Thursday, February 27, 2025

मराठी मुलांना इंग्रजी शब्दांची ओळख होण्यासाठी गाणी

 १. कलरफुल गाणे

रेड काय रेड काय

कुंकू पहा लालम लाल


ऑरेंज काय ऑरेंज काय

केशरी संत्रे सोला चला


यलो काय यलो काय

हळदीचा पडला पिवळा डाग


ग्रीन काय ग्रीन काय

सभोवताल हिरवेगार


ब्ल्यु काय ब्ल्यु काय

वर पहा निळे आकाश


इंडिगो काय इंडिगो काय

सांडली सगळी शाई काय


व्हॉयलेट काय व्हॉयलेट काय

जांभळं खाऊन जीभ रंगवा


ब्लॅक काय ब्लॅक काय

कुट्टकाळा अंधार फार


व्हाईट काय व्हाईट काय

दुधावरची पांढरी साय


शिकलो काय ओळखा पाहु

इंग्रजी मधले कलर नऊ

-

---

२. नंबर गाणे

मुलांनो रस्सी खेच खेळता का? चला आज खेळू. काही मुलं डावी कडी काही उजवी कडे. सर दोरीचा मध्य धरून उभेत हं.

आता ओढा आपापल्या बाजूने दोरी.पण हे गाणं म्हणत बरं का


वन, टू ,थ्री ,फोर

करू नका फार जोर.

फायु, सिक्स, सेवन, एट

दोर तुटेल पहा थेट.

नाईन टेन, नाईन अॅंड टेन

पडले पहा सरांचे पेन.

---

३. प्राण्यांची सभा


इंग्रजीच्या पुस्तकात प्राण्यांची नावे

पाठ करू चला, कवितेच्या सवे.

राजाची टोपी पळवली उंदराने

मी आहे रॅट, नाचत म्हणाले.

मांजर म्हणाली म्यॅव म्यॅव

मला म्हणतात कॅट राव.

पंख हलवीत पोहते बदक

बदक नका म्हणू, म्हणा त्याला डक.

मऊ मऊ सशाने मारली उडी

रॅबिट आहे हा, नुसती घाबरगुंडी.

माकड, आले करत हुप हुप

मंकी म्हणा, नाहीतर बसा चूप.

टप टप टप टप आला घोडा

हॉर्स म्हणा अन पाठीवर बसा.

गाढव ओरडले हॉंची हॉंची

म्हणती त्याला डॉंकी डॉंकी.

वाघाने मग उगारला पंजा

टायगर म्हणत फडशा पाडला.

सिंव्हाने फोडली एकच डरकाळी

लायन म्हणत पळाली सगळी.

---

Friday, February 7, 2025

आपण पाहू तसं!

फोटो क्रेडिट- श्रीलेखा गोहाड

सुर्योदय होताना

उजळून जातो आसमंत.

अगदी दूरवरची झाडं

आपल्या प्रतिबिंबासह

नीटसच उमटतात.

तळ्याचे लखलखते पाणी

अन आभाळाची त्यात

उमटलेली आभा,

समोर पसरलेली 

हिरवी लव, कुंपणासह ....


अगदी सगळं दिसत रहातं.


अन रात्रभराची साथ देणारे,

हलकेच वाऱ्यावर झुलत,

अस्तित्वाची साक्ष देणारे

ते तीन माड.

ते मात्र दिवसाच्या उजेडात

अगदीच नजरेतून 

सुटून जातात...


शेवटी आपण पाहू तसं;

आनंदात सोबत करणारे,

दिसणारे सौंदर्य, रंग

क्षणिक साथ देणारे

प्रतिबिंब

हे आणि असे सगळे?

कि

असीम शांततेत;

अस्तित्वाचे भान देणारे

तीन स्तंभ

स्वर्ग, मृत्यु, पाताळ!

---

Monday, February 3, 2025

लकेर

 


लकेर अशी ही कुणी गायली

कुणी चित्रकार चित्र चितारी


सोडुनि गेला पीस आपुले कोणी

की घातली नभावर फुंकर कोणी


की रविकर तो गेला देऊनि

वसुंधरेच्या गाली लाली

---

पहाट झाली...


पहाट झाली गुरे निघाली, सोबत वनमाळी.

आकाशी हा पहा उमटला, जगताचा माळी.

हळूच जागे झुंजूमुंजूला, भूमाता काळी.

झांज वाजवी वृक्षवल्ली, वाऱ्याची टाळी.

दिन उगवे सुयोग घेउनी, हा आपुल्या भाळी.

---