Friday, July 23, 2021

वादळ!

वृक्ष पेलतो नभांना, जीव ओवाळुनि

बरस बरस असा, फुलु दे अंगी अंगी


गूढ सावळछाया, मनास या वेढी 

नको वास्तवाचे भान, मज स्वप्न हे भुलवी

लोका वाटे भय याचे, मज  आधार तोचि

मना डोळ्यातले आसू, लपे नभाच्या अंधारी

दु:खाचा हा आठव, जपे उराउरी

बरस बरस असा, फुलु दे अंगी अंगी


परि आस ही, सुटता सुटे नाही

मन मनास कसे, उलगडेना काही

दिवटीच्या उजेडी, तिक्षा सजणाची

डोळे स्थिरावती माझे, रस्ता नागमोडी

घोंगावुनि आला वारा, सुसाट वादळी

बरस बरस असा, फुलु दे अंगी अंगी


सावळ्याची दुलई, येई चहुओरांनी

आस मनात असे, लुकलुकत्या दिव्यापरि

येईल साजण दारी, सजेल रात्र सारी

बरस बरस असा फुलु दे अंगी अंगी

Thursday, July 15, 2021

मेघा...


इतकं सारं 

कळिकाळाचं

दु:ख घेऊन

भोरविभोर होऊन

निघालास तर खरा

पण इतकं वाहून नेणं 

होई ना न तुलाही?

मग बरसलास

नको तसा 

नको तिथे!

असं कर 

आता झालाच आहेस मोकळा

तर आरुढ हो वाऱ्यावर

बघ सगळं वाहून टाकल्यावर

कसं हलकं हलकं वाटतं

मग भराऱ्या घेत

जाशील बघ 

कुठच्या कुठे

लहरत!

Tuesday, July 13, 2021

विश्वरुपदर्शनि


मानवा शोधिशी

मजसी तू परि

चराचरात मी 

बघ फिरुनी

जरा मागुति

दृष्टी वळवुनि

मान उंचावुनि

जर पाहशी

सापडेन मी

वृक्ष वल्लरीतुनि

कृष्णहाती पावरी

वा अर्धनटेश्वरनारि

पुन्हापुन्हा दाखवी

पहा विश्वरुपदर्शनि

- अवलरुप आरती



Monday, July 12, 2021

फिदा

जुईच्या वेली,

जुईच्या वेली

ठरलय ना आपलं?

वाढायचं,

आपलं आपणच!

नको कोणाचा आधार,

नको वर वर चढणं,

नको आकाशाला गवसणी

अन नको 

न पेलणारा भारही!


वाढ तुला हवं तसं

पसरू दे परिघ.

वाकू दे फांदी

झुकू दे अवकाश.

तुझा - तुला

तोल सांभाळणं 

जमतय तुला,

तोवर नकोच 

बघूस कोणाच्या 

नजरांचे इशारे!


पोपटी पानांनी 

घे तुलाच वेढुन.

हवं तर उमलव

नाजुकशी कळी,

एका वा अनेक.

पण असू दे सुगंधी

अगदी सारा प्राण,

साठावा श्वासात

असेच असू दे

आसुसलेपण!


नाही रोज 

उमलवलीस 

सारी फुले 

चालेल तरीही.

पण उमलवशील 

तेव्हा अशी उमलव;

असतील नसतील

ती सगळी फुलं, 

की आसमंत सारा 

येेईल शोधत तुला!


मग, ना तुझी 

उंची मोजली जाईल,

ना मोजली जाईल

तुझ्या फुलांची संख्या.

ना पाहतील 

पानं ना फांद्या,

वा तुझा पसारा.

बसं इवलुशा

कळीवरती एका

फिदा सारी दुनिया!

-अवल

Monday, July 5, 2021

प्रतिमा

 


झाकोळले नभ, सावळीच आभा

उगाळुनि गंध, रवी क्षितीजाशी उभा 


गोदावरीत उतरले, सारे आकाशीचे रंग 

पाहण्यास सोहळा, आला बाहेर श्रीरंग


कर कटेवरी दोन्ही, शिरी शोभे तो मुकुट  

प्रत्यक्षाहुनि प्रतिमा, दिसे विठुची उठून

सुर्यास्त


 

चला आता

रथ निघाला

पाठीमागे लोट,

गर्द केशराचे!


येईल लवकरच

अंधाराचे साम्राज्य

पेटवायला हव्यात

ज्योती घराघरात


घनगंभीर रात्र  

जागवायला हवी

उद्याचा सुर्योदय 

साजरा करायला!


जीवनदान

बघ हात पुढे केलाय मी

मागतोय तुला जीवनदान!

छे माझ्यासाठी नाही तुझ्याचसाठी!


रुजव मला मातीत

पण त्यावर खोच

एखादीतरी फांदी!


मग तिला धरून 

येईन पुन्हा वर

तुलाच जगवण्यासाठी!

Monday, June 14, 2021

चाफ्याच्या झाडा...

(कोरोना काळात मुलं फार फार कोंडली गेली घरात. अत्यावश्यक,अपरिहार्य पण तरीही कोमेजली काही. अशा काही मुलांसाठी. पद्माताई गोळेंची क्षमा मागून...)

