Friday, April 9, 2021

मनो-रथ

फोटो सौजन्य : सोनाली मालवणकर


कधी त्यालाही होतोच मोह

व्हावं स्वच्छंदी तिच्यासारखं

मारावी टांग, दौडावं आपल्याच मस्तीत

रस्त्यावरचे खाचखळगे,

आयुष्यातले छोटे आनंद.

जाऊत त्या मळलेल्या

पाऊल वाटेवरून

विहरु स्वच्छंद पाखराप्रमाणे

पसरू पंख यथाशक्ती

आजमावू जरा पायातला जोर...


बघ बाबा येतोस का सोबत?

पण सोडावी लागतील राजवस्त्र

व्हावं लागेल फकिर अवलिया

डामडौल सारा इथेच 

उतरवावा लागेल

आहे तयारी ?

डोक्यावरचे शोभेचे सिंह

सोडून द्यावे लागतील.

मनातले घोडे मोकळे

सोडावे लागतील.

राजसवारी सोडून

स्वत:लाच बसवावं लागेल

मनाच्या सिंहासनावर!

चल आहे तयारी?

चल तर मग दौड सुरू

न संपणारी 

स्वत:च आनंदनिधान असणारी!


शुभास्ते पंथानाम्!


No comments:

Post a Comment