Friday, February 7, 2025

आपण पाहू तसं!

फोटो क्रेडिट- श्रीलेखा गोहाड

सुर्योदय होताना

उजळून जातो आसमंत.

अगदी दूरवरची झाडं

आपल्या प्रतिबिंबासह

नीटसच उमटतात.

तळ्याचे लखलखते पाणी

अन आभाळाची त्यात

उमटलेली आभा,

समोर पसरलेली 

हिरवी लव, कुंपणासह ....


अगदी सगळं दिसत रहातं.


अन रात्रभराची साथ देणारे,

हलकेच वाऱ्यावर झुलत,

अस्तित्वाची साक्ष देणारे

ते तीन माड.

ते मात्र दिवसाच्या उजेडात

अगदीच नजरेतून 

सुटून जातात...


शेवटी आपण पाहू तसं;

आनंदात सोबत करणारे,

दिसणारे सौंदर्य, रंग

क्षणिक साथ देणारे

प्रतिबिंब

हे आणि असे सगळे?

कि

असीम शांततेत;

अस्तित्वाचे भान देणारे

तीन स्तंभ

स्वर्ग, मृत्यु, पाताळ!

---

No comments:

Post a Comment