Tuesday, June 11, 2019

मोठ्ठा पाऊस

तशी स्वच्छंदी वगैरे
डोंगराचा पायथ्याशी विहरत
उड्या मारत धडपडत
उन्हाचे कवडसे हाताळत
वर उंचउंच ढगांचे छप्पर
अंधारून येताच शिरावे गुडुप्प
घर नाहीच म्हणता येणार
एक तंबू आहे मात्र दणकट
सोई सगळ्या, मऊ बिछाना
पण घराची ओढ नाही;
नाहीच

जरा चढ चढावा
स्वत:चेच मार्ग शोधत
नवनवे खाचळगे अन
नवेच खडक वगैरे
अन वर अचानकच आला
एक ढग काळानिळा
अन अंधारल्यावर पहावं तर
वाटेत असेच तो तंबु
दणकट सुरक्षित सहज उभा
पण घराची ओढ नाही;
नाहीच

प्रत्येक चढ असाच उत्साही
नवा, आकर्षक, रोमहर्षक वगैरे
मी ही तितकीच उत्साही
धडपड, पळापळ, वरचढ
अन वर आहेच सावळा ढग
अन वाटेतला दणकट तंबू
घराची ओढ वगैरे
काय असते विचारत

अन मग कधीतरी सापडला
सापडला माझा मार्ग सहज
वर चढणार छान वळणदार
सापडला माझा असा कॅरेव्हानही
दणकट, सुरक्षित, उबदार
उबदारपणा आपला
माझा मलाच हो
अन लक्षात आलं वाटेतला तंबू
यावेळी दिसलाच नाही
अन मग ढग सोबतीला आला

माझी वाटचाल चालूच वर वर
ढगतर काय होताच सोबत
पण एका क्षणी धुकं आलं
गडद, भरीव, दाटून आलेलं
आसपास सगळा भारून टाकणारं
श्वासही गुदमरावा असं सगळं
उधळलेला तंबू, त्याचे सगळे तंतू
सावळ्या ढगाचे बाष्प अन ताण
सगळे मिसळून धावून आले
श्वास गुदमरावा असा ओलावा
दाटून यावं असं आपलेपण
अन माझ्यातला कोरडा एकटेपणा
पार पार उध्वस्त करणारे ते वादळ
मोठ्ठा पाऊस
अन मग
समोर पसरलेले ते
लख़्ख वास्तव वगैरे...

(गौरी देशपांडे यांची कथा वाचून उतरलेली)

No comments:

Post a Comment