Thursday, April 8, 2021

मौन


गाढ झोपलेल्या 

सानुल्याच्या कपाळावर 

अलवार टेकलेलं;

ते मौन ऐकलयस?


स्वप्नाच्या झुल्यावर 

आईचा नुसत्या स्पर्शाने

त्याच्या गालातून झरले;

ते मौन ऐकलस?


अन दोघांच्या संवादाकडे

लांबून हळूच पहाणाऱ्या

बाबाच्या चेहऱ्यावरचं;

ते मौन ऐकलयस? 


धत्त...

मग मौनाचा अर्थ

कधीच नाही 

कळणार तुला!


-

Monday, April 5, 2021

हिशोब नाही...

दिला कुणाला, हिशोब नाही 

घेतला काही, हिशोब नाही


तुझ्या घराचा पत्ता कोणी

दिला कशाला, हिशोब नाही


साधा सरळ निघाला कोणी

कसे ठरवावे, हिशोब नाही


पसंत तुजला पडला कोणी

का कसा असा, हिशोब नाही


नजर नजरेची गुलाम कोणी

मालक कोण, हिशोब नाही


प्रेमात असे पडेल कोणी

कधी कसे का , हिशोब नाही


कोण शिकार, शिकारी कोण 

कोण अवल, हिशोब नाही!


Thursday, March 25, 2021

पिकलो परि

फोटो: अनंत गद्रे

पिकलो परि

गळलो परि

उभारी मनी

हिरव्या तनी


आठवणी येती

रंग पाझरती

एकमेक मिसळती

डोळे पाणावती


उंच नभावरती

झुललो किती

झाली पानगळती

उतरलो धरतीवरती


जगलो स्वच्छंदी

माहिती अगदी

मिळशी मातीमधी

श्रीसार्थ समाधी


 

Tuesday, February 23, 2021

पाऊस ... जीवघेणा

पाठवशील रे तू

पाऊस,

पागोळ्या,

थेंब,

आठवणी....

अगदी चिंब असणाऱ्या...


पण बदलला ऋतु,

बदलली नाती,

बदलली आस,

बदलली ओढ...


मग सुनाच तो पाऊस,

आक्रसलेल्या पागोळ्या,

थबकलेले थेंब,

पुसटलेल्या आठवणी,

...


जाऊ दे

सोड तो नाद

जप तुझा तुझा पाऊस

तुझ्यासाठीच

मला नुसता 

डोळ्यातून झरणारा पाऊस पुरेसा...

पुरेसा जीवघेणा!






अंबर की ओर

शाख शाख टहनी टहनी

पसारे बाहें अखियाँ बिछे

देख रहीं अंबर की ओर


मिट्टी का हर कण कण 

सदियों से  है प्यासा सा 

राह ताकता अंबर की ओर


दूर वहाँ पिछे बसती के 

ढलते सूरज की चाहत 

इक बादल हो अंबर की ओर


इक अकेले पेड से लिपटी

कब से खडी देख रही हु 

तूही आ जा अंबर की ओर

पाऊस पाऊस

 पाऊस पाऊस

माह्या कष्टाचा मैतर

शेतात पेयली रोपं

कशी तरातली वर


पाऊस पाऊस

माह्या मनाचा सोबती

देतो आठवय रायाचा

सडा जाईजुईचा भोवती


पाऊस पाऊस

माह्या कपाळीचं गोंदण

पडला घात अवेळी

गेयं वाहुन वाहून


पाऊस पाऊस

माह्या डोयांच्या आत

भिजवितो दुखाले

वेदनेचा फुटे कोंब


पाऊस पाऊस

माह्या जन्माचं गाऱ्हाणं

फिरे वेठीचा हा आस

कधी संपल हा मास

Sunday, December 6, 2020

झाडोरा

सोनाली मालवणकर हिने काढलेला फोटो

पानांफुलांना वरदान असतं उमलण्याचं

पण सोबत येतो शापही गळण्याचा

पानाफुलांचे रंगही चमकते तजेलदार

पण सुकण्याचाही वसा ओटीत

फांद्यांचे उमलणे, दिसणे

सगळेच कसे कसनुसे

पण त्यांना नाही शाप गळण्याचा

मोडली एखादी तरी 

तरून जाते इतरांच्या आधाराने

अन मग त्यांनाच वसा मिळतो

नवोन्मेषाचा, सृजनाचा अन

नव्या जन्मांच्या अनुभूतीचाही!