चाफ्याच्या झाडा

चाफ्याच्या झाडा

थांब ना रे जरा
माहितीय मला
फुलायचय तुला
पण थांब जरा

बघितलस का
कसा सुटलाय वारा
मधमाशांचा ताफा
जोसात कसा
फिरतोय सैरावैरा
तो डसेल तुला
म्हणूनच थांब जरा
चाफ्याच्या झाडा

माहितीय तुझा
फुलायचा वसा
पानोपानी कळा
सृजनाचा उमाळा
शोधायच्यात वाटा
नवनव्या तुला
खुणावतात त्या
सतत तुला
माहितीय मला
पण थांब जरा
चाफ्याच्या झाडा

फुटेल तांबडं आत्ता
सरेल अंधार सारा
मोकळी होईल हवा
घेशील श्वास मोठा
मैदानात तुला
येईल खेळता
मऊ स्पर्श मातीचा
ठप्पा लाल तिचा
उगा केलेली धावाधाव
ढकलाढकी अन धप्पा
नीट उभ्या रांगा
अंतर एक हाता
सगळं होणार मुला
फक्त थांब जरा
चाफ्याच्या झाडा

बोलवतील शाळा
गाल सूरात प्रार्थना
भेटेल सगासोयरा
पडतील गळा मिठ्या
मिळून खाल डबा
तालात म्हणाल पाढा
शाळा सुटण्याची घंटा
धडधडा उतरायचा जीना
सायकलीचा कट्टा
अन त्यावरच्या गप्पा
येतो ना आठव सगळा
पण तरी थांब जरा
माझ्या चाफ्याच्या झाडा
माहितीय मला
फुलायचय तुला
पण थांब जरा
चाफ्याच्या झाडा
चाफ्याच्या झाडा...!

Tuesday, May 11, 2021

खेळ

 


ये कवेत घेण्या तुजला

आसुसला जीव माझा


मनभार कोवळा हिरवा

जीव तुझ्यावरी उधळावा


जन्मे तुझ्यातुनी जीव नवा

सावरण्यास तुलाच पुन्हा


तुझ्यातुनी तुलाच अर्पण्या

चाले खेळ जन्मजन्मांतरा!

गा, मुक्त गा


आज नकोच ऐकू कोणाचच

गा तू, मनसोक्त गा

आज पहिल्यांदा मिळालाय

तुला तुझा बरोब्बर स्वर

तर तू गा

मुक्त मनाने गा!


इतके दिवस तू प्रयत्न करायचास

तुझ्या पालकांसारखा ओरडण्याचा

अन तुझा आवाज तुलाच

कर्कश्य वाटून थांबायचास 

काहीतरी चुकतय

काहीतरी हुकतय

कळायचंच तुलाही

पुन्हा प्रयत्न करायचास

पुन्हा तोच तारस्वर

मग मान झुकवून

गप्प रहायचास

पण आज गा तू

मुक्त गा!


किती दिवस, किती रात्री

तू करतच राहिलास प्रयत्न

त्या खर्जात उतरत

करत राहिलास प्रयत्न

पण तरी तो स्वर

नाहीच बसला तुझ्या तानेत

कितेकदा तपासलस स्व:तालाच

मी तसाच न? पालकांसारखा?

मी तसाच न काळा कुळकुळीत

मी तसाच न इकडून तिकडून

सगळं तर सारखंं 

मग तान का अशी

संभ्रम, अपयश 

अगदी नाराजीही 

पण आज तू गा

मनसोक्त गा!


आज पहाटे दूरून आली

अंधाराला सरसर कापत 

तीच तान, तीच लकेर

दूरून त्याने साद घातली

अन तुझ्याही गळ्यातून 

सरसर उतरली सुरेल तान

तीच जी गळ्यात, मनात

अडकून बसलेली इतके दिवस

हो हो तुझी, स्वत:ची तान

अन मग त्याक्षणी, त्या पहाटे

उमगले सारे सारे तुला

तो गात होता तो तुझा बाप

आज ऐकू आली त्याची हाक

आज कळलं अरे 

हा माझा, मी याचा

अन त्याक्षणी सुटले सारे बंध

तू मुक्त, तुझी तान मुक्त, 

तुझी लकेर मुक्त

गा गा मुक्तपणे गा

तुझे गाणे गा!


नको बाळगु 

आता फिकिर

वेळेची, सुरांची, 

खर्जाची, कशाचीच

तुझा मार्ग वेगळा

तुझी पट्टी वेगळी

तुझी तान वेगळी

तुझी वेळही वेगळी

गा मुक्त गा

स्वयंभू तू

स्वर्गीय तू

मनस्वी तू

मुक्त तू

गा, मुक्त गा

कोकिळा गा!

---


(आपल्यातल्या अनेकांना आपला स्वत:चा मार्ग लवकर सापडतोच असं नाही, तोवर होणारी तगमग, हताशा, चिडचीड अनुभवतो आपण.  पण जेव्हा आपला मार्ग आपल्याला सापडतो, तेव्हा मात्र त्याला सन्मुख होऊन, रसरसून जगा, मार्गक्रमण करा. भले तो मार्ग वेगळा असेल, आपल्या आसपासच्या लोकांसारखा नसेल, आप्तस्वकियांचा नसेल. पण तो तुमचा असेल; तुमच्या स्वत:चा असेल! स्वत:वर विश्वास ठेवा!)