लोथलच्या त्या जोडप्याचा सांगाडा पाहून
नाभीत खोलवर जाणवलेली संवेदना
अन सरसरून आलेली ममत्वाची भावना
हेच माझे पूर्वज, मीच त्यांची वंशज!
तिच्या अस्थिपंजर स्तनातून पाझरला पान्हा
थेट पोहोचलेला माझ्यापर्यंत, रसरशीत उष्ण....
तेव्हा ना मनात आले, की
कोणता होता धर्म त्यांचा
कोणती जात, कोणतं रुप, कोणता दर्जा
ना काळाचा बंध आडवा आला
ना भूप्रदेशाचा, ना भाषेचा, ना लिपीचा
कोणत्याही संवादाशिवाय थेट जोडले गेलो
ते अन मी, त्या सशक्त पान्ह्याने!
कधीतरी एकदा पोहोचलेले थेट दक्षिणेला
कन्याकुमारी तेव्हा झोपलेली, तिची झोपेची वेळ
पण मग फिरून देऊळ पहाताना पुन्हा भिजले
त्या अनेक काळ-योजने दूर असलेल्या शिल्पकाराच्या
कोरिव, ठाशीव कलेच्या पान्हात, चिंब भिजले
एक एक मूर्ती जोडत गेली त्याच्याशी मला
हाच तर तो माझ्या जीवनाचा कर्ताकरविता!
पण पुन्हा इथेही नव्हताच माहित त्याचा धर्म
लिपी, भाषा, संस्कृती. सगळच मला अगम्य
पण तरी काहीच आडवं आलं नाही आमच्यात;
थेट पोहोचलाच दिडदा दिडदा नाद
त्याच्या दगडी सुरेल खांबांमधून निघालेला
अन जुळलाच की अगदी माझ्या हृदयस्पंदनांशी
अन मग कधीतरी शिरले टागोरांच्या निकेतनात
तिथला शांत, गंभीर, आश्वासक भवताल
सभोवतालचा हिरवा निसर्ग, त्यातला गारवा;
कृष्णवडाच्या पानापानांतून वाहणारे नवनीत...
हजारो पारंब्यातून माझ्यापर्यंत थेट पोहोचलच.
त्या प्रचंड पसाऱ्यात मीही एक, समावून जात!
तेव्हाही लक्षात आलं, यांचा धर्म, लिपी, भाषा
काही काही आडवं आलच नाही एकदाही.
आत्म्याशी आत्म्याचा संवाद थेट, विना शब्दभाषा
प्रत्येक पारंबी नवनीताच्या स्निग्धतेने सहज
पोसत गेली प्रत्येक पिढीला, थेट माझ्यापर्यंत.
अन मग कधीतरी पोहोचले अनंतनागच्या
त्या अतिप्राचीन ढासळलेल्या सुरेख मंदीरात
मंदीर नव्हतच उभं आता, पण तरीही नाद होता.
बाजुच्या भिंती माझ्याशी बोलायला आसुसलेल्या
ढासळलेली प्रत्येक मूर्ती बोलत होती माझ्याशी
तिचा नव्हता आक्रोश, पाडल्याचा, नष्ट केल्याचा.
नव्हता द्वेष वा आक्रमक आरोप वा विष:ण्णता
जे झालं ते स्विकारलेलं तिनं, दु:खाने पण शांतपणे!
अन मला सांगत होती, काळाचा महिमा आहे हा
जुनं संपतंच कधी न कधी, शत्रू नसतं कोणी.
असते तो काळाचा महिमा, काळाची गरज.
पण तू त्यापलिकडे ये, इथे माझ्याजवळ पोहोच
राग, द्वेष, संघर्ष, पतन सगळं सोसून ती सांगत होती.
हे सगळं सोड, नवीन उभं कर, जे जोडेल
तुला माझ्यापर्यंत, धर्माशिवाय, जातीशिवाय,
भाषेशिवाय, लिपीशिवाय,...थेट संवाद- स्नेह संवाद!
म्हणाली माझ्या, त्या लोथलच्या बाईच्या,
त्या कन्याकुमारीच्या, बंगप्रदेशातल्या कृष्णाच्या माईच्या
अगदी सगळ्यांच्या पान्हाची शपथ आहे तुला
काळालाही जिंकलय आम्ही, पोहोचलाय आमचा पान्हा
अगदी थेट, थेट तुझ्यापर्यंत, आता तुझी पाळी
आमचा काळ नको, तुझा काळ तू जग
तुझा कान्हा तू प्रसव, तुझा पान्हा तुझा तुला फुटो.
तो पान्हा सकस बनव, रसरशीत बनव
नवीन नवनीत घडव, धर्म, जात, भाषा, लिपी,...
कशाचेच बंधन नको, तरच पान्हा होईल सकस
हे भान ठेव फक्त, लक्षात ठेव, तूही एक माध्यम.
आपल्या सगळ्या पिढ्यांचे पुढच्या पिढीशी साधायचे
संवादाचे माध्यम फक्त!
एक निरंतर, अविनाशी रसरशीत पान्हा!
---
*लोथलचा सांगाडा*- सिंधु संस्कृतीतील एका जोडप्याचा सांगाडा लोथल येथील संग्रहालयात जतन केला आहे.
*दगडी सुरेल खांब*- कन्याकुमारी मंदीराबाहेर हे खांब आहेत त्यावर आघात केला की संगीतातील सगले सूर निनादतात.
*कृष्णवडातील नवनीत*- कलकत्यात वडाच्या झाडाचा हा एक प्रकार. याची पानं कोनासारखी वळलेली असतात, ज्यातून कृष्ण लोणी खातो असे मानले जाते.