Sunday, May 1, 1988

असं का केलत गांधीजी ?

आम्हाला हिरवे वैभव
दाखवताना
बियांची मशागत
आम्हाला शिकवलीच नाहीत
असं का केलत गांधीजी ?

तुमचे केशरी रक्त
सांडताना
त्याचा कित्ता
आम्हाला शिकवलाच नाहीत
असं का केलत गांधीजी ?

तुमच्या पांढया टोपीतले
चौथ्या मितीतून
दिसणारे सप्तरंग
तुम्ही दाखवलेच नाहीत
असं का केलत गांधीजी ?

तुमच्या फिरत्या
चरख्याच्या गतीतून
पळणारी कालगती 
तुम्ही दाखवलीच नाही
असं का केलत गांधीजी ?

पेरणी करतानाच
कुंपण घालण्याची
लेनिनची दक्षता
तुम्ही घेतली नाहीत
असं का केलत गांधीजी ?

Sunday, April 3, 1988

माझे कर्नाळ्याचे बोट

माझे कर्नाळ्याचे बोट
उभे उंच आकाशात
दगडाच्या वीटेवरी
उभा दगडीच विठू ||

माझ्या मनीच्या डोही
उठे अध्यात्मिक लाटा
नाव भेलकांडे माझी
वल्ही कशाची वल्हवू
हात अडकले माझे
माझे मलाच सावराया ||

ना उचले पाऊल
पडे भावनेचा वेढा
टेके डोई अन शब्द
बोले झोपले नशिब
काय हा रे तिढा
सोडू सुटता सुटेना ||

पुरे पुरे रे अध्यात्म
कोण कुठचा हा आप्त
नको भलतीच वाट
मज मीच अखेर
माझे कर्नाळ्याचे बोट
उभे उंच आकाशात ||

Tuesday, March 29, 1988

Being

Is there an ultimate truth as such
or the surch for it is the only truth?

Does the truth is one for all
or it cames seperatly  towerds all?

Is the path of search is the same
or it has diversions of thoughts?

Can one gave an ulttimate answer
or is it not a question atall?

Sunday, March 20, 1988

जीव बैचेन बैचेन ...

जीव बैचेन बैचेन
झाला आज अनावर|

गेले क्षण तास काळ
मनी उफाळे जंजाळ
आज उदास उदास
पडे वेठीचा हा आस |

झाले कित्तेक दिवस
माझा मलाच हा सोस
ना उठला मम अक्ष
ना मानला पर पक्ष
माझी माझ्यातच गुंग
नाकारला सतसंग |

मन म्हणे शोध शोध
सूर, शब्द अन बोध
धुके भावनांचे पुरे ग
फुटो शब्दांचे धुमार 
होई एकच आभास
लागे कवितेची आस|

जीव बैचेन बैचेन
झाला आज अनावर|

Thursday, March 10, 1988

तर तूही अखेर ...

तर तूही अखेर
हजला निघालीस ...

अंधश्रद्धा नाही म्हणालीस
पुनर्जन्म नाही म्हणालीस
अखेर हजला निघालीस !

मनास येईल तेच खरं
भावना बिवना झूट सारं
हजला निघालीस अखेर !

यश ते माझ्या हाताला
मीच जबाबदार कर्माला
निघालीस अखेर हजला !

Wednesday, March 9, 1988

सांग ना

सांग ना ,
असं का व्हावं आपल्या भेटीत!

तुझ्या गाडीचा तो धुंद वेग
माझ्या केसातला गंधीत मरवा 
नागमोडी रस्त्याची मायावी वळणं 
घनदाट झाडांची वेडी माया 
सांग ना ....

तुझ्या डोळ्यातली स्वप्न
मलाही दिसावीत 
माझ्या मनातल्या चांदण्यानी 
तुझेही डोळे निवावेत
सांग ना...

तनामनातून आलेले तुझे शब्द
भावनांनी ओथंबलेले माझे सूर
अस्वस्थ करणारी तुझी नजर 
आवर ना म्हणणारी माझी वीज 
सांग ना ...

वाळूवर उमटणारी भरीव गाज
हेलावून टाकणारी शिवरंजनी 
हवीहवीशी वाटणारी बोलकी शांतता 
भरभरून कोसळणारी थरथरती तृप्तता 
सांग ना...

