झाकोळले नभ, सावळीच आभा
उगाळुनि गंध, रवी क्षितीजाशी उभा
गोदावरीत उतरले, सारे आकाशीचे रंग
पाहण्यास सोहळा, आला बाहेर श्रीरंग
कर कटेवरी दोन्ही, शिरी शोभे तो मुकुट
प्रत्यक्षाहुनि प्रतिमा, दिसे विठुची उठून
झाकोळले नभ, सावळीच आभा
उगाळुनि गंध, रवी क्षितीजाशी उभा
गोदावरीत उतरले, सारे आकाशीचे रंग
पाहण्यास सोहळा, आला बाहेर श्रीरंग
कर कटेवरी दोन्ही, शिरी शोभे तो मुकुट
प्रत्यक्षाहुनि प्रतिमा, दिसे विठुची उठून
चला आता
रथ निघाला
पाठीमागे लोट,
गर्द केशराचे!
येईल लवकरच
अंधाराचे साम्राज्य
पेटवायला हव्यात
ज्योती घराघरात
घनगंभीर रात्र
जागवायला हवी
उद्याचा सुर्योदय
साजरा करायला!
बघ हात पुढे केलाय मी
मागतोय तुला जीवनदान!
छे माझ्यासाठी नाही तुझ्याचसाठी!
रुजव मला मातीत
पण त्यावर खोच
एखादीतरी फांदी!
मग तिला धरून
येईन पुन्हा वर
तुलाच जगवण्यासाठी!
(कोरोना काळात मुलं फार फार कोंडली गेली घरात. अत्यावश्यक,अपरिहार्य पण तरीही कोमेजली काही. अशा काही मुलांसाठी. पद्माताई गोळेंची क्षमा मागून...)
चाफ्याच्या झाडा
चाफ्याच्या झाडा
थांब ना रे जरा
ये कवेत घेण्या तुजला
आसुसला जीव माझा
मनभार कोवळा हिरवा
जीव तुझ्यावरी उधळावा
जन्मे तुझ्यातुनी जीव नवा
सावरण्यास तुलाच पुन्हा
तुझ्यातुनी तुलाच अर्पण्या
चाले खेळ जन्मजन्मांतरा!
आज नकोच ऐकू कोणाचच
गा तू, मनसोक्त गा
आज पहिल्यांदा मिळालाय
तुला तुझा बरोब्बर स्वर
तर तू गा
मुक्त मनाने गा!
इतके दिवस तू प्रयत्न करायचास
तुझ्या पालकांसारखा ओरडण्याचा
अन तुझा आवाज तुलाच
कर्कश्य वाटून थांबायचास
काहीतरी चुकतय
काहीतरी हुकतय
कळायचंच तुलाही
पुन्हा प्रयत्न करायचास
पुन्हा तोच तारस्वर
मग मान झुकवून
गप्प रहायचास
पण आज गा तू
मुक्त गा!
किती दिवस, किती रात्री
तू करतच राहिलास प्रयत्न
त्या खर्जात उतरत
करत राहिलास प्रयत्न
पण तरी तो स्वर
नाहीच बसला तुझ्या तानेत
कितेकदा तपासलस स्व:तालाच
मी तसाच न? पालकांसारखा?
मी तसाच न काळा कुळकुळीत
मी तसाच न इकडून तिकडून
सगळं तर सारखंं
मग तान का अशी
संभ्रम, अपयश
अगदी नाराजीही
पण आज तू गा
मनसोक्त गा!
आज पहाटे दूरून आली
अंधाराला सरसर कापत
तीच तान, तीच लकेर
दूरून त्याने साद घातली
अन तुझ्याही गळ्यातून
सरसर उतरली सुरेल तान
तीच जी गळ्यात, मनात
अडकून बसलेली इतके दिवस
हो हो तुझी, स्वत:ची तान
अन मग त्याक्षणी, त्या पहाटे
उमगले सारे सारे तुला
तो गात होता तो तुझा बाप
आज ऐकू आली त्याची हाक
आज कळलं अरे
हा माझा, मी याचा
अन त्याक्षणी सुटले सारे बंध
तू मुक्त, तुझी तान मुक्त,
तुझी लकेर मुक्त
गा गा मुक्तपणे गा
तुझे गाणे गा!
