Sunday, May 18, 2025

तथागताचे शांत हसू!

जगातल्या सर्वात उंच पठारावर
गारठलेल्या समुद्रभूमीतून 
जास्तीत जास्त गडद, रंगीत, कठीण रत्न 
दिवसोंदिवस वाकून शोधलेली
अन मग अनेको दिवस त्यांना
खट्ट खरखट्ट करत उखळीत दळलेली
अन तयार झालेली रवाळ, रंगीत वाळू.
हे सर्व करताना आलेले निसर्गभान 
आसपासच्या निरव शांततेची जाणीव 
वाऱ्याची अन खालच्या नद्यांची गाज 
निसर्गाचं आपल्याशी असणाऱ्या नात्याची जाण
त्यातून आलेला संयत साधनेचा प्रयास
चिंतन आणि मनन यातून आलेल्या एकात्म आकृत्या
आणि अंतिम शांततेच्या त्या उदगात्याचे स्मरण!

अन मग त्या सगळ्यांचे सार उतरवत
विश्व, निसर्ग, मानवी मन याच्या संरचना 
भौतिक आकृत्यातून विविध रंगात रचताना
"चक्र पूर" मध्ये रंगीत वाळू भरून
त्यावर तारांनी आघात करत
कर कर कर कर या तालात
त्यांच्या समन्वयातून पडणारी संततधार -
रवाळ रंगीत वाळूची संततधार
घेत जाते विविध आकार, रंग, आकृती
एक वा अनेकांची तपश्चर्या, साधना 
उलगडत जाते लाकडी चवथऱ्यावर
एक विश्व!

आणि मग तो दिवस येतो
पूर्ण होते वालुका मंडल!
उत्कट रचना, अमूर्त शांतता, सशक्त ताकद
रचणारे, बघणारे, वास्तु, आसमंत, सृष्टी... 
सर्वच सुचिर्भूत होते; निरोगी होते; पवित्र होते.
बाहेरून,आतून, सूक्ष्मातून एक सच्चिदानंद संवाद.
करुणा, सहसंवेदना, नश्वरतेची जाणीव
अन वैश्विक उपचार पाझरत राहतात. 
सगळे स्वच्छ, सुंदर, तरल, निरभ्र करून टाकतात
विश्वाचे, मनाचे, ज्ञानप्राप्तीच्या मार्गांचे
ध्यान, एकाग्र, चिंतन, अध्यात्म
यांना चालना देत उभे राहते
रंगीत वालुकामय मंडल!

आणि मग येतो तोही क्षण
संपूर्ण मंडलाच्या सर्व त्रिज्यातून
एकत्र येत जातात सर्व दिशा,
सर्व रंग, सर्वमिती, सर्व आकाश
आणि मध्यात तयार होत जाते
हे निरंग सत्व!
सूचवत जाते विश्वाची नश्वरता
त्याचा सहज, तत्पर, स्वीकार-
अन मग मृतघटिकेत सामावून
आणले जाते पुन्हा नदीच्या तीरावर
तिथल्याच नदी तीरी अर्पण केली जाते
निरंग सत्वाची वाळू.
अगदी तितक्याच निर्लेपपणे, निरपेक्षपणे
जिथून आलो तिथेच संपणे
मोक्ष पावणे!
अन या सर्वांच्या मध्यात
फक्त मंडलाचे जगणे!

काश
काश, असे जगता आले असते तर?
तथागताचे शांत हसू
मग तरळले असते
प्रत्येकाच्याच ओठी...!

---

"चक्रपूर" - फनेल सारखे एक धातूचे साधन ज्यात वाळू भरून रांगोली- मंडल रेखले जाते.

----------------------------

ता . क. 
कविते बद्दल थोडेसे .. 


सर्व छायाचित्र नेट साभार 







----------------------------




Thursday, May 15, 2025

कोऽहम्

आकाश, क्षितीज, सागर

वितळत राहिले जीवनभर

सीमारेषा विरघळल्या पार

अन निरवतेत झिरपलं सार

कोऽहम् कोऽहम् ...