Friday, February 26, 1988

खामोशी

तसा जगाने ही
अन्याय केला होता
माझ्यातल्या मला ही
वेगळे मानले होते.

तुझा आजचा हा
हेका सामर्थ्यशाली
मला कळला नाही
न कळो कधीही.

तुझ्या मनातल्या
माझ्या स्पंदनांचा
जो आकार होता
तो वेगळा होता.

का गोंधळ नात्याचा
घातलास तू ही
होता आधार तूच
मज आज समजण्याचा.

होता राग माझा
माझ्या न समजण्याचा
अन तू ही तेच केले
मज आवरेना उमाळे.

झालाच भावनांचा
कडेलोट परतोनि
पण तो वेगळा होता
अन हा वेगळा आहे.

Saturday, February 13, 1988

युटोपीयन शोध

वाटेवरचा हिरवा किडा
अजूनही वळवळतो आहे
अंतरीच्या गूढ गर्भी
हिरवा चाफा शोधतो आहे

डोळ्यावरच्या तिरीपेसाठी
पिंपळ छाया शोधतो आहे
पौर्णिमेच्या चंदनरात्री
तिसरा डोळा शोधतो आहे

पानगळीच्या गालीच्यावर
हिरवे पान शोधतो आहे
भावनेच्या वातीसाठी
नास्तिक देव शोधतो आहे

वाटेवरचा हिरवा किडा
अजूनही वळवळतो आहे
पानगळीच्या गालीच्यावर
हिरवे पान शोधतो आहे

अंतरीच्या गूढ गर्भी
हिरवा चाफा शोधतो आहे.



(वाट- आयुष्य
किडा- आपण/ व्यक्ती
हिरवेपणा- जगण्याची इच्छा/ वृत्ती
हिरवा चाफा- जाणवणारे पण पटकन न सापडणारे/ न समजणारे असे काही( ज्ञान, तत्वज्ञान, धर्म, शास्त्र, कला,....)
डोळ्यावरची तिरिप- जशी त्रासदायक असते तसा जगतानाचा अनुभव
पिंपळ- फार काही सृजन नसणारा पण तरीही अस्तित्वाचे महत्व असणारा जीव म्हणजे आपण स्वत:
छाया- सुख
पौर्णीमेची चंदनरात्र- सुखाचा काळ
तिसरा डोळा- सगळं संपणारं आहे अन पुढे नवीन काही आहे प्रलय अन सृजन यांचं न संपणारं चक्र
पानगळीचा गालिचा- सृष्टीचे हे जीवनमरणाचे चक्र
हिरवे पान - पुन्हा जगण्याची इच्छा हाच संदर्भ
भावनेची वात- मानवी मनातील माणूसपणाची भावना
नास्तिक देव शोधतो- कोणी एक निर्माता नाही हे माहिती असूनही मानव्यपणात देव शोधणं)





Thursday, November 26, 1987

प्रिय सूर्यफुला


तुझाच मला आधार होत.
तुझ्या सावल्या टाळत
अंधार मी खोदत होतो.

एकदा विचार आला,
चढून पहावा सूर्य एकदा !
पण तेव्हढ्यात थबकलो,
विचार केला....
त्यासाठी तुझ्या सावलीतून,
तुझ्या देठावरून जाताना,
एखाद वेळेस
तुझ्या पाकळीलाच
सूर्य समजून थांबलो तर ?

आणि म्हणून
तुझ्या सावलीशी
थबकलो, मागे सरलो
आणि
तेव्हाच मला उमगले,
उमलले,
मीच एक सूर्यफूल
मीच एक सूर्यफूल

Saturday, July 11, 1987

असते ती फक्त ...........

सुख असतं; पण ते फुलण्याइतपतच
कृतार्थता, महत्वाकांक्षा, अधिकार ;
तेही असेच गोंजारणारे !

दु:खही तसं अहंकाराशी जोडलेलं
पराभव, अपमान, विश्वासघात
तसे सगळेच त्या अहंकाराचे !

इतरही तळ्या-मळ्यातले...
एखादी पुसट सीमा घेउन
एकमेकांना ढुशा देणारे !

तसं पाहिलं तर
आपलं असं काहीच नसतं;
असते ती फक्त
एक अलिप्त उदासिनता........... !