Tuesday, December 1, 2020

प्रवाह !

या  टप्यावर थांबून जरा वळून

पहातोय मागून वाहात आलेल्या आयुष्याकडे.

खळाळते माझेच आयुष्य

किती साहसी दिसतेय

असा होतो मी? 

इतका जिवंत सळसळता?

आता सगळ्या अनुभवांमधून जात

किती शांत झालोय

स्थिरावलोय

खोलीही आलीय.

असं नुसतं वाटतय? 

की खळबळ आहेच 

आताही, आसपास?

हम्... आयुष्य 

एक खळाळ नुसता !

बयो...



अगदी मान्य बयो

तुझी तुटूनच गेली नाळ

ज्यांच्याकडे आधारासाठी 

हात पुढे केलास

त्यांनीच चार स्वाक्षऱ्या 

पुढे केल्या फक्त

अगदी मान्य आहे बयो

ज्याने भरभक्कम 

पाठीमागे उभं रहायचं

राखीचे नाजूक बंध 

तोडून टाकले त्यानेच


अगदी मान्य आहे बयो

ज्या जमिनीत तुझी नाळ पुरली

तिथे नाहीच फुटला 

पाझर मायेचा

अगदी मान्य आहे बयो

सगळं झुगारून 

झटलीस असाध्याशी

मात्र त्या झगडण्याचा 

अधिकारच प्रश्नांकित झाला

परंपरेला पुढे नेण्यासाठीचा 

तु मांडलेला नवा मार्ग

पार पार डागाळून टाकला त्यांनी


बयो सगळं सगळं मान्य आहे गो

पण बयो कितीतरी धागे

तसेच विखरून पडलेत बघ

तुझ्याशी जोडलेली नाळ

अजून ओलीय बघ त्या जिवाशी

जिवाशिवाचा साथी तोही

थांबलाय बघ अवाक होऊन

तुटलं तुटलं वाटत असतानाही

आज पोटात तुटणारी 

तुझी माणसं तळमळताहेत

अनेकांना श्वास मिळावा 

म्हणून तू लावलेली हजारो झाडं 

आज श्वास धरून स्तब्ध

मनोमन आशिर्वाद देणारे 

ते विस्कटलेले हात

दुवा मागताना कापताहेत बघ

नव्या स्वप्नांमधे गुंगलेले कितीतरी डोळे

नुसते नुसते पाझरताहेत- वांझपणे

नवं जग नवं विश्व नवं स्वप्न

सगळं कसं पारोसं होत पडून राहिलय


बयो बयो सगळं तसच 

सोडून  जाताना

एकही नाजूक धागा 

नाही का ग आठवला

नाही का ग 

एकही धागा गुंतला 

तुझ्या पायात हातात

बयो अगदी मान्य 

तू सुटलीस

पण सुटला का ग 

गुंता सगळा

बयो...

Monday, November 23, 2020

सोपं नसतंच...

खळाळत्या नदीत पाय 

सोडून तर काय

कोणीही बसेल


ना कुठली चिंता

ना निसरडे दगड पायाखाली

झुळझुळ वाहणारं 

स्वच्छ, आरसपानी पाणी

थोडं गार थोडं उबदार

क्षणाक्षणाला जिवंतपणाची

उसळत्या उन्मेषाची ती अनुभुती!


खळाळत्या नदीत पाय 

सोडून तर काय

कोणीही बसेल


खरा धाडसी तोच

जीवनाला जोखण्यासाठी

जो डोहात उतरेल


डोह; काळाशार, निशब्ध!

तळ न दिसणारा

क्षणात पाय निसटेल

अशा अनेक अनुभवांची

शेवाळी काठावर घेऊन बसलेला

अन काळी-पांढरी नव्हे 

तर अनेकरंगी अनुभवांना 

पोटात सामावून घेतलेला


अशा डोहात 

नुसतं पाय बुडवणंही

सर्रकन काटा आणणारं

त्याचा थंडगार दचकवणारा स्पर्श

शिळेसारखा काळाकभिन्न रंग

खोल खोल नजर न टिकणारा.

जितकं खोल बघावं;

भूल पडत जाणारा गहिरेपणा

चढत जाणारी एकटेपणाची गुंगी

आणि आत आत भिनत जाणारे

गुढ गंभीर आपल्यातलेच

एक अनाकलनीय साधुत्व


डोहात पाय सोडून बसणं

आत उतरणं... छे...

नसतच अजिबात सोपं