नको बाळगु
आता फिकिर
वेळेची, सुरांची,
खर्जाची, कशाचीच
तुझा मार्ग वेगळा
तुझी पट्टी वेगळी
तुझी तान वेगळी
तुझी वेळही वेगळी
गा मुक्त गा
स्वयंभू तू
स्वर्गीय तू
मनस्वी तू
मुक्त तू
गा, मुक्त गा
कोकिळा गा!
---
(आपल्यातल्या अनेकांना आपला स्वत:चा मार्ग लवकर सापडतोच असं नाही, तोवर होणारी तगमग, हताशा, चिडचीड अनुभवतो आपण. पण जेव्हा आपला मार्ग आपल्याला सापडतो, तेव्हा मात्र त्याला सन्मुख होऊन, रसरसून जगा, मार्गक्रमण करा. भले तो मार्ग वेगळा असेल, आपल्या आसपासच्या लोकांसारखा नसेल, आप्तस्वकियांचा नसेल. पण तो तुमचा असेल; तुमच्या स्वत:चा असेल! स्वत:वर विश्वास ठेवा!)
![]() |
फोटो सौजन्य : सोनाली मालवणकर |
कधी त्यालाही होतोच मोह
व्हावं स्वच्छंदी तिच्यासारखं
मारावी टांग, दौडावं आपल्याच मस्तीत
रस्त्यावरचे खाचखळगे,
आयुष्यातले छोटे आनंद.
जाऊत त्या मळलेल्या
पाऊल वाटेवरून
विहरु स्वच्छंद पाखराप्रमाणे
पसरू पंख यथाशक्ती
आजमावू जरा पायातला जोर...
बघ बाबा येतोस का सोबत?
पण सोडावी लागतील राजवस्त्र
व्हावं लागेल फकिर अवलिया
डामडौल सारा इथेच
उतरवावा लागेल
आहे तयारी ?
डोक्यावरचे शोभेचे सिंह
सोडून द्यावे लागतील.
मनातले घोडे मोकळे
सोडावे लागतील.
राजसवारी सोडून
स्वत:लाच बसवावं लागेल
मनाच्या सिंहासनावर!
चल आहे तयारी?
चल तर मग दौड सुरू
न संपणारी
स्वत:च आनंदनिधान असणारी!
शुभास्ते पंथानाम्!
गाढ झोपलेल्या
सानुल्याच्या कपाळावर
अलवार टेकलेलं;
ते मौन ऐकलयस?
स्वप्नाच्या झुल्यावर
आईचा नुसत्या स्पर्शाने
त्याच्या गालातून झरले;
ते मौन ऐकलस?
अन दोघांच्या संवादाकडे
लांबून हळूच पहाणाऱ्या
बाबाच्या चेहऱ्यावरचं;
ते मौन ऐकलयस?
धत्त...
मग मौनाचा अर्थ
कधीच नाही
कळणार तुला!
-
दिला कुणाला, हिशोब नाही
घेतला काही, हिशोब नाही
तुझ्या घराचा पत्ता कोणी
दिला कशाला, हिशोब नाही
साधा सरळ निघाला कोणी
कसे ठरवावे, हिशोब नाही
पसंत तुजला पडला कोणी
का कसा असा, हिशोब नाही
नजर नजरेची गुलाम कोणी
मालक कोण, हिशोब नाही
प्रेमात असे पडेल कोणी
कधी कसे का , हिशोब नाही
कोण शिकार, शिकारी कोण
कोण अवल, हिशोब नाही!