Friday, June 21, 2024

अष्टमी


बिचारा पौर्णिमेचा चंद्र!

अष्टमीच्या चंद्राचं

मात्र सगळच खास!


उगवताना छान प्रकाश

निळं निळं आकाश

स्वच्छ दिसणारं क्षितीज


जरा वर आलं की

सुरु होतेच रंगपंचमी

पश्चिमेची लाली उधळते

अगदी पूर्वेपर्यंत.

खरं तर जास्तच 

खुलते ती पूर्वेला

पश्चिमेचा गडद मळवट

पूर्वेला छान गुलबक्षी होतो


अन सूर्यास्तानंतर

पसरत जाणारी

जांभळी निळी आभा

त्यात तर काय

उठूनच दिसतो

शुभ्र सतेज चंद्र!


रात्र चढत जाते

अन चंद्राचा दिमाख

वाढतच जातो

पूर्ण गोलापेक्षा

असे अष्टक 

जास्तच खरे वाटते

तीन मित्यांमधली

त्याची गोलाई

जास्तच मादक

दिसू लागते.


अन मग आसमंत 

झाकाळून जातो

टिमटिम करत

एक एक चांदणी 

लुकलुकु लागते

पौर्णिमेच्या सारखा,

अष्टमीचा चंद्र

त्यांना झाकून नाही टाकत

आपल्या बरोबर 

चांदण्यांची प्रभावळ घेऊन

तो सरकत रहातो, 

आकाशभर!


अन मग मावळताना पुन्हा

आकाशात अंधुक निळाई

दाटून येत असते.

आता उलट होतं

पूर्वेची सोनेरी किरणं

पश्चिमही उजळवतात

अन त्यात हे राजस सौंदर्य

हळूहळू क्षितीजापार

निघून जातं

मनात एक हूरहुर जागत रहाते

पंधरवड्याची आस

मनात उभारी धरते !


म्हटलं न, 

अष्टमीच्या चंद्राचं

अगदी सगळच खास!

---

No comments:

Post a Comment