाही
तुझ्या मुखचंद्रम्यावरून
काहींना वेडावते तुझी
सुरेल बासरी
तर काहींना मोह
राधेश्यामाची जोडी
काहींना आठवतो तुझा
रथामधला सल्ला
तर काहींना आठवता
तुझे चमत्कार
काहींना भावतो तुझा
निरक्षीर विवेक
तर काहींची मान तुकते
तुझ्या न्यायप्रवणेतेवर...

मला मात्र
फक्त दिसत रहातात
नीलकमळाच्या
दोन नाजूक कळ्या
एक सरळ
एक जरा तिरकी.
वर सोनसळी किरणं
माझं सारं अस्तित्व
सादर तुझ्या
चरणकमलांवर!
---

Saturday, March 18, 2023

सप्तपदि


चालवुनि चाका, गरगरा पायी

भेटीलागी जिवा,
चक्रधारी!

चालविशी किती, अनाथांच्या नाथा
आस लागली,
पंढरीनाथा

सोडोनिया सारा, सग्यांचा संग
आलो पायाशी,
पांडुरंग

धावाधाव किती, पडतो पाया
भेट आता,
पंढरीराया

ओव्या, अभंग आणि विराणी
तुची सांग,
विठाई

डोईवरी हात, ठेवी आजोबा
त्यांच्यात पाही,
विठोबा

अभंग गाई, तुक्याची सावली
मज सावरी,
विठुमाऊली

संपत्ती सत्ता, संपेना हाव
सुटो पाश,
गुरूराव

विचार, वंचना, वादळ मिटलं
टेकतो माथा,
विठ्ठल

भवसागर संपला, सुटेना तरी
भास मनाचा,
श्रीहरी

उखडेल कधी, वरलिया रंग
भरुनिया राही,
पांडुरंग
---

Wednesday, March 15, 2023

गारठा



तुहिन वादळ

बर्फाळ चादर


हिमाचा पाझर

दुलई धवल


छतांवर भुरा

ओलेत्या वाटा


शांत गावकूस

नाही मागमूस


पानोपानी ओस

ओथंबला कोष


गारठे आसमंत

परिपक्व हेमंत!

--

Tuesday, March 14, 2023

गारुड!


एक निरस स्थिर चित्र समोर!
कबुतरी रंगाचे छपरांचे डोंगर
राखाडी रंगांचे निष्पर्ण वृक्ष
हिरवे, रुखे, काटेरी झुडुपं
वा जाडेभरडे काटेरी पाईन
सुनसान रस्ते चित्रातल्यासारखे
एखादीच सुळकन पळणारी गाडी
वातावरणात भरून राहिलेले मळभ
हाडांपर्यंत पोहोचणारा गारवा


अन मग जादू व्हावी तसे

अचानक वरून पाझरू लागतो
पांढरा शुभ्र हलका कापूस
वाऱ्यावर हवे तसे झुलणारे
नजर ठरूच न देणारे हे पुंजके
सारा आसमंतच बदलून टाकणारे
स्थिर चित्राला सजीव करणारे
अलगद, अगदी आपल्याही नकळत
स्वप्नाच्या घेऊन जाणारे, एक गारुड!

Sunday, February 12, 2023

निर्झरी


वाहते कधीची, ही नदी निर्झरी

शोधित चाललो, तू न मी दिगंतरी


दोन काठांवरी, नांदते वेगळी

पण कशी कोणती, नाळ आहे अंतरी


नात्यात आपुल्या, जाहल्या पडझडी

पण पुन्हा सांधल्या, मनाच्या ओंजळी


दावितो मी तुला, गगनी ही तर्जनी

सारे दाविशी तु, तुझिया दो अंजनी


पुजते जग सारे, मजसी अंतर्यामी

अन मनी माझिया, तूच तू निर्झरी'

---


कान्हा राधेसाठी उरे

अंधाराला पडे

चांदण्याचे खळे

बाभळीला आले

निशिगंधाचे कळे


दाट जंगलातले

निळेशार तळे

गुज मनातले 

मनालाच कळे


साज चांदण्यांचे

गाज किनाऱ्यांची

निळेशार हले 

मनाच्या तळ्याशी


शंखशिंपले, मोती

बांधलेली घट्टनाती

संवाद अविनाशी

मनाचा मनाशी


भोवरे नदीच्या कुशीत

ब्रम्हांड मनात ठेवले

साऱ्या विश्वाचा होऊन

कान्हा राधे साठी उरे

---

Sunday, December 18, 2022

ख्वाजा मेरे ख्वाजा...

(ख्वाजा मेरे ख्वाजा हे जोधा अकबर मधलं गाणं फार आवडतं. शब्दही, दृष्यही. सुफि संप्रदायाबद्दल एक गूढ आकर्षणही आहे. आज पुन्हा हे गाणं ऐकताना पहाताना हे सुचलं...)

सगळीकडे भरून तू

बाहेर तू, आत तू

तुझ्यात तू, माझ्यात तू.

फिरतो मी माझ्याच भोवती

की फिरतो तुझ्या भोवती

की तूच फिरवते आहेस मला

की तुझ्यातल्या मला फिरवतो आहेस?


एक हात वर, एक बाजुला

वरून तुला घेतो सामावून

अन बाजुने देऊन टाकतो

तुझे तुलाच माझे मीपण!

तूच माझा मालिक

तूच माझा कर्ता धर्ता

तुझ्यातच मी, माझ्यातच तू.


संसार भवंडरात फिरणारा

मला गुंतवणाराही तू 

अन सोडवणाराही तूच

हे माझ्या परमात्म्या

तुलाच सारे सादर!