Tuesday, March 25, 2025

जीवन

मावळत्या सुर्याची केशरी आभा

हळूहळू पसरतेय सगळीकडे

खिडकीच्या कट्यावर बसून

हातात कॉफीचा कप घेऊन

हे सगळं पहात आठवतेय

एक एक सुंदर अनुभव


होणारी रात्र जाणवतेय 

येणारा अंधारही दिसतोय 

मनात असंख्य चमकती

आनंददाची उसळती कारंजी

उजळून टाकते आहे कोना कोना

एक एक सुंदर अनुभव


आनंद, दु:ख, समाधान, धडपड

उत्सुकता, अपयश, नाराजी, उभारी

धडपड, निवांत, असोशी, निरपेक्ष

प्रेम, दया, राग, चिडचिड, शांत

सहृदय, सकारात्मक सगळे सगळे

एक एक सुंदर अनुभव


सकाळ होते तशीच रात्रही

मधला दिवस आपला असतो

येणारी रात्रही असते आपलीच!

दिवस भरभरून जगले की

रात्रही हवी हवीशी होऊन जाते

एक एक सुंदर अनुभव!

Sunday, March 16, 2025

शिकवण


 

एरवी न जाणवणारा

अवकाशाचा गोल

असा जाणवून देतो

गाभा किती खोल


एकावर एक थर

वर गडद गडद

सांगत रहातात

जरा खोल आत बघ


उजेडाची एक तिरिप

प्रयत्न करते घुसायचा

ढगांची घनता शिकवते

किती कणखर असावं


इतरांना किती प्रभाव 

आपल्यावर पाडू द्यायचा 

हे शेवटी आपणच

आपलं ठरवायचं असतं!

---

Saturday, March 15, 2025

विचारांचं वादळ


 

विचारांचं वादळ तसं येतच झंजावत!
एक, दोन, सतराशे पन्नास विचारांना कसलं बंधन?
एकमेकात अडकून सगळाच सावळा गोंधळ!
मग थोडं शांत बसावं; मोठा श्वास घ्यावा.
अन अलवार हा गोंधळ निवरत जावा;
तसं एक एक ढग विरत जातो.
जलचित्रात जसा एक कुंचला फिरावा,
तसे हलके हलके निरभ्र होत जातं आभाळभर मन...
अन मग स्वच्छ प्रकाश - मनभर